You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
1857 चा उठाव : भारतीय आणि ब्रिटिश सैनिकांना पडलेली ‘ती’ वाईट स्वप्नं अशी खरी ठरत गेली
- Author, आर. व्ही. स्मिथ
- Role, ज्येष्ठ इतिहासकार
पहिला स्वातंत्र्य लढा म्हणजेच 1857 चा उठाव भारताच्या इतिहासात अनेक अंगांनी महत्त्वाचा आहे. या संघर्षासोबतच भारतात मध्ययुगीन काळाचा शेवट आणि नव्या युगाची म्हणजे आधुनिक कालखंडाची सुरुवात झाली होती.
या संघर्षात आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे ब्रिटीश आणि भारतीयांमधला अविश्वास.
दिल्लीच्या चांदणी चौकात लाला हनवंत सहाय यांच्या आजोबांनी एक गोष्ट ऐकली होती. लाल किल्ल्याच्या बरोबर वर नवीन चंद्र दिसेल (पंधरवाड्यातला पहिला चंद्र) त्यावेळी लाल किल्ल्याचं आंगण ब्रिटिशांच्या रक्ताने माखलेलं असेल. पण, हे रक्त वाहून यमुना नदीत मिसळलं तर ब्रिटिशांनी जे गमावलं ते सगळं त्यांना पुन्हा मिळेल.
1912 साली झालेल्या हार्डिंग बॉम्बस्फोटाचा कट रचण्याच्या आरोपात लाला हनवंत सहाय यांना अटक झाली होती, पण तोपर्यंत त्यांच्या आजोबांचं निधन झालं होतं.
फैजाबादचे मौलवी अहमदुल्लाह शहा यांनी ही भविष्यवाणी केली होती. मात्र, दिल्लीतल्या चांदणी चौकात नाही तर मेरठमधल्या मुख्य बाजारात त्यांनी ही भविष्यवाणी केली होती. तिथल्या भितींवर लाल रंगात 'सगळं लाल होणार' असं लिहिलं होतं.
सर चार्ल्स नेपियर म्हणाले होते, "मी गव्हर्नर जनरल झालो तर ख्रिश्चन धर्माला राज्य धर्म बनवेल. कारण भारत आता इंग्लंडच्या अधिपत्याखाली आहे." त्यांच्या या वक्तव्याला विरोधक करताना मौलवी अहमदुल्लाह यांनी हिंदू आणि मुस्लिमांनी मिळून आपल्या पूर्वजांच्या विश्वासाला तडा जाऊ देता कामा नये, असं आवाहन केलं.
मेरठमधल्या सदर बाजारात मौलवींनी केलेल्या या वक्तव्याचा तिथे उपस्थित शिपायांवर मोठा परिणाम झाला. 'फिरंग्यांना मारा'च्या घोषणा देत शिपाई छावणी परिसरावर चालून गेले आणि इंग्रजांच्या बंगल्यात घुसले.
40 वर्षांचे कर्नल जॉन फिनिस यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त शिपायांनी त्यांच्या डोक्यात गोळी घातली. रविवार आणि सोमवार या दोन दिवसात अनेकांना ठार करण्यात आलं. पहिला मृत्यू जॉन फिनिस यांचा झाला. यानंतर शिपाई दिल्लीला गेले.
शिवशंकराचा संदेश, फकिराचा कलमा
दिल्लीकडे जाताना या शिपायांना आकाशात उडणारा निलकंठ पक्षी दिसला. शिपायांमधल्या हिंदू शिपायांनी, बघा आमचे ईश्वर शिवशंकर स्वतः आपल्याला मार्ग दाखवत असल्याचं म्हणाले.
काही वेळातच पांढऱ्या कपड्यातले एक फकीर दिसले. ते कलमा वाचत होते. मुस्लीम शिपायांनी हा त्यांच्यासाठी शुभसंदेश मानलं. मात्र, कलमा वाचत असताना एका कोबरा सापाने त्यांना फार त्रास दिला होता. कलमा वाचताना तो फना काढून त्या फकिरासमोर उभा ठाकला होता. हा साप कुठल्याही क्षणी आपल्याला दंश करेल, अशी भीती त्यांना वाटत होती.
पठाण शिपायांनी दगड उचलून त्या सापाला ठेचायचा प्रयत्न केला. तेव्हा शिपायांमधल्या ब्राह्मण आणि राजपूत शिपायांनी त्यांना रोखलं. साप भगवान शंकराचं प्रतिक आहे आणि ते आपल्याला आशीर्वाद द्यायला आल्याचं त्यांचं म्हणणं होतं.
सापाच्या भीतीने फकीर आपला चिमटा घेऊन तिथून निघून गेले आणि तो सापही झाडांमध्ये गुडूप झाला.
बहादूर शहा यांचं स्वप्न
त्या काळातली आणखी एक गोष्ट फार प्रचलित आहे. ही कहाणी तत्कालिन मुघल बादशाह बहादूर शहा जफर यांच्याशी संबंधित आहे. बहादूर शहा जफर बंडखोर सैनिकांचं नेतृत्त्व करायला पूर्णपणे तयार नव्हते. मात्र, एका स्वप्नाने त्यांचा विचार बदलल्याचं सांगतात.
बहादूर शहा जफर यांचे स्वीय सहायक यांनी सांगितल्याप्रमाणे एक दिवस बहादूर शहा जफर यांना त्यांचे आजोबा शहा आलम यांनी स्वप्नात दृष्टांत दिला. 100 वर्षांपूर्वी झालेल्या प्लासीच्या युद्धाचा सूड उगारण्याची वेळ आल्याचं ते म्हणाले. स्वप्नातल्या या दृष्टांतानंतरच बहादूर शहा जफर यांनी सैनिकांचं नेतृत्त्व करायला होकार दिल्याचं सांगतात.
मात्र, ज्यावेळी त्यांना हा दृष्टांत झाला त्यावेळी त्यांचं वय 82 वर्षं होतं आणि त्यांना सतत खोकला यायचा. या खोकल्यामुळे त्यांना गाढ झोपही येत नसे.
त्यांची राणी जीनत महल यांनी त्यांना स्वातंत्र्य सैनिकांची साथ देण्यासाठी त्यांना मन वळवलं होतं.
लाल किल्ल्यावर एका प्रेताची सावली फिरत असल्याचं बघितल्याचंही बरेच जण म्हणायचे. फेब्रुवारी 1707 मध्येही औरंगजेबच्या मृत्यूपूर्वीसुद्धा अशीच एक सावली दिसल्याचं बोललं जातं.
काश्मिरी गेटजवळ मुंडक नसलेला योद्धा घोड्यावरून जात असल्याचं काहींनी बघितलं. त्याला दुंड असं म्हटलं गेलं. हा दुंड पुढे बरेली, आगरा, लखनौ, जयपूर आणि फैजाबादमधेही दिसला. जिथे-जिथे हा दुंड दिसला तिथे-तिथे रक्तपात झाला.
इंग्रज शिपायांनाही पडली दुस्वप्न
केवळ भारतीय शिपायीच नाही तर इंग्रज शिपायांनीही विचित्र दृश्यं बघितल्याचं सांगितलं. एका इंग्रज शिपायाने शहरात राजांची एक मोठी रांग बघितली जी पुढे जाऊन संपत होती. हा मुघल साम्राज्याच्या अंताचं प्रतिक असल्याचं मानलं गेलं.
आणखी एका इंग्रज शिपायाला त्याचे वडील बोट दाखवून येणाऱ्या धोक्याकडे इशारा करत असल्याचं दिसलं.
कॅप्टन रॉबर्ट टायटलर यांच्या पत्नी हॅरिएट टायटलर यांना आपल्या पोटातलं बाळ धोक्यात असल्याचं आणि काही वेळाने काही पंजाबी किंवा पठाण शिपाई वाचवत असल्याचं दिसलं.
यानंतर हॅरिएट यांनी दिल्लीतल्या रिज भागात मुलाला जन्म दिला. त्यावेळी तिथे खूप पाऊस सुरू होता. बाळाला हगवण लागली आणि त्याची प्रकृती खूप ढासळली. तो अगदी मृत्यूच्या उंबरठ्यावर होता. त्यावेळी हॅरिएट आपल्या बाळाला करनालला घेऊन गेल्या.
शहाजहापूरमध्ये एका ख्रिश्नच फादरच्या मुलीलाही एक स्वप्न पडलं. या स्वप्नात अनेक जणांना ठार करण्यात आल्याचं आणि मरणाऱ्यांमध्ये तिचे वडीलही असल्याचं तिला दिसलं. काळे कपडे परिधान केलेली एक व्यक्ती तिच्या घराकडे येत असल्याचं आणि पायऱ्यांपाशी येऊन ती व्यक्ती गायब झाल्याचं तिला दिसलं.
तिचं हे स्वप्न 1857 सालच्या मे महिन्यात एका सकाळी खरं ठरलं. त्या सकाळी अनेक बंडखोर शिपायांनी बऱ्याच ख्रिश्चनांना ठार केलं. यात तिचे वडीलही ठार झाले. मात्र, तिची आई या हल्ल्यातून बचावली.
दुस्वप्न
दिल्लीतल्या चांदनी चौकात एका शीख व्यक्तीलाही असंच दुस्वप्न दिसलं. लाल मंदिरापासून फतेपुरी मशिदीपर्यंत अनेकांना फासावर चढवल्याचं स्वप्न त्यांना पडलं. त्यांचं हे स्वप्नही खरं ठरलं. इंग्रज अधिकाऱ्यांनी अनेक बंडखोर शिपायांना फासावर चढवलं.
मुघल कुटुंबातल्या एका आजींनाही अशी स्वप्न पडायची. गुरूद्वारा शीशगंजसमोर अनेक मृतदेह कुजत पडल्याचं त्यांना दिसायचं. स्वप्नामुळे झोपेतून जाग आल्यानंतरही त्यांना तो वास यायचा.
त्यांचं हे स्वप्नही काही प्रमाणात खरं ठरलं. लेफ्टनंट हडसन यांनी बहादूर शहा जफर यांचे दोन पुत्र आणि नातवाला खुनी दरवाजासमोर ठार केलं आणि त्यांचे मृतदेह गुरूद्वाराजवळ कुजण्यासाठी फेकून दिले.
सर सैयद अहमद शहा यांच्या एका नातेवाईकाने स्वप्नात दरियागंजजवळून वाहणाऱ्या कालव्यात रक्ताचे पाट वाहत असल्याचं दिसलं.
संघर्षाची धग थोडी कमी झाल्यावर सर सैयद अहमद शहा त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांचं सगळं घर अस्ताव्यस्त झालं होतं आणि ते नातेवाईक कुठे गेले, हे कधीच कळलं नाही.
संध्याकाळी लाल दरवाजापासून दिल्ली गेटकडे जाताना एका व्यक्तीने रक्त सांडलेलं बघितलं. तिथे कुणाची तरी हत्या झाली होती.
1857 च्या मे महिन्याच्या सुरुवातीला यमुनेजवळच्या एका मशिदीत एक फकीर 'मरा-मरा' असं पुटपुटत असल्याचं अनेकांनी बघितलं. याचप्रमाणे शहाजहापूरमध्ये एक फकीर आणि जयपूरमध्ये एक साधूसुद्धा असेच 'मरा-मरा' पुटपुटत होते.
या सर्व घटना आणि या स्वप्नांचा काय अर्थ होता? ही स्वप्न म्हणजे घडणाऱ्या घटनांच्या पूर्वसूचना होती का?
याबाबत नेमकं खरं काय, हे सांगता येत नसलं तरी जे घडलं ते पूर्णपणे नाकारताही येत नाही.
पुढे अनेक संशोधनात मानवी मेंदूत येणारा काळ बघण्याची क्षमता असते, हे सिद्ध झालं आहे आणि म्हणूनच या स्वप्नांना काही अर्थ नसतो, असं म्हणून ती नाकारली जाऊ शकत नाहीत.
बल्लिमारान भागात हकीम अहसनुल्लाह खान यांच्या हवेलीत जुनं वातावरण आजही अनुभवता येतं. हकीम खान बहादूर शहा जफर यांचे खाजगी डॉक्टर तर होतेच. शिवाय त्यांचे सल्लागारही होते.
थोड्याच अंतरावर लाल कुवामध्ये राजाची सर्वांत तरुण राणी जीनत महल यांचं पिढीजात घर आहे. तिथे आता शाळा भरते.
तर करोलबाग येथील राव तुला राम शाळा, रेवाडीच्या शूर राजांची आठवण करून देते. त्यांचे पूर्वज राव तेज सिंह यांनी 1803 सालच्या पटपडगंज इथल्या युद्धात शिंदेंची साथ दिली होती. नोव्हेंबर 1857 मध्ये नारनौलच्या युद्धात राव तुला राम यांचा पराभव झाला. त्यानंतर ते तात्या टोपेंसोबत गेले आणि 1862 साली ते रशियाला गेले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)