बर्ड फ्लू - 5500 कोंबड्यांचं होणार कलिंग, जाणून घ्या कलिंग म्हणजे काय?

फोटो स्रोत, Hindustan Times
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, परभणी, बीबीसी मराठी
परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात 800 कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. बर्ड फ्लूची लागण इतर पक्ष्यांना होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने गावाच्या 1 किमी परिसरातील कोंबड्यांचं कलिंग करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जवळपास 5500 कोंबड्यांचं कलिंग होणार असल्याची माहिती प्रशासनानं बीबीसीला दिली आहे.
मुरुंबा गावातील 800 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्यात या कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'नेच झाल्याचं निदान करण्यात आलं.
हा अहवाल येताच प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. खबरदारी म्हणून मुरुंबा गावच्या एक किलोमीटर परिसरातील हजारो कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत. जेसीबीने खड्डा खणून त्यात या कोंबड्या पुरण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तसंच गावाच्या 10 किमी परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यामुळे या परिसरात कोंबड्या किंवा अंडी यांची ने-आण करण्यास मनाई असेल असं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं आहे.
मुरुंबा गावात बर्ड फ्लूनं शिरकाव केल्यानं हे गाव संसर्गित म्हणून घोषित करण्यात आलं आहे. इथल्या कोंबड्यांचं सर्व्हेक्षण करण्यात येणार असून कोंबड्या, अंड्यांची वाहतूक आणि खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आहे.
प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफ कंटेजिअस डिसिज इन अॅनिमल अॅक्ट 2009 नुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. जोपर्यंत हा परिसर संसर्गमुक्त घोषित केला जात नाही तोपर्यंत खबरदारीचे उपाय पाळण्यात येतील.
बर्ड फ्लू काय आहे?
'बर्ड फ्लू' हा आजार H5N1 या व्हायरसमुळे होतो. याला एव्हियन इनफ्लूएन्झा म्हणतात. मुख्यतः हा विषाणू बदकं, कोंबड्या आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळतो आणि तो संसर्गजन्य आहे. अनेकदा स्थलांतरित पक्ष्यांमुळे संसर्ग पसरण्याचं क्षेत्र वाढतं तो माणसांमध्येही पसरू शकतो.

फोटो स्रोत, AFP
1997मध्ये बर्ड फ्लूचं माणसांतल्या संसर्गाचं पहिलं प्रकरण आढळलं होतं. हाँगकाँगमधल्या पक्षी बाजारापासून याची सुरुवात झाली होती. या विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे त्यावेळी 60 टक्के लोकांचा मृत्यू झाला होता.
पण हा बर्ड फ्लू माणसांमध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे सहजासहजी पसरू शकत नाही. जे लोक एकमेकांच्या अगदी जवळच्या संपर्कात असतात, त्यांच्यातच याचा संसर्ग पसरल्याचं आढळून आलंय.
कलिंग म्हणजे काय?
संसर्ग झालेले पाळीव पक्षी जसे की कोंबड्या किंवा बदक यांना सामूहिकरीत्या नष्ट करणे. त्याचबरोबर जे निरुपयोगी पक्षी आहेत त्यांना देखील विविध प्रकारे नष्ट केलं जातं.
केवळ अंडी उत्पादनासाठी असलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये नर जातीच्या कोंबडीच्या पिल्लांना सुरुवातीलाच नष्ट केलं जातं.

फोटो स्रोत, SEBASTIAN D'SOUZA
परभणी जिल्ह्यात जे कलिंग होणार आहे ते पक्ष्यांचं मान मुरगळून केलं जाणार आहे. कोंबड्यांच्या माना मुरगुळून त्यांची तत्काळ हत्या करण्यात येणार आहे आणि नंतर त्यांना मोठा खड्डा खणून त्यात पुरलं जाईल. यामुळे इतर पक्ष्यांना संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.
मुरुंबा येथे बर्ड फ्लूमुळे पक्षी मेल्यानंतर या गावाच्या एक किमी परिसरातील कोंबड्यांचं कलिंग केलं जाणार आहे.
उत्पादकांचे नुकसान
शेतीबरोबरच कुक्कटपालन हा जोडधंदा म्हणून केला जातो. मुरुंबामध्ये स्वयं सहाय्यता गटाच्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने बचत गटाचं मोठं नुकसान झालं आहे.
बर्ड फ्लूच्या बातमीचा परिणाम अंडी आणि चिकन विक्रीवर झाला आहे. परभणी जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्राबाहेर चिकन विक्री सुरू आहे, पण बर्ड फ्लूच्या भीतीमुळे चिकनचे भाव कोसळले आहेत.
खबरदारीचे उपाय
- सर्व शेतकरी आणि पशुपालकांना बर्ड फ्लू बद्दल माहिती द्यावी.
- पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बाजारात सर्वेक्षण मोहीम सुरू करावी.
- संशयित क्षेत्रातून पशु-पक्ष्यांची ने-आण बंद.
- बर्ड फ्लू सर्वेक्षण मोहीम जिल्हा पातळीवर सुरू करावी.
- जिल्हास्तरीय दक्षता पथकांची स्थापना करावी.
- पक्षी, कावळ्यांमध्ये किंवा परिसरातील कोंबड्यांमध्ये आणि कुक्कुटपालन ठिकाणांवर असाधारण पक्षांचे मृत्यू होत असल्याचं आढळून आल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा.
कावळ्यांचा सर्वांत जास्त मृत्यू
दरम्यान बर्ड फ्लूमुळे राज्यात सर्वांत जास्त कावळ्यांचा मृत्यू झाल्याचं पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी सांगितलं आहे.
यामुळे कुक्कूटपालन व्यावसायाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोल्ट्री उद्योगाला विम्याचं कवच देण्याची गरजेही त्यांनी बोलून दाखवली आहे.
ज्या पक्षांचा मृत्यू झालाय त्यांची योग्या विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती केदार यांनी दिली आहे. तसंच चिकन आणि अंडी खाताना योग्य ती खबदारी घेऊन खा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








