उद्धव ठाकरे : 'सचिन वाझे हे ओसामा बीन लादेन आहेत असं चित्र उभं केलं जातंय'

फोटो स्रोत, @OfficeofUT
सचिन वाझे हे 2008 साली शिवसेनेत होते, पण त्यांनी सदस्यत्व रिन्यू केलं नाही. सचिन वाझेंचा शिवसेनेशी थेट संबंध नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
त्याचवेळी दादरा-नगर-हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल तर गुजरातचे मंत्री होते. डेलकर कुटुंब काल आम्हाला भेटलं म्हणून एफआयआर दाखल केला, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.
तसंच लॉकडाऊन टाळण्यासाठी त्यासाठी जे आवश्यक आहे ते केलं पाहीजे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
"हत्या, आत्महत्या अशा या सगळ्या प्रकरणी गंभीरपणे घेण्याची गरज आहे. तपास सुरू आहे. 'फाशी द्या आणि तपास करा' ही पद्धत नाही. एखाद्याच्या अब्रुचे धिंडवडे काढायचे आणि तपासाआधी बदनाम केलं. सचिन वाझे ओसामा बीन लादेन असल्यासारखं विरोधी पक्ष बोलत होते," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना "सचिन वाझेंना वकील नेमण्याची गरज नाही कारण त्यांच्याकडे अॅडव्होकेट उध्दव ठाकरे आहेत," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
सचिन वाझेंकडे अशी काय माहिती आहे की त्यांना हे सरकार वाचवत आहे, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते म्हणाले आम्ही सचिन वाझेंना हटवल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही. मग आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि शेवटच्या दिवशी कामकाज सुरळीत होण्यासाठी आम्ही त्यांच्या बदलीचा निर्णय घेतला, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे.
"आम्ही वीज तोडणीबाबत स्थगिती दिली होती. अधिवेशन नीट चालावं म्हणून ती स्थगिती दिली. तेव्हा ऊर्जा मंत्री नव्हते. महावितरण कंपनीवर बोजा वाढतोय. त्यामुळे नाइलाजाने सरकारला हा निर्णय घ्यावा लागला," असं वीजजोडणी तोडण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर अजित पवार यांनी स्पष्टिकरण दिलं आहे.
तसंच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आम्ही तीन पक्ष जेव्हा ठरवू तेव्हा होईल, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
"आम्ही आमची मतं बदलणार नाही. आम्ही स्थानिक जनतेबरोबर आहोत. नाणारला हा प्रकल्प होणार नाही हे ठरलं आहे," असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.
आरेमध्ये मेट्रोच्या 3 लाईनची कारशेड झाली नसती. एका लाईनची झाली असती. आता कांजुरमार्गमध्ये 3 लाईनची होणार आहे, असंही ठाकरे म्हणालेत.
"हे मारून मुटकून सत्तेचे लचके तोडण्यासाठी एकत्र आले आहेत. एकमेकांच्या कुरघोडी काही नवीन नाहीत," अशी टाका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)









