नरेंद्र मोदी : दिल्लीच्या सीमेवर बसलेले शेतकरी अफवेचे बळी ठरलेत

Lok Sabha TV

फोटो स्रोत, Lok Sabha TV

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत बोलत आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर ते बोलत आहेत.

कृषी कायद्यांविरोधात जे शेतकरी आंदोलन करत आहेत, ते चुकीच्या माहितीला बळी पडले आहेत, असं यावेळी नरेंद्र मोदी म्हणालेत.

मोदी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलत असताना विरोधी पक्षांच्या खासदारांनी गोंधळ घातला. तर काँग्रेसच्या खासदारांनी वॉकआऊट केलं.

तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

"आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावनांचा सरकार आदरच करत आहे. त्यामुळेच सरकारमधले मंत्री त्यांच्यासोबत सातत्यानं चर्चा करत आहेत. शेतकऱ्यांचे आक्षेप काय आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. काही सुधारणा असतील, तर त्या करण्याची आमची तयारी आहे," असं मोदी म्हणालेत.

विरोधक जो गोंधळ घालत आहेत तो सत्य लपविण्यासाठी आहे आणि त्यामुळे कोणाचंही भलं होणार नाही, असं पंतप्रधानांनी म्हटलं.

"कायदा लागू झाल्यानंतर देशात कुठेही बाजार समिती बंद झाली नाही किंवा कुठेही हमीभाव रद्द झाला नाही. या कायद्यानं तुम्हाला अतिरिक्त पर्याय उपलब्ध करून दिला आहे. एखाद्या कायद्याचा विरोध केव्हा होतो, जेव्हा तो बंधनकारक असतो. या कायद्यात असं काहीच नाहीये. शेतकऱ्यांना बाजारसमितीत जायचं जाऊ शकतात किंवा दुसरा पर्याय आहे. मग विरोधाचं कारण काय," असं मोदी पुढे म्हणालेत.

"असं झालं तर तसं होईल, अशी भीती निर्माण केली जात आहे. आंदोलनकर्ते असं वागत नाहीत. ही आंदोलनजीवींची कार्यपद्धती आहे," असं म्हणत पुन्हा नरेंद्र मोदींनी आंदोलनजीवी शब्दाचा पुनरुच्चार केला.

"आम्ही मागितलं नाही, तर दिलं का' असा प्रश्न विचारला जात आहे. पण घेणं न घेणं तुमच्यावर अवलंबून आहे. हा देश खूप मोठा आहे. देशात हुंडाविरोधी कायदा बनावा, अशी कोणाची मागणी नव्हती. तिहेरी तलाक विरोधी कायद्याची मागणी कोणी केली नव्हती. शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्याची मागणी कोणी केली नव्हती. पण प्रगतीशील समाजासाठी हे गरजेचं होतं. म्हणूनच हे कायदे बनले," असं स्पष्टीकरण मोदींनी दिलं आहे.

शेती हा आपल्या संस्कृतीचा पायाभूत घटक आहे. आपले सण, गाणी, उत्सव हे कृषीचक्राशी जोडलेले आहेत. कोणालाही आशीर्वाद देताना धन-धान्य हा शब्द वापरला जातो. त्यामुळेच बदलत्या परिस्थितीत शेतीमध्येही आवश्यक बदल करण्याची गरज आहे, असं मोदी म्हणाले.

"स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे 28 टक्के शेतमजूर होते. गेल्यावेळेस जी जनगणना झाली त्यानुसार शेतमजूरांची संख्या 55 टक्के झालीये. हा काळजीचा विषय आहे. शेतीत गुंतवणूक होत नाहीये. जोपर्यंत आपण गुंतवणूक आणत नाही, आधुनिकता आणत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही.

शेतकरी केवळ गहू आणि तांदूळ पिकवू नयेत, तर बाजारपेठेची जी मागणी आहे त्यानुसार पिकं घ्यायला सुरूवात करायला हवी. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून नवनवीन गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हव्यात. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने प्रयत्न करायला हवेत," असंही मोदी म्हणाले.

शरद पवारांवर पुन्हा एकदा टीका

"जे लोक इतकी वर्षं सरकारमध्ये होते, त्यांना शेतकऱ्यांच्या समस्येची माहिती नाहीये अशातला भाग नाही. त्यांना त्यांच्याच वक्तव्यांची आठवण करून देतो," असं म्हणत नरेंद्र मोदींनी शरद पवारांच्या एपीएमसी मार्केटसंदर्भातलं एक वक्तव्यं वाचून दाखवलं.

शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुधारणांचं समर्थन शरद पवार यांनी केलं होतं, याचा पुन्हा एकदा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी केला.

राज्यसभेत बोलतानाही नरेंद्र मोदींनी कृषी सुधारणांवर शरद पवार यांनी यू टर्न घेतला असल्याचं म्हटलं होतं.

शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला कलंकित करण्याचं काम आंदोलनजीवींनी केलं आहे. त्यामुळेच आता देशाने आंदोलनकर्ते आणि आंदोलनजीवी यांच्यातला फरक समजून घ्यायला हवा.

नरेंद्र मोदींच्या भाषणातील इतर महत्त्वाचे मुद्दे

मंगळवारी (9 फेब्रुवारी) लोकसभेत रात्री उशीरापर्यंत चर्चा झाली. त्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सर्वांचे आभार मानले. त्यांनी महिला खासदारांनी चर्चेत घेतलेल्या सहभागाचं विशेष कौतुक केलं.

कोरोना काळात भारतानं ज्यापद्धतीनं स्वतःला सावरलं आणि जगातील इतर देशांना सावरायला मदत केली, तो एक टर्निंग पॉइंट आहे. या काळात आपण आत्मनिर्भर भारत बनत जी पावलं उचलली, ती महत्त्वाची होती.

कोरोनानंतरच्या काळातही नवीन जागतिक रचना अस्तित्त्वात येत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर आपण जागतिक रचनेत मूक साक्षीदार बनून राहिलो. पण आता आपली भूमिका ठरवावी लागेल. एका कोपऱ्यात आपण बसून राहू शकत नाही. त्यासाठी भारताला समर्थ व्हावं लागेल. त्यासाठीचा मार्ग आहे-आत्मनिर्भरता

आज देशभरात 'व्होकल फॉर लोकल' हा सूर ऐकू येत आहे. हीच भावना 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेसाठी महत्त्वाची ठरत आहे. कोरोनाकाळात किती नुकसान होईल याचे अंदाज लावले गेले होते. भारतातही किती हानी होईल, याबद्दल अनेक जागतिक संस्थांनी भाष्य केलं होतं. भारत कोरोनासमोर कसा टिकेल, हा प्रश्न उपस्थित केला गेला. पण 130 कोटी देशवासियांच्या सहनशक्तीमुळे आपण कोरोनासमोर टिकलो.

देवाच्या कृपेनं आपण कोरोनातून वाचलो, असं मनोज तिवारींनी म्हटलं होतं. मलाही तेच वाटतं. आपले डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी हेच देवाचं रुप बनून आले होते. कोरोना काळात 75 कोटीहून अधिक भारतीयांपर्यंत रेशन पोहोचलं. जनधन, आधारच्या मदतीने 2 लाख कोटी रुपये लोकांपर्यंत पोहोचवले. आधारचा लोकांना इतका फायदा झाला. पण वाईट याचं वाटतं की, काही लोक आधारविरोधात कोर्टात गेले होते.

राज्यसभेत कृषी कायद्यांचं समर्थन

राज्यसभेत (8 फेब्रुवारी) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं होतं.

मोदींनी राज्यसभेत कृषी कायद्याचं समर्थन केलं होतं.

राज्यसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी वापरलेल्या 'आंदोलनजीवी' शब्दावरूनही बरीच चर्चा झाली. पंतप्रधानांनी म्हटलं होतं की, काही शब्द आपण नेहमी वापरतो. उदाहरणार्थ- श्रमजीवी, बुद्धिजीवी. पण गेल्या काही काळात देशात एक नवीन वर्ग तयार झाला आहे-आंदोलनजीवी.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)