मानसिक आरोग्य : कोरोनामुळे एकटेपणाचा त्रास अधिक तीव्रतेनं जाणवायला लागला आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जाह्नवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"मला फक्त कुणाशी तरी बोलावंसं वाटतं गं.. फोनवरून नाही, समोरासमोर बसून. शंभर लोकांशी बोलत असेन मी रोज. पण आपल्यासोबत कोणीच नाही, ही जाणीव त्रास देत राहते."
अवघ्या बावीस वर्षांची अर्चिता मला सांगत होती. एरवी खळखळून हसणारी ती एकटेपणानं कोमेजल्यासारखी झाली होती.
वर्षभरापूर्वी अर्चिताला पहिली नोकरी लागली आणि ती पुण्याला एका मावशीकडे राहून काम करू लागली. नव्या घराशी, नव्या शहराशी आणि नव्या माणसांशी जुळवून घेताना, तिला अडचणी आल्या. पण हळूहळू अर्चिता त्यात रमू लागली होती. मात्र तेवढ्यात कोरोना विषाणूची साथ पसरली आणि लॉकडाऊन झालं.
अर्चिता तेव्हा घरात एकटीच होती. पुढचे तीन महिने तिला एकटीनंच काढावे लागले. सोसायटीच्या नियमांमुळे सुरुवातीला तर खाली आवारात जाणंही फारसं होत नव्हतं. पण नंतरही इमारतीतले काही लोक सोडले तर प्रत्यक्ष माणसांचा चेहरा दिसत नव्हता.
आयटीक्षेत्रात वर्क फ्रॉम होममुळे तिचं ऑफिस अजूनही बंदच आहे. हळूहळू सगळं पूर्वपदावर येतंय, पण एकटेपणाची भावना जात नाहीये अशी तिची तक्रार आहे.
अर्चिता एकटीच नाही. कोव्हिडमुळे समाजातला वावर कमी झाल्यानं जवळपास प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात एकटेपणा जाणवला आहे.
एकटेपणाची त्सुनामी
अर्थात, कोव्हिडची साथ येण्याआधी एकटेपणा नव्हता, असं नाही. पण या साथीमुळे एकटेपणाविषयी बोलणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे, असं जगभरातले अभ्यासक सांगतात.

तसं कोव्हिडची साथ येण्याआधी एकटेपणाच्या भावनेचं वर्णन 'loneliness epidemic' म्हणजे एकटेपणाची साथ असं केलं जायचं. एकटेपणाची साथ. काहीजण याला 'एकटेपणाची त्सुनामी'ही म्हणू लागले आहेत.
अर्थात एकटं असणं, एकटेपणा जाणवणं आणि सतत एकाकी वाटणं यातही फरक आहे.
मीडियात काम करणाऱ्या किरणचं उदाहरण घ्या. "मला एकटं राहणं आवडतं, एकटं असतानाही मी वेगवेगळ्या गोष्टींत मन रमवू शकतो. मला उलट त्यात वेगळं स्वातंत्र्य वाटतं आणि मी अधूनमधून लोकांना प्रत्यक्ष भेटतो किंवा फोनवरून तरी संपर्कात राहतो, त्यामुळे दुरावल्याची भावना कधी वाटत नाही."
रोजच्या जगण्यात एकटेपणाचा त्रास होत नसला, तरी काही क्षण असे असतात, जेव्हा किरणला एकटं असल्याचं जाणवतं.
"समजा काही जोक वाचला किंवा काही हसण्यासारखं घडलं, तर ते शेअर करायला तिथे सोबत कुणी नसतं. एकटेपणाची जाणीव करून देणारे क्षण तेव्हा अस्वस्थ करून जातात. पण वयानुसार तुम्ही या भावनेशी जुळवून घेणं शिकता."

फोटो स्रोत, Thinkstock
"एकटं राहात असाल, तर समाजही तुम्हाला सतत तुम्ही एकटे असल्याची जाणीव करून देत असतो. म्हणजे एकटेपणचा त्रास झाला नाही, तरी त्यावर लोकांच्या प्रतिक्रियांना तोंड देत राहावं लागतं"
एकटेपणा केवढा सकारात्मक?
एकटेपणा नेहमीच वाईट असतो असंही नाही. काहीवेळा सगळ्या आवाजांपासून, जबाबदाऱ्यांपासून दूर जावं, एकट्यानं काही काळ घालवावा, असं अनेकांना वाटतं.
माणसाला समाजाची आवड वाटण्यासाठी अधूनमधून एकटेपणा गरजेचा वाटतो, असं सोशल न्यूरोसायंटिस्ट जॉन कॅचिप्पो सांगतात.
"एकटेपणामुळे आपल्याला इतरांशी जुळवून घेण्याची सवय होते. तहान लागल्यावर आपण पाणी शोधतो, तसं तुम्ही एकटे असाल तर सोबतीचा शोध घेता."
एकांतात राहणं एखाद्याला मन एकाग्र करायला मदत करू शकतं. त्यामुळेच लोक एकट्यानं ध्यानधारणा करण्यासाठी जातात किंवा लेखक, कवी आपली प्रतिभा एकांतात फुलते असं सांगताना दिसतात. एकटेपणा या विषयावरही कलाकृती निर्माण झाल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
जावेद अख्तर यांनी लिहिलेलं सिलसिला चित्रपटातलं 'मै और मेरी तनहाई असो' किंवा दिल चाहता है या चित्रपटातलं सोनू निगमनं गायलेलं 'तनहाई' हे आर्त गाणं असो. एकटेपणाच्या या रोमँटिक कल्पनाही आहेतच.
वंदना पत्रकारितेत आहेत आणि गेल्या कित्येक वर्षांपासून एकट्याच राहतात. त्यांचा एकटेपणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. "मी एकटी राहते, पण एकाकी नाही. कारण मला स्वत:ची सोबत आवडते. मी दिवसभर एकटीच राहू शकते. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये एकटं राहावं लागलं, तेव्हा जुळवून घेण्यात काहीच अडचण आली नाही."
अर्थात एरवी स्वतःहून एकटं राहणं वेगळं आणि तुमच्यावर जाणूनबुजून समाजापासून दूर राहण्याची वेळ येणं वेगळं, असंही त्या स्पष्ट करतात.
वंदना सांगतात, "कोव्हिडच्या काळातलं एकटं राहणं हे लादलेलं एकाकीपण आहे. एरवी तुम्ही एकटंच फिरायला जाऊ शकत होता, सध्या तसं काही करताना विचार करावा लागतो. तुम्हाला आईवडिलांना भेटावं, त्यांना मिठी मारावी, मित्रांशी बोलावं असं वाटलं की, आधी ते करणं सहज होतं. पण आता ते शक्य नाही."
सतत एकटेपणा जाणवत राहिला, तर मात्र ते आरोग्यासाठी घातक ठरतं.
एकटेपणाचा आरोग्यावर परिणाम
मनोविकारतज्ज्ञ डॉ. अमृता करंडे-पाटील सांगतात, "एकटेपणा ही आजारापेक्षा एक मनोवस्था आहे. ती एक अशी स्थिती आहे जी कमी अधिक प्रमाणत प्रत्येकालाच कधी ना कधी जाणवते. पण एकटेपणा फार जास्त काळ जाणवत राहिला, तर ते मानसिक आरोग्यासाठी त्रासदायक ठरतं. त्यालाच क्रॉनिक लोनलीनेस म्हणता.
असा दीर्घकाळ जाणवत राहिलेला एकटेपणा हे एखाद्या मानसिक आजाराचं लक्षणही असू शकतं आणि त्यामुळेच त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही."

फोटो स्रोत, Getty Images
एकटेपणाचा शारिरीक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. आजवरच्या अनेक संशोधनांतून एकटेपणाचा संबंध नैराश्यापासून ते हृदयविकारापर्यंत अनेक आजारांशी जोडला गेल्याचं दिसून आलं आहे.
एकटेपणामुळे मधुमेह, झोप न लागणं, उच्च रक्तदाब, अशा समस्या वाढू शकतात. व्यसनाधीनतेच्या मुळाशीही अनेकदा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा एकटेपणा हे कारण असू शकतं.
तरुणांमध्येही एकटेपणाची भावना
वयस्कर व्यक्तींना जाणवणाऱ्या एकटेपणाविषयी नेहमी बोललं जातं. निवृत्तीनंतर, मुलं आपापल्या जगात रमल्यावर किंवा जोडीदाराच्या मृत्यूनंतर एकटेपणा जाणवू शकतो. जपान, ब्रिटनसारख्या देशांत, जिथे वृद्धांची संख्या जास्त आहे, तिथे अशा प्रकारच्या एकटेपणाविषयी सतत चर्चा होत असते.
ब्रिटनमध्ये तर 'मिनिस्टर ऑफ लोनलीनेस' म्हणून बॅरोनेस डायना बॅरन यांची नेमणूकही करण्यात आली.
त्यामुळे एकटेपणा हा प्रामुख्यानं उतारवयात किंवा एकटं राहणाऱ्या व्यक्तींनाच जाणवतो, अशी अनेकांची समजूत बनते.
पण बीबीसीच्या एका प्रयोगात सहभागी झालेल्या लोकांमध्ये 16 ते 24 वर्षे वयोगटातील चाळीस टक्के जणांनी त्यांना अनेकदा एकटेपण जाणवत असल्याचं म्हटलं आहे. 75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या गटात हेच प्रमाण 27 टक्के आहे.
तरुण वयात अनेक भावनिक उलथापालथींना सामोरं जावं लागतं. त्यातच शिक्षण-नोकरीसाठी घरापासून दूर राहावं लागणं, नवीन जागेशी जुळवून घेताना त्रास होणं, ऑफिसमधला संघर्ष, जोडीदार शोधण्याचा किंवा लग्नाचा दबाव, समजून घेतील अशा मित्रांचा अभाव अशा अनेक कारणांमुळे हा एकटेपणा वाटू शकतो.
अर्थात, हे सर्वेक्षण ऑनलाईन होतं आणि ज्यांना एकटं वाटतं ते इथे व्यक्त होण्याचं प्रमाण जास्त असू शकतं. पण एकटेपणा देश, संस्कृती, जीवनपद्धती, लिंग, वय यांवर अवलंबून नाही, हेच त्यातून दिसून येतं.
सततच्या एकटेपणाची लक्षणं
एकटेपणा ही तसा व्यक्तीसापेक्ष असतो. म्हणजे त्याची कारणं आणि परिणाम व्यक्तीनुसार बदलू शकतात. पण तुम्हाला पुढे नोंदवलेल्या काही गोष्टी सातत्यानं जाणवत असतील, तर ते एकटेपणामुळे घडत असू शकतं. त्यावर मात करण्यासाठी तुम्ही समुपदेशकांची मदतही घेऊ शकता.
- एखाद्याशी जुळवून घेण्यात किंवा भावनिक जवळीक साधण्यात असमर्थता.
- कुटुंबीय किंवा जवळचे मित्र-मैत्रिणी नसणं, किंवा ते असले तरी त्यांच्यासोबत जास्त खोलवर भावनिक नातं नसणं. ज्यांना तुम्ही सर्वकाही सांगू शकता अशा व्यक्तींचा अभाव असणं.
- एकाकीपणची किंवा सर्वांपासून दूर राहात असल्याची भावना, स्वतःच्याच विश्वात अडकल्याची भावना
- स्वतःवरच अविश्वास असणं, कमीपणाची भावना
- तुम्ही एखाद्याशी जुळवून घेण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करत असताना समोरच्या व्यक्तीनं साथ न देणं
- समाजात वावरताना माणसांत असूनही एकटं वाटणं.
एकटेपणाचा सामना कसा करायचा?
- एकटेपणा जाणवत असल्याचं मान्य करा.
- बोलत राहा. मित्र मैत्रिणींशी किंवा कुटुंबाशी संपर्कात राहा. तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल तर ते त्यांना सांगा.
- समुपदेशकांची मदत घ्या. तुम्ही आपल्या बॉस किंवा सहकाऱ्यांना तुम्हाला होत असलेल्या त्रासाची कल्पना दिली, तर ते मदतही करू शकतात.
- इंटरनेटमुळे लोक जवळ आले आहेत. एखाद्या सपोर्ट ग्रुपमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता, सोशल मीडियावर व्यक्त होऊ शकता. पण किती काळ इंटरनेटचा वापर करावा यावर नियंत्रण ठेवा.
- एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी व्हा. एखाद्या समाजोपयोगी मोहिमेतील सहभाग तुम्हाला फक्त समाधानच नाही, तर नवीन लोकांना भेटण्याची संधीही देऊ शकते.
- एखादा छंद जोपासा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करत राहा. आनंदाची भावना एकटेपणा कमी करणारी असते.
- स्वतःची काळजी घ्या. व्यायाम आणि सकस जेवण करा. चांगली झोप मिळेल असा प्रयत्न करा.
- दिवसातला काही काळ सूर्यप्रकाशात जरूर घालवा.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








