बजेट 2021 : नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी काय घोषणा झाली?

निर्मला सीतारमन यांनी त्यांच्या बजेट 2021-22 मध्ये नाशिक मेट्रोसाठी 5000 कोटींची तरतूद केली आहे.
त्यामुळे आता मुंबई-पुणे-नाशिक त्रिकोणातील नाशिकमध्येही मेट्रो प्रकल्प आकारास येणार आहे. त्यासाठी 5000 पेक्षा मोठ्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे.
नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक मेट्रोसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्द्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.
"निओ मेट्रो प्रकल्पामुळे नाशिक शहरातील वाहतुकीची समस्या सुटणार असून नाशिक शहरात नव्याने उद्योग येण्यास त्याची मदत होणार आहे. राज्य शासनाने विकास कामांमध्ये राजकारण करून विकास कामांना स्थगिती देण्याची भूमिका बदलावी अशी माफक अपेक्षा यानिमित्ताने करत आहे," असं फरांदे यांनी म्हटलं आहे.
नागपूर मेट्रोसाठी देखील या बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे.
नाशिकच्या बहुचर्चित मेट्रो निओला 28 ऑगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील मिळाला आहे.
नाशिकमध्ये सार्वजनिक वाहतूक जलद व्हावी यासाठी विधानसभेत मेट्रो प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. आता हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या दिशेनं पावलं पडू लागली आहेत.
तब्बल 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला हा मेगा प्रोजेक्ट आहे. पण राज्यातील इतर मेट्रो प्रकल्पांपेक्षा नाशिक मेट्रो एका बाबतीत वेगळी असणार आहे.
नाशिकमध्ये येऊ घातलेली ही मेट्रो निओ चक्क रस्त्यावरूनही धावणार आहे. कारण या मेट्रोची चाकं धातूची नाही, तर आपल्या गाड्यांप्रमाणे रबराची असतील. शहरातील दोन प्रमुख मार्गांवर ही टायर-बेस मेट्रो धावणार आहे.
नाशिक 'मेट्रो-निओ' प्रणालीची ठळक वैशिष्ट्ये
1. गंगापूर ते नाशिक रेल्वेस्टेशन (22 कि मी/19 स्थानके) आणि गंगापूर-मुंबई नाका (10 किमी/10 स्थानके) यादरम्यान उन्नत मार्गावर धावणार.
2. स्वयंचलित दरवाजे, एकस्तर बोर्डिग (Level Boarding ), आरामदायी आसने , प्रवासी माहिती फलक इत्यादी व्यवस्था
3. 18 ते 25 मीटर वातानूकूलित विजेवर चालणारे कोच (रबरी टायर/600 ते 750 V DC Over Head traction), 200 ते 300 प्रवासी क्षमता.
4. स्थानकांवर जिना, उद्वाहक (Lift) आणि सरकता जिना ( Escalator) राहील. रस्त्यांवर प्रवाशांविषयी माहितीचा डिस्प्ले.
5. मुंबई नाका व्हाया गरवारे ते सातपूर कॉलनी (12 किमी) आणि नाशिक स्टेशन ते शिवाजीनगर व्हाया नांदूर नाका (12 किमी) या दोन मार्गांवर बॅटरीचलित फीडर बससेवा.
6. बसेस मुख्य कॉरिडॉरवरून जाताना चार्ज होतील व प्रवास सुकर करतील. याकरिता स्वतंत्र चार्जिंग व्यवस्थेची गरज राहणार नाही.
7. मेट्रोच्या किमतीच्या तुलनेत ( 250 ते 400 कोटी रुपये प्रति किमी) या नवीन प्रणालीची किंमत अंदाजे 60 कोटी रूपये प्रति किमी असेल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








