भाजप खासदार रामस्वरूप शर्मांचा दिल्लीत आढळला मृतदेह

हिमाचल प्रदेशातल्या मंडीचे भाजपचे खासदार रामस्वरूप शर्मा दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळलेत.

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून रामस्वरूप शर्मांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठण्यात आलाय.

शर्मांच्या निधनाची बातमी आल्यानंतर लोकसभेचं कामकाज 1 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं.

हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यात 1958मध्ये रामस्वरूप शर्मांचा जन्म झाला. 2014 साली ते खासदार म्हणून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. वीरभद्र सिंह यांची पत्नी प्रतिभा सिंह यांचा त्यांनी पराभव केला होता.

यानंतर 2019च्या निवडणुकीमध्ये ते पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आले. परराष्ट्र प्रकरणांविषयीच्या संसदेच्या स्थायी समितीचे ते सदस्य होते.

त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि तीन मुलं आहे. रामस्वरूप शर्मांनी शेतकरी आणि व्यापारी म्हणूनही काम केलं होतं.

त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर भाजपच्या संसदीय दलाची बैठक रद्द करण्यात आली.

केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी शर्मांच्या निधनानंतर ट्वीट केलंय. या घटनेचा आपल्याला धक्का बसला असल्याचं रिजीजूंनी म्हटलंय.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही याविषयी ट्वीट केलंय. दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे असून आपण शर्मांच्या कुटुंबियांसाठी सहवेदना व्यक्त करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)