लोकांचा बँकांवरचा विश्वास उडलाय का?

लक्ष्मीविलास बँक

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, आक्रिती थापर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गेल्या 15 महिन्यांमध्ये भारतातल्या 3 मोठ्या बँका या त्यांच्यावरच्या बुडीत कर्जांच्या ओझ्याखाली दबून कोलमडल्या. भारतीय बँकांच्या आर्थिक परिस्थितीविषयीचे प्रश्न यामुळे विचारले जातायत.

"आधी आमच्या धंद्याला कोव्हिड-19चा फटका बसला. दोन महिने काहीच उत्पन्न नव्हतं. आणि आता आमची बँक धोक्यात आल्याने आम्हाला आमचेच साठवलेले पैसे काढता येत नाहीत किंवा रोजचे व्यवहारही करता येत नाहीयेत. आमच्या कर्मचाऱ्यांचा पगार आता आम्ही कसा द्यायचा, हे कळत नाही," 50 वर्षांचे मांगिलाल परिहार सांगतात. निर्बंध आणण्यात आलेल्या लक्ष्मीविलास बँकेत त्यांचं खातं आहे.

मुंबईच्या उपनगरात मांगिलाल यांचं एक लहानसं दुकान आहे.

बचत योजनांवरचा आकर्षक व्याजदर आणि दुसरं म्हणजे घरापासून या बँकेची शाखा किती जवळ आहे, या दोन गोष्टींचा विचार करून साधारणपणे भारतामध्ये बँकेची निवड केली जाते.

परिहार यांनीदेखील हाच विचार करून बँक निवडली. याच 94 वर्षं जुन्या लक्ष्मीविलास बँकेवर रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात निर्बंध आणले आणि खात्यातून पैसे काढताना जास्तीत जास्त 25 हजार काढण्याची मर्यादा घातली. बँकेच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहत हा निर्णय घेण्यात आला.

अशी परिस्थिती आपल्यावर ओढावण्याची ही पहिली खेप नसल्याचं परिहार सांगतात. आठ वर्षांपूर्वी त्यांची गुंतवणूक असणाऱ्या दोन सहकारी बँका बुडित गेल्याने त्यांचे पैसे दोन वर्षांसाठी अडकले होते.

गेल्या 15 महिन्यांत अशी परिस्थिती ओढावलेली लक्ष्मीविलास ही तिसरी बँक आहे.

सप्टेंबर 2019मध्ये पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (PMC) धोक्यात आली. या बँकेत झालेल्या आर्थिक घोटाळ्यांची चौकशी करण्यात येतेय.

2020च्या मार्च महिन्यामध्ये देशातली पाचव्या क्रमांकाची मोठी बँक असणाऱ्या येस बँकेवर निर्बंध लावण्यात आले होते.

लक्ष्मीविलास आणि येस बँक या दोन्हींबाबत रिझर्व्ह बँकेने तातडीने तोडगा काढला. लक्ष्मीविलास बँक डीबीएस या सिंगापूरच्या सगळ्यांत मोठ्या बँकेत विलीन करण्यात येणार आहे. त्यानंतर डीबीएस लक्ष्मीविलास बँकेत नवीन भांडवल ओतेल.

पण PMC बँकेच्या ग्राहकांना मात्र अजून दिलासा मिळालेला नाही.

पीएमसी बँक आंदोलन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आपल्याला न्याय मिळावा म्हणून पीएमसी बँकेच्या ठेवीदारांनी आंदोलनं केली.

53 वर्षांच्या विद्या मेरवाड त्यांपैकीच एक. बँक बुडित गेलेल्याला आता 14 महिने उलटले आहेत. ट्यूशन्स घेऊन घर चालवणाऱ्या मेरवाड सध्या आपण म्हाताऱ्या आईकडून पैसे घेऊन घर चालवत असल्याचं सांगतात.

त्यांच्या नवऱ्याची ऑटो रिपेअरिंग कंपनीच्या उत्पन्नातून आणि ट्यूशन्सच्या फीमधून केलेली बचत बँकेत अडकलीय. परिणामी त्यांच्या लेकीचं जर्मनीत शिकण्याचं स्वप्न आणि लेकाचं लग्नही खोळंबलेलं आहे.

"आमची सगळी आयुष्यभराची कमाई एका फटक्यात गेली. आता कसं जगायचं आम्ही," त्या विचारतात.

ठेवीदारांवर असणाऱ्या पैसे काढण्याच्या रकेमवरचे निर्बंध शिथील करत आरबीआयने ही रक्कम वाढवली असली, तरी हे पुरेसं नसल्याचं मेरवाड यांच्यासारख्या अनेकांना वाटतं.

बँका का अडचणीत येतायत?

गेल्या काही वर्षांमध्ये बँकांवर असणारं बुडित कॉर्पोरेट कर्जांचं ओझं वाढल्याचं जगजाहीर आहे. आतापर्यंत बँकांनी अब्जावधी रुपयांची कर्जं बुडित म्हणून जाहीर केली आहेत.

बँका उद्योगांना सढळपणे कर्ज देत असल्याने बुडित कर्जांचं प्रमाण वाढल्याचं काही अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे. बँक अधिकाऱ्यांचं 'वाजवीपेक्षा जास्त सकारात्मक असणं आणि उतावीळपणा' ही बुडित कर्जांमागची महत्त्वाची कारणं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांनी म्हटलं होतं.

"बँकांच्या अडचणीत येण्याकडे सध्याच्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीच्या दृष्टीकोनातून पाहणं गरजेचं आहे. भारतीय अर्थव्यवस्था मंदावतेय (त्यात कोव्हिड 19च्या अडचणींमुळे भर पडलीय) यामुळे बँकंकडची थकित कर्जं वाढलेली आहेत," असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी मुख्य अर्थतज्ज्ञ ब्रिंदा जहागीरदार सांगतात.

"कर्ज थकण्याचं दुसरं कारण म्हणजे योग्य कारभार नसणं, ढिसाळ मॅनेजमेंज आणि बँकेच्या बोर्डाने परिस्थितीकडे दुर्लक्ष करणं. सगळ्या पातळ्यांवरची जबाबदारी आणि दायित्वं वाढवून यावर तोडगा काढता येऊ शकतो," त्या पुढे सांगतात.

पण असं असलं तरी एकूण भारतीय बँकिंग व्यवस्था ही भक्कम पायावर उभी असल्याचं जहागीरदार सांगतात.

गेल्या काही वर्षांमध्ये बँकिंग व्यवस्थेतल्या प्रणाली आणि प्रक्रियांमध्ये बदल करून त्या अधिक चांगल्या करण्यात आलेल्या आहेत. तर कर्ज देणाऱ्यांना मदत व्हावी आणि कर्ज वसूल करता यावीत यासाठी पहिला 'बँकरप्सी' (Bankruptcy - दिवाळखोरी) कायदाही 2016मध्ये मंजूर करण्यात आला होता.

पण असं असलं तरी ठेवीदारांच्या मनातली भीती गेलेली नाही.

पेशाने बिझनेस एक्झिक्युटिव्ह असणाऱ्या जलजा मेहतांना नियतीने दोनदा तडाखा दिलाय. त्यांची खाती असणाऱ्या दोन बँका - PMC आणि येस बँक एका पाठोपाठ धोक्यात आल्या.

"आता असं वाटतं की बँकेमध्ये कमी रक्कमच ठेवावी आणि साठवलेले जास्त पैसे स्वतःसोबत घरीच ठेवावेत," त्या सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)