You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोनू निगम - माझ्या मुलाने भारतात काम करू नये : #5मोठ्याबातम्या
विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.
1. माझ्या मुलाने भारतात काम करू नये- सोनू निगम
माझ्या मुलाला मी गायक करणार नाही. किमान भारतात तरी त्याने काम करू नये अशी माझी इच्छा आहे, असं मत गायक सोनू निगमने व्यक्त केलं आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
सोनू निगमचा नवा म्युझिक अल्बम लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे. या आगामी अल्बममधील 'ईश्वर का वो सच्चा बंदा' या हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. त्यावेळी त्याने हे वक्तव्य केलं आहे.
"खरं सांगायचं तर त्याने व्यवसायिक गायक होऊ नये अशी माझी इच्छा आहे. अन् व्हायचंच असेल तर त्याने भारतात काम करू नये असं वाटतं. तो भारतात राहात नाही तो सध्या दुबईमध्ये आहे. त्याने तिथंच करिअर करावं असं वाटतं. त्याला गाण्याची आवड आहे. तो देखील खूप छान गातो. पण त्याला गाण्यापेक्षा अधिक गेमिंग करायला आवडतं. मला वाटतं त्याने आपलं करिअर निवडलं आहे," असं सोनूने म्हटलं आहे.
यापूर्वी सोनूने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर देखील टीका केली होती. अभिनय क्षेत्रात घराणेशाही तर आहेच, परंतु ही परंपरा आता संगीतच्या दुनियेतही सुरु झाली आहे. दिग्दर्शक, निर्माता तयार असतानाही अनेक नव्या कलाकारांना संगीत कंपन्यांच्या मक्तेदारीमुळे काम मिळत नाही. हा प्रकार त्वरित थांबवा अन्यथा आता संगीत क्षेत्रातही आत्महत्या सुरु होतील, अशी भीती मला वाटतेय, असंही तो म्हणाल आहे.
2. नितीश कुमार नामधारी मुख्यमंत्री असतील - यशवंत सिन्हा
नितीश कुमार हे केवळ नामधारी मुख्यमंत्री असतील अशी टीका माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी केली आहे. भारतीय जनता पक्ष आपले मित्र निर्जीव होईपर्यंत त्यांना पिळून घेतो, असे सिन्हा म्हणाले.
आपण मुख्यमंत्री बनणार नाही, असं नितीश कुमार एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते निवडल्यानंतर म्हणाले. मात्र मित्रपक्षांच्या आग्रहानंतर ते तयार झाले. भाजपला सर्वाधिक जागा आल्याने त्या पक्षाच्या एखाद्या नेत्याने मुख्यमंत्री बनावे, असे आपल्याला वाटत असल्याचं नीतीश कुमार यांचं म्हणणे होतं. 'नवभारत टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
बिहारमध्ये नव्या सरकारचा शपथविधी सोहळा सोमवारी पार पडला. रविवारी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेत जेडीयू अध्यक्ष नीतीश कुमार यांनी सरकार बनवण्याचा दावा केला होता.
3. उद्योगपती अदानींच्या संपत्तीत २३० टक्क्यांनी वाढ-राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारला टीकेचं लक्ष्य केलं आहे. मोदींच्या कार्यकाळात अदानींच्या संपत्तीत २३० टक्क्यांनी वाढ झाली आहे, असं सांगत राहुल गांधी यांनी जनतेला प्रश्न केला आहे. तुमची संपत्ती किती वाढली? असं राहुल गांधी म्हणाले. 'महाराष्ट्र टाईम्स' ने ही बातमी दिली आहे.
राहुल गांधींनी ट्विटसह एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून गौतम अदानींच्या संपत्तीत २३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अदानींची संपत्ती २६ अब्ज डॉलर्स इतकी आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे.
केंद्रातील मोदी सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये ६ विमानतळांचं खासगीकरण केलं आहे. यामध्ये लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, माँगलेर, तिरुवनंतपूरम आणि गुवाहाटी यांचा समावेश होता. स्पर्धात्मक बोली प्रक्रियेत अदानी एंटरप्राईजेसने या विमानातळांचे सर्व हक्क मिळवले. केंद्र सरकार आणि अदानी ग्रुप यांच्यातील सामंजस्य करारामध्ये सेवा क्षेत्रातील तरतुदींचा उल्लेख आहे. यामध्ये सीमाशुल्क, इमिग्रेशन, आरोग्य, एमईटी आणि सुरक्षेची जबाबदारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची असेल.
4. लुटारूंची संगत सोडली तर राजू शेट्टींना पुन्हा खांद्यावर घेईन - सदाभाऊ खोत
"राजू शेट्टी प्रस्थापितांच्या बाजूला गेले म्हणूनच राजू शेट्टी आणि माझ्यात दरी निर्माण झाली. जर शेट्टी प्रस्थापितांच्या नरड्यावर पाय देण्यास उतरले तर निश्चितपणे राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावेन," असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
"एवढंच नाही तर लुटारूंच्या विरोधात आम्ही दोघेही लढलो.. पण जर आज राजू शेट्टींनी लुटारुंची संगत सोडली तर त्यांना परत खांद्यावर घ्यायला मी तयार आहे," असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
माझ्यात शेताच्या बांधावरून भांडण नाही. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या, ऊसाच्या प्रश्नांवर माझे आणि राजू शेट्टींचे एकमत होत असेल तर एकत्रितपणे साखर सम्राटांच्या विरोधात उभे राहू शकतो
दरम्यान समिती नेमून सदाभाऊ खोत यांना हाकलून लावलंय, त्यामुळे पक्षात पुन्हा घेण्याचा प्रश्नच नाही, असं राजू शेट्टींनी म्हटलं आहे.
"ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहेत, त्यांच्याबरोबर मी काम करतो. खोत यांच्याकडे हे दोन्ही नाही, त्यामुळे पक्षात परत घेण्याचा प्रश्नच नाही. आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा हा प्रयत्न सुरू आहे. ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी आणखी काहीतरी पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न आहे."
"कडकनाथमध्ये बुडालेल्या शेतकऱ्यांचे पैसे द्या, पुतना मावशीचे प्रेम नको," अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.
5. जेएनयूचं नामांतर करा-भाजप नेत्याची मागणी
नुकतंच पंतप्रधान मोदींच्या हस्ते जवाहरलाला नेहरू विद्यापीठात स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. या पुतळ्यालाही काही विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता.
त्यावर आता भाजपने विद्यापीठाचं नामांतर करण्याचाच घाट घातल्याची चर्चा आहे. निमित्त ठरलं आहे भाजपच्या सरचिटणीसांचं ट्वीट द्वारे केलेलं वक्तव्य.
भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस सी. टी. रवी यांनी सोमवारी ही नवी मागणी केली आहे. 'भारताचे हे राष्ट्रसंत पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरलेले आहेत. भारताची कल्पना पहिल्यांदा जगासमोर मांडणारे स्वामी विवेकानंद होते. त्यांचं तत्त्वज्ञान आणि मूल्य भारताची ताकद दाखवणारे आहेत. म्हणूनच या महान व्यक्तिमत्वाचं नाव JNU ला द्यायला हवं', अशा अर्थाचं त्यांनी ट्वीट केलं आहे. 'लोकमत न्यूज18' ने ही बातमी दिली आहे.
विचारसरणीत फरक असू शकतो. तुम्हाला विशिष्ट विचारसरणी पटली नाही तरी कुठलीही विचारसरणी ही राष्ट्रहिताला पूरकच असली पाहिजे. राष्ट्रविरोधी नाही, असं पंतप्रधान मोदी विवेकानंदांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी म्हणाले होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)