गाढवाचं मांस खाल्ल्याने खरंच सेक्स पॉवर वाढते का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, श्रीनिवास लोक्कोजू
- Role, बीबीसी तेलुगूसाठी
आंध्र प्रदेशमध्ये सध्या गाढवाच्या मांसाची मागणी वाढलीये. गाढविणीचं दुध गाय, म्हैस किंवा बकरीच्या दुधापेक्षा अनेक पटीने महागलं आहे.
आंध्र प्रदेशमध्ये अनेक जणांचं म्हणणं आहे की, आम्ही गाढविणीचं दूध शारीरिक ताकद तसंच सेक्स करण्याची क्षमता वाढवण्यासाठी पितो आहोत.
आंध्र प्रदेशच्या कृष्णा, गुंटूर, प्रकाशम्, कुर्नुल, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, विशाखापट्टणम, श्रीकाकुलम आणि विजयनगर या जिल्ह्यांमध्ये गाढवाचं मांस आणि दुधाची मागणी वाढली आहे.
काकीनाडातल्या एका प्राणी वाचवणाऱ्या संस्थेनुसार या भागात गाढवांची तस्करीसुद्धा वाढली आहे.
पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की गाढविणीचं दूध जरी आरोग्याला चांगलं असलं तरी गाढवांचं मांस खाल्याने लैंगिक क्षमता वाढते याचे कोणतेही पुरावे नाहीत.
"आंध्र प्रदेशमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या तुलनेत कमी गाढवं आहेत त्यामुळे त्यांची तस्करी होते आहे. इथे गाढवाच्या मांसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे," संस्थेच्या एका सदस्याने, गोपालने सांगितलं.
गाढवाची किंमत किती?
गोपालच्या मते आंध्र प्रदेशात सध्या एका गाढवाची किंमत 15 ते 20 हजार रुपये आहे. ही गाढवं शेजारच्या राज्यातून आणून इथे विकली जातात.
असंच चालत राहिलं तर येत्या काही वर्षांत गाढवं फक्त प्राणी संग्रहालयात पाहायला मिळतील अशी भीतीही गोपाल यांनी व्यक्त केली.
गाढवाचं मांस खाता येऊ शकतं? तज्ज्ञ काय म्हणतात?
गाढवांचं मांस आणि दूध वेगवेगळ्या ठिकाणी विकलं जातं. दूध विकणारे ग्राहकांच्या घराजवळ गाढवं आणून दूध विकतात तर गाढवांचं मांस विकायला खास जागा आहेत. काही ठिकाणी वर्षभर गाढवाचं मांस मिळतं तर काही ठिकाणी ठराविक काळात मिळतं.

फोटो स्रोत, Getty Images
गोपाल सांगतात, "अन्न सुरक्षा आणि मानकं 2011 नुसार गाढवाचं मासं मानवी खाण्यासाठी नाही. गाढवाचं मांस विकणं हा गुन्हा आहे. या नियमांचं उल्लंघन केलं तर IPC च्या कलम 428 आणि 429 अंतर्गत शिक्षा होऊ शकते."
राज्यात फक्त 5000 गाढवं शिल्लक आहेत आणि सरकारने त्यांचं मांस विकण्यावर बंदी घातली नाही तर संपूर्ण प्रजातीच धोक्यात येऊ शकते, असा इशाराही गोपाल देतात.
राज्याच्या अन्नसुरक्षा विभागात काम करणारे अन्न निरीक्षक अप्पाराव यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "गाढवाचं दूध आणि मांस मानवी आहाराचा भाग समजले जात नाहीत. या मांसाचे तसंच दुधाचे गुणधर्म काय याचा शास्त्रीय अभ्यास केल्याशिवाय त्यांचं सेवन करणं चांगलं नाही.
चिकन किंवा मटन आपण खातो, त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. पण गाढवाच्या मांसाबद्दल तसं सांगता येणार आहे का? त्यासाठी योग्य त्या चाचण्या करायला हव्यात. या चाचण्या इंस्टिट्युट ऑफ न्युट्रिशन आणि सेंट्रल फुड टेक्नोलॉजिकल रिसर्च इंस्टिट्युट अशा संस्थांमध्ये होतात."
'गेल्या 7 वर्षांत 5000 गाढवं खाल्ली गेली'
पशुसंवर्धन खात्याचे माजी उपसंचालक डॉ. गोपालकृष्णा यांनी बीबीसीशी बातचित केली. ते म्हणतात, "2019 च्या पशुगणनेनुसार भारतात 1.2 लाख गाढवं होती. आंध्र प्रदेशात सध्या जवळपास 5000 गाढवं आहेत. पण 2012 साली हाच आकडा 10 हजार होता. म्हणजेच गेल्या 7 वर्षांत पन्नास टक्क्यांहून जास्त गाढवं कमी झालीत."

लैंगिक क्षमता वाढवण्याच्या हेतून गाढवाचं मांस खाल्लं जातं. पण याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. सरकारने याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी असंही ते सुचवतात.
जी. नेहरूबाबू पश्चिम गोदावरी जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाचे सहसंचालक आहेत. ते म्हणतात, "सेक्स करण्याची क्षमता वाढते म्हणून गाढवाचं मांस खाल्लं तर आरोग्याच्या गंभीर समस्या उभ्या राहू शकतात. काही लोकांनी फक्त पैशांसाठी अशा गोष्टी पसरवल्या आहेत."
तस्करीमधून अधिक पैसा
आंध्र प्रदेशमधल्या गाढवांची संख्या दिवसेंदिवस कमी होतेय. परिणामी शेजारच्या राज्यांमधून गाढवांची तस्करी होतेय. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मुंबईहून तस्करी करून आणलेली 8 गाढवं पकडली होती. त्याआधी दाचेपल्ली भागात 39 गाढवं सापडली होती.
पण प्राणिमित्रांचं म्हणणं आहे की तस्करी होणाऱ्या गाढवांची संख्या याहून अनेकपटींनी जास्त आहे. गाढविणीच्या दुधाच्या एका ग्लासची किंमत 50 ते 100 रूपये आहे. त्यांचं मांस 500 ते 700 रूपये किलोने मिळतं.

फोटो स्रोत, GOPAL R SURABATHULA
प्राणी वाचवणाऱ्या एक संस्थेचे कार्यकर्ते किशोर यांचं म्हणणं आहे की यामुळे गाढवाची तस्करी करणारे रॅकेट्स तयार झालेत. बाहेरच्या राज्यांमध्ये 3 ते 5 हजारांना गाढव विकत घ्यायचं आणि आंध्र प्रदेशमध्ये आणून 15 हजारांना विकायचं, असं सध्या आंध्र प्रदेशात सुरू आहे.
गाढवाच्या दुधाची होम डिलीव्हरी आणि चौकात मांस
प्रकाशम्, गुंटूर आणि विजयवाडा जिल्ह्यात दुधाची होम डिलीव्हरी करणं सामान्य गोष्ट आहे. गाढवाचं मांस विकणारी दुकानं मुख्य चौकात दिसतात. विक्रेत कोणताही मुलाहिजा न बाळगता मांसविक्री करत असतात.
नांचर गाढविणीचं दूध विकतात. "आम्ही दूध विकायला गेलो की हे गाढविणीचं आहे यावर कोणी विश्वास ठेवत नाही. त्यामुळे आम्ही ग्राहकांच्या घरी गाढविणी घेऊन जातो आणि त्यांच्यासमोर दूध काढून विकतो. गेल्या 20 वर्षांपासून आम्ही हा व्यवसाय करतो आहोत. आमची जवळपास 40 कुटुंब राजस्थानहून आली आहेत. गाढविणीच्या दुधात अनेक आजार बरे करण्याची क्षमता असते."

फोटो स्रोत, GOPAL R SURABATHULA
विजयवाडाच्या देवाम्मा म्हणतात की त्यांना फुप्फुसाचा त्रास आहे. "मी जेव्हापासून गाढविणीचं दूध प्यायला सुरुवात केली तेव्हापासून माझा त्रास कमी आहे. आम्ही हे दूध आमच्या मुलांनाही देतो. फार चांगलं असतं ते. मी गाढवाचं मांसही खाते, काहीही त्रास होत नाही."
श्रीकाकुलममधले नारायण सांगतात की गाढविणीच्या दुधाचा एक ग्लास 100 रुपयांना मिळतो. आमच्या घरातले लहान-मोठे सगळे ते दूध पितात. संधीवात आणि दम्यासाठी गाढविणीचं दूध खूप चांगलं असतं. पण आम्ही मांस खात नाही. पण अर्थात ते या भागात मिळतं."
गाढविणीचं दूध आणि गाढवाचं मांस यांच्या वाढत्या किंमतीमुळे आजकाल गाढवांची चोरी व्हायचं प्रमाणही वाढलं आहे.
सौंदर्यासाठी गाढविणीच्या दुधात स्नान
गाढवाचं मांस सेक्सची क्षमता वाढवतं याला कुठलाही शास्त्रीय पुरावा नसला तरी डॉक्टर्स म्हणतात की गाढविणीच्या दुधात व्हीटॅमिन्स आणि फॅटी अॅसिड्स असतात.

फोटो स्रोत, Getty Images
वैद्यकीय तज्ज्ञ कोटीकुप्पला सूर्यराव यांनी बीबीसीला सांगितलं की, "गाढविणीच्या दुधातल्या प्रथिनांना 'राजाची प्रथिनं म्हणतात'. गाढविणीचं दूध त्या नवजात बालकांना दिलं जात जे गाईचं किंवा म्हशीचंही दूध पिऊ शकत नाहीत. आधीच्या काळात राण्या-महाराण्या गाढविणीच्या दुधात स्नान करायच्या कारण त्याने सौंदर्य खुलतं असा समज होता."

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








