You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी: भारताच्या चहाची बदनामी करण्यासाठी षड्यंत्र-पंतप्रधान #5मोठ्या बातम्या
विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. भारताच्या चहाची बदनामी करण्यासाठी षडयंत्र-पंतप्रधान
भारताच्या चहाला बदनाम करण्यासाठी परदेशातून मोठं षड्यंत्र रचलं जात असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तसेच देशातील काही लोक परदेशातील या षड्यंत्राला मूक संमती देत असल्याचाही आरोप मोदींनी केला आहे. 'टीव्ही9 मराठी'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "देशाला बदनाम करण्याचं षड्यंत्र रचलं जातंय. षड्यंत्र करणारे इतक्या स्तरावर पोहचले आहे की ते भारताच्या चहाला जगभरात बदनाम करण्यासाठी कट रचत आहेत. हे षड्यंत्र फार नियोजनबद्ध पद्धतीने होत आहे. काही कागदपत्रं समोर आली आहेत. यानुसार परदेशातील काही लोक चहाला आणि लोकांच्या त्याच्यासोबत असलेल्या नात्याला बदनाम करण्याचा कट रचत आहेत. तुम्ही हे पाहून शांत बसणार आहात का? जे या परदेशींना भारतावर हल्ला करण्यास मदत करत आहेत त्यांची साथ द्याल का?"
"प्रत्येकाला उत्तर द्यावं लागेल. जे लोक मौन राहून चहाला बदनाम करणाऱ्या परदेशींना मदत करत आहेत त्यांना देखील यावर उत्तर द्यावं लागेल. इथं उपस्थित असलेला प्रत्येक चहाच्या बागात काम करणारा षडयंत्र करणाऱ्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना चोख उत्तर मिळेल. कट रचणाऱ्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना भारताच्या चहाला बदनाम करता येणार नाही," असंही मोदी म्हणाले.
2. नितीन गडकरी आजपासून इलेक्ट्रिक कार वापरणार
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपली बुलेट प्रूफ गाडी सोडून आता इलेक्ट्रिक कार वापरणार असल्याचे आज जाहीर केले आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
नागपुरात असताना इलेक्ट्रिक कार वापरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात भविष्यात इथेनॉल, बायोडिझेल, इलेक्ट्रिक, बायोफ्यूएल, हायड्रोफ्युएल हे या देशाचे इंधन व्हावे, असे आपले प्रयत्न राहतील असे गडकरी यांनी आज स्पष्ट केले आहे.
इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकी याव्या यासाठी प्रयत्नशील आहोत, असे गडकरी म्हणाले. लिथियम आयर्न बॅटरी असलेली ही इलेक्ट्रिक कार महागडी आहे. त्यामुळे याला पर्याय म्हणून अॅल्यूमिनियम वा स्टील आयर्न वापरता येईल का याविषयी विचार सुरू आहे. या इंधनामुळे 8 लाख कोटींची आयात संपेल. हळूहळू नागपुरात सीएनजींचे पंप सुरू करून प्रदुषणमुक्त करू, असे गडकरी म्हणाले.
3. केंद्राने आम्हाला राज्यपालांविरुद्ध न्यायालयात जाण्यास भाग पाडू नये-राऊत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी घटनाबाह्य वागत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना परत बोलवावं. आम्हाला न्यायालयात जाण्यास भाग पाडू नये असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.
महाविकास आघाडीने बारा आमदारांची केलेली नियुक्ती राजकीय नाही. सरकारने आमदारांची केलेली शिफारस स्वीकारणे राज्यपालांना बंधनकारक आहे. परंतु राज्यपाल कोश्यारी घटनाबाह्य वागत आहेत. केंद्र सरकारने त्यांना परत बोलवावे, अन्यथा आम्हाला न्यायालयात जावं लागेल असं राऊत म्हणाले.
एल्गार परिषद घेणाऱ्यांची मानसिकता पाहायला हवी. एल्गार परिषदेत हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शर्जील उस्मानीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी थांबवलं असतं तर तो महाराष्ट्रात आलाच नसता अशी भूमिका राऊत यांनी घेतली.
4. इंधन करकपात विचाराधीन-निर्मला सीतारामन
सातत्याने होत असलेली इंधन दरवाढ कमी करण्यासाठी करकपातीची बाब केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. मात्र इंधनावर राज्य सरकारच्या करांचा भार अधिक असल्याने संयुक्तपणे त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले.
केंद्र सरकार कर्ज काढून प्रत्येक राज्याला वस्तू व सेवा करातील (जीएसटी) हिस्सा नियमितपणे देत असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आदी इंधनाचे दर गेले काही महिने सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिक महागाईत होरपळत आहेत. त्यांना दिलासा देण्याची मागणी होत असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह देशातील अन्य विरोधी पक्षांनी इंधन दरवाढ रोखण्याची मागणी केली आहे.
इंधन दरवाढीबाबत विचारलेल्या प्रश्नांवर केंद्र सरकारची भूमिका मांडताना सीतारामन म्हणाल्या, "देशातील इंधनाचे दर हे शासनाच्या नियंत्रणाखाली नसून आंतरराष्ट्रीय तेलबाजारातील दरानुसार ते तेल कंपन्यांकडून दररोज निश्चित केले जातात. केंद्र सरकारचा त्यात हस्तक्षेप नाही. इंधनावरील करांचा साधारणपणे विचार केला, तर केंद्र सरकारचा कराचा वाटा 13-14रुपये, तर राज्याचा 30-35 रुपये (प्रति लिटर) असा आहे.
"जर केंद्र सरकारने करकपात केली, तर महसूल वाढीसाठी राज्य सरकार कर दर वाढविण्याची शक्यता आहे. करकपातीचा लाभ पूर्णपणे ग्राहकापर्यंत किंवा जनतेपर्यंत पोचणार का, हा प्रश्न आहे. पण तरीही करकपात करून इंधन दरवाढ कशी रोखायची आणि कोणी आधी कर कमी करायचे, ही बाब विचाराधीन आहे".
5. पालघरमध्ये नौदल अधिकाऱ्याचे अपहरण करून जाळल्याची घटना
एका नौदल अधिकाऱ्याचं अपहरण करुन त्याला जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या नौदल अधिकाऱ्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 'टाईम्सनाऊ मराठी'ने ही बातमी दिली आहे.
नौदल अधिकाऱ्याचे नाव सुरज कुमार दुबे (27 वर्षे) असे असल्याची माहिती समोर आली आहे. हा अधिकारी झारखंडचा निवासी होता.
अपहरणकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत सुरज कुमार दुबे यांचं चेन्नई विमानतळाजवळून अपहरण केलं. अपहरणकर्त्यांनी तीन दिवसांपर्यंत सुरज कुमार दुबे यांना अज्ञातस्थळी ठेवलं होतं. आरोपींनी नौदल अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांकडून 10 लाखांची खंडणी मागितली. मात्र पैसे न मिळाल्याने आरोपींनी सुरज कुमार दुबे यांना पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील जंगलात पेट्रोल टाकून जिवंत जाळले.
जिवंत जाळल्याने सुरज कुमार दुबे हे गंभीर जखमी झाले. एका स्थानिक नागरिकाने सुरज कुमार यांना जंगलात पाहिले आणि त्याची माहिती घोलवड पोलिसांना दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सुरज कुमार यांना तात्काळ डहाणू येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे सुरज कुमार यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका. )