शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत काय बोलले?

फोटो स्रोत, Supriyasule/instagram
राज्याच्या राजकारणात शरद पवारांचा वारसदार कोण? पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र कोणाकडे जाणार? ही चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच सुरू असते. पवारांचा उत्तराधिकारी कोण होणार, सुप्रिया सुळे की अजित पवार? अशी चर्चा नेहमीच ऐकायला मिळते.
मात्र, "सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नसल्याचं," वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय.
शरद पवार यांनी, लोकमत समुहाचे प्रमुख विजय दर्डा यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत पवारांनी राज्यातील विविध राजकीय आणि सामाजिक मुद्यांवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली.
'सुप्रियांची आवड केंद्रातील राजकारण'
2019 च्या निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात शरद पवारांना सुप्रिया सुळेंना महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून पाहायची इच्छा असल्याची चर्चा सुरू झाली होती.
सुप्रिया सुळेंना राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून तुम्ही पहाता का? या प्रश्नाचं उत्तर देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, "माझ्या माहितीप्रमाणे, त्यांना राज्यात फारसा रस नाही. त्यांना केंद्रातील, संसदेच्या राजकारणाची आवड आहे. तिला अनेकवेळा उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळाला आहे. प्रत्येकाची एक आवड असते. तिची आवड, केंद्रातील राजकारण आहे."

फोटो स्रोत, Supriya Sule/facebook
शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण?
अनेकवेळा चर्चा होते की पवारांनतर कोण? आपणही नव्या पिढीकडे नेतृत्वाची सूत्र सोपवली पाहिजे असं म्हणता. या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवार म्हणाले, "राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठ्या संख्येने तरूण आहेत. मी अनेक नावं सांगू शकतो, अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे अशी नावांची मालिका मी घेऊ शकतो. असे अनेक लोक पक्षामध्ये नेतृत्व करू शकतात."
राज्यातील राजकारणावरच नाही, शरद पवारांनी देशाच्या राजकारणावर या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
मोदींविरोधात विरोधक एकत्र येणार?
या देशात नरेंद्र मोदी, सोनिया गांधी आणि तुम्ही स्वत: असे तीन मोठे नेते आहेत. एकत्र येऊन चर्चा करावी, तुम्ही याचं नेतृत्व करावं असं वाटत नाही का? यावर पवार म्हणाले, "सर्वांनी एकत्र बसलं पाहिजे याच्याशी मी सहमत आहे. त्यातून पर्यायी शक्ती निर्माण केली पाहिजे ही तुमची भावना मान्य आहे. एकत्र बसून कोणी याची जबाबदारी घ्यायची हा निर्णय घेऊ. मग, तो सर्वांना मान्य असणारा कोणीही असू शकेल."
मग, आज देशातील विरोधकांची जी परिस्थिती पाहायला मिळत आहे, त्याला तुम्ही स्वत:ला जबाबदार मानता का? "आम्ही सर्वच जबाबदार आहोत. मला असं वाटतं की योग्यवेळी या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल. आणि ती वेळ फार लांब नाही. संसदेच अधिवेशन जवळ येतंय. त्यावेळी एकत्र येण्याची आणि चर्चा करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे." असं शरद पवार पुढे म्हणाले.
सर्वजण एकत्र आले तर मोदींच्या नेतृत्वाला धक्का लागू शकतो अशी परिस्थिती आहे का? यावर बोलताना पवार म्हणाले, "कोणा एका व्यक्तीचा द्वेश, विरोधाला विरोध ही भूमिका घेऊन चालणार नाही. पर्याय देण्याआधी पर्यायी कार्यक्रम दिला पाहिजे. लोकांना त्या कार्यक्रमातून विश्वास दिला पाहिजे. आम्ही काय करणार? नेतृत्व कोणत्या रस्त्याने जाणार, याचा विचार करायला हवा."

फोटो स्रोत, Supriya Sule/facebook
कृषी कायद्याबद्दल पवारांची भूमिका काय?
मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात पंजाबमधील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. कृषी कायदे रद्द करा या मागणीसाठी गेले सात दिवस त्यांनी दिल्लीला वेढा दिलाय. केंद्र सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरतेय. मोदींच्या कृषी कायद्याबद्दल पवारांची भूमिका काय? कॉंग्रेस राष्ट्रवादीचा शेतकरी कायद्याला विरोध का?
यावर बोलताना पवार म्हणाले, "आमचा या कायद्यांना सरसकट विरोध नाही. शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्यासाठी स्वातंत्र्य असावं या भूमिकेला माझा विरोध नाही."
"राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि उत्तरेकडील राज्यात फरक आहे. आपल्याकडे ठरलेली किंमत देण्याचं बंधन खरेदी करणाऱ्यावर आहे. उत्तरेकडील शेतकऱ्यांची तक्रार आहे की, माल घेतल्यानंतर 25 टक्के पैसे दिले जातात आणि बाकी 2 महिन्यांनंतर देण्यात येतात. शेतकऱ्यांची मागणी आहे की, मालाची किंमत तात्काळ मिळाली पाहिजे असं बंधन सरकारने घालावं."
"केंद्राच्या नवीन कायद्यात अशा प्रकारच्या सक्तीचा अभाव आहे. याविरोधात पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांच्या तिव्र भावना आहेत," असं पवार पुढे म्हणाले.

देशात कॉंग्रेसचं भवितव्य काय?
देशपातळीवर फक्त पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसचं सरकार आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेस सत्तेची वाटेकरी असली तरी सत्ता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या हातात आहे.
बिहारमध्ये कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. कर्नाटक, मध्यप्रदेशात भाजपने कॉंग्रेसच्या हातून सत्तेचा घास हिसकावून घेतल्याचं आपण पाहिलंच आहे.
देशात कॉंग्रेसचं भवितव्य काय? राहुल गांधींना काही अडचण आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवार म्हणाले, " पक्षाच्या नेतृत्वाला संघटनेत मान्यता किती आहे याच्यावर काही गोष्टी अवलंबून आहेत. कॉंग्रेसजनांमध्ये अजूनही गांधी-नेहरू घराण्यांसंबंधीची आस्था आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी त्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे बहुसंख्य लोक त्यांच्या विचाराचे आहेत."
राहुल गांधी यांच्या नेतृत्वक्षमतेवर वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात. त्यामुळे देश राहुल गांधी यांचं नेतृत्व मानायला तयार आहे का? या प्रश्नावर पवार पुढे सांगतात, "त्यात काही प्रश्न आहेत. थोडी सुसंगतता कमी दिसून येते."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








