तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना अहमदनगर पोलिसांनी सुपा टोलनाका परिसरातून ताब्यात घेतलं आहे. त्यांना सध्या सुपा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.

शिर्डी देवस्थानकडून ड्रेसकोडसंबंधी लावण्यात आलेल्या बोर्डविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना ताब्यात घेतलं आहे.

तृप्ती देसाई यांनी शिर्डीत येऊन साई संस्थानाने लावलेला आवाहनाचा फलक काढण्याचा इशारा दिला होता.

"शिर्डी येथील मंदिर आवारामधील महिलांच्या वेशभूषेबाबत जो बोर्ड लावण्यात आला आहे. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही तिथे जाऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. तो बोर्ड लवकरात लवकर लवकर हटवला जावा, अन्यथा आम्ही आणखी तीव्र लढा उभारणार," असा इशारा तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.

प्रकरण काय आहे?

लॉकडाऊनच्या काळात बंद असेलली मंदिरं पुन्हा एकदा खुली करण्यात आली असून ठिकठिकाणी दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्या आहेत. शिर्डीमधील साई मंदिरही दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

शिर्डीमध्ये फक्त राज्य नाही तर देश विदेशातून लोक दर्शनासाठी येत असतात. दरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तसा फलकच मंदिराबाहेर लावण्यात आला आहे.

मंदिरात येताना भक्तांनी सभ्य पोषाख परिधान करावा, असं आवाहन संस्थानकडून करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार मिळाल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.

"मंदिरातले पुजारी अर्धनग्न असतात मग भक्तांच्या कपड्यांवर निर्बंध का घातले जात आहेत?" असा प्रश्न तृप्ती देसाई यांनी साई संस्थानला विचारला होता.

साई संस्थानाने केलेल्या या आवाहनावर बोलताना तृप्ती देसाई यांनी म्हटलं की, "मंदिरात प्रवेश करताना कोणत्या प्रकारचे कपडे असले पाहिजेत त्याचं भान भक्तांना आहे."

तृप्ती देसाई यांनी आतपर्यंत वेगवेगळी आंदोलनं केली आहेत. त्या नेमक्या कोण आहेत आणि कुठली कुठली आंदोलनं त्यांनी केली आहेत ते वाचण्याासाठी इथं क्लिक करा - तृप्ती देसाई कोण आहेत?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)