IndvsEng: कुलदीप यादव सर्वोत्तम स्पिनर ते राखीव स्पिनर कसा झाला?

कुलदीप यादव, भारतीय क्रिकेट संघ

फोटो स्रोत, Gareth Copley

फोटो कॅप्शन, कुलदीप यादव
    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

चायनामन या दुर्मीळ पद्धतीने बॉलिंग करणारा कुलदीप यादव भारतीय संघात असतो. मात्र अंतिम अकरात त्याची निवड होत नाही. शेवटची टेस्ट खेळून कुलदीपला दोन वर्ष झाली आहेत.

भारतीय क्रिकेट संघाने दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकण्याचा पराक्रम केला. त्या दौऱ्यातील शेवटच्या टेस्टमध्ये चायनामन स्पिनर कुलदीप यादवने डावात पाच विकेट्स घेण्याची करामत केली.

मॅचनंतर बोलताना प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितलं की विदेशात कुलदीप हा आपला नंबर एकचा स्पिनर असेल. स्वत: प्रशिक्षकांनीच पाठ थोपटल्याने कुलदीपची टेस्ट कारकीर्द बहरेल अशी अपेक्षा होती. मात्र त्या टेस्टनंतर कुलदीपला खेळण्याची संधीच मिळाली नाही.

सर्वोत्तम स्पिनर ते राखीव स्पिनर अशी कुलदीपची अवस्था झाली आहे. संघात नसलेले नेट बॉलर खेळाडूंना संघात समाविष्ट केलं जात आहे पण कुलदीप संघात असूनही अंतिम अकरासाठी त्याचा विचार होत नाही.

कुलदीपच्या शेवटच्या टेस्टनंतर भारतीय संघाने 13 टेस्ट खेळल्या आहेत. मात्र कुलदीपच्या नशिबी संघातल्या खेळाडूंना पाणी, एनर्जी ड्रिंक देणं, टॉवेल, ग्लोव्ह्ज, हेल्मेट-बॉल पुरवणं हेच काम आलं आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात काय झालं?

दुबईत झालेल्या आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय खेळाडू परस्पर ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. कठोर अशी क्वारंटीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भारतीय संघाने वनडे आणि ट्वेन्टी-20 मालिका खेळल्या. कुलदीप या संघांचा भाग नव्हता. टेस्ट मालिकेत चार सामने होणार होते. अॅडलेड, मेलबर्न, सिडनी, ब्रिस्बेन अशा चार टेस्टमध्ये मिळून भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले.

अडलेड टेस्टनंतर कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का शर्माच्या बाळंतपणावेळी बरोबर राहण्यासाठी मायदेशी परतला. मोहम्मद शमीच्या हाताला बॉल लागल्याने तो मालिकेबाहेर गेला.

उमेश यादव, हनुमा विहारी, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, के.एल. राहुल हेही दुखापतग्रस्त झाले. नवदीप सैनीलाही दुखापतीने सतवलं. ब्रिस्बेन टेस्टमध्ये भारतीय संघ फिट 11 खेळाडू उभे करणार का अशी परिस्थिती होती. नेट बॉलर वॉशिंग्टन सुंदर आणि टी.नटराजन यांना संघात समाविष्ट करण्यात आलं.

कुलदीप यादव, भारतीय क्रिकेट संघ

फोटो स्रोत, SAEED KHAN

फोटो कॅप्शन, कुलदीप यादव

सरावादरम्यान बॅट्समनला सराव व्हावा यासाठी बॉलिंग करण्यासाठी घेतलेल्या बॉलर्सना नेट बॉलर म्हटलं जातं. कुलदीप यादव संघात होता. मात्र त्याची निवड झाली नाही. सुंदर आणि नटराजन यांना पदार्पणाची संधी मिळाली. शार्दूल ठाकूर अश्विनच्या जागी खेळला. मात्र कुलदीपच्या नावाचा विचार झाला नाही. संघात आहे पण निवडीसाठी विचार होत नाही अशा विचित्र कोंडीत कुलदीप सापडला.

चेन्नईत काय झालं?

शुक्रवारी इंग्लंडविरुद्धची पहिली टेस्ट चेन्नईत सुरू झाली. टॉसवेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघाबद्दल माहिती दिली. भारतीय संघाने रवीचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाझ नदीम या तीन स्पिनर्सना खेळवण्याचा निर्णय घेतला.

या सीरिजसाठी रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त असल्याने उपलब्ध नाहीये. बॅटिंगही करू शकेल असा स्पिनर म्हणून अक्षर पटेलची संघात निवड करण्यात आली. कुलदीप यादवही संघात होता. रवीचंद्रन अश्विन खेळणं स्वाभाविक होतं.

काही दिवसांपूर्वी ब्रिस्बेन टेस्टमध्ये वॉशिंग्टन सुंदर या स्पिनरने पदार्पण केलं होतं. भारतात मॅच होत असल्याने तीन स्पिनर्स खेळण्याची चिन्हं होती. कुलदीपच्या नावाला पसंती मिळेल असं चित्र होतं. मात्र मॅचच्या काही तास आधी अक्षर पटेलच्या गुडघ्याला दुखापत झाली. यामुळे नेट बॉलर असलेल्या शाहबाझ नदीम आणि राहुल चहर यांना संघात समाविष्ट करण्यात आलं.

कुलदीप यादव, भारतीय क्रिकेट संघ

फोटो स्रोत, Matt King - CA

फोटो कॅप्शन, कुलदीप जी शेवटची टेस्ट खेळला त्यात त्याने डावात पाच विकेट्स घेतल्या होत्या

वॉशिंग्टन बॅटिंगही करत असल्याने त्याच्या नावाला पसंती मिळाली. तिसरा स्पिनर कुलदीप असेल अशी चिन्हं असताना संघव्यवस्थापनाने नदीमची निवड केली. नदीम मूळ संघातही नव्हता. कुलदीप संघात होता मात्र त्याची निवड होऊ शकली नाही.

भारतात टेस्ट मॅच असतानाच तीन स्पिनर्स खेळवता येऊ शकतात. कारण खेळपट्ट्या स्पिनर्ससाठी पोषक असतात. संघात आहे पण निवड होत नाही अशी कुलदीपची अवस्था झाली आहे. नेट बॉलर अंतिम अकरात प्रवेश मिळवून खेळत असताना त्यांचा खेळ पाहणे कुलदीपच्या नशिबी आहे.

वनडेत कुलदीप आणि युझवेंद्र चहल ही जोडी नियमितपणे खेळते. या जोडीला कुलचा असंही म्हटलं जातं. स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशसाठी खेळणारा कुलदीप आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि कोलकात नाईट रायडर्ससाठी खेळला आहे.

26वर्षीय कुलदीपने आतापर्यंत 6 टेस्ट खेळल्या असून, 2017मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला इथं पदार्पण केलं होतं. कुलदीपच्या नावावर 24 विकेट्स आहेत. सरासरी 24.12 तर स्ट्राईक रेट 3.51चा आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)