अन्वय नाईक कुटुंबीय: किरिट सोमय्यांना जमीन व्यवहारांची आताच कशी आठवण झाली?

फोटो स्रोत, Getty Images
भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्यांच्या उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबीयांचे जमीनीचे आर्थिक व्यवहार आहेत, या आरोपांना अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी प्रत्युत्तर दिलंय.
अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
ठाकरे आणि नाईक कुटुंबाच्या जमिनीच्या व्यवहारांबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना आज्ञा नाईक म्हणाल्या, "जमिनीच्या व्यवहारांमध्ये गुपित काहीच नाही. त्यांनी आमच्याकडून जागा घेतली आणि आम्ही दिली. किरिट सोमय्यांनी दाखवलेली व्यवहाराची सर्व कागदपत्रं खुली आहेत. महाभूमीच्या वेबसाईटवर ही उपलब्ध आहेत. त्याबद्दल त्यांचे आभार."

फोटो स्रोत, Getty Images
"जमीन कोणी विकत देऊ शकत नाही का? सर्व व्यवहार योग्य मार्गाने झाला आहे. पण, या आरोपांचा अन्वय नाईक आत्महत्येशी संबंध काय? नेमकी आताच सोमय्यांना याची आठवण कशी झाली? त्यांना यातून काय दाखवायचं आहे?" असं त्या पुढे म्हणाल्या.
किरिट सोमय्यांना राजकारण करायचं आहे. त्यामुळे ते आणखी काही मुद्दे पुढे आणू शकतात. अर्णब गोस्वामींना पाठीशी घालण्यासाठी हे सुरू असल्याचं आज्ञा नाईक यांनी म्हटलं आहे.
"5 मे 2018 मध्ये अन्वय नाईक यांना आम्ही अग्नी दिला. तेव्हा किरिट सोमय्यांची बोबडी वळली होती का?" असं प्रश्नही नाईक कुटुंबाकडून सोमय्या यांना विचारण्यात आला आहे.
संजय राऊत यांनी केली टीका
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरिट सोमय्या यांच्यावर प्रतिआरोप केले आहेत. अन्वय नाईक यांचे कुटुंबाशी ठाकरे कुटुंबीयांनी 21 व्यवहार केल्याची थाप सोमय्या यांनी मारली आहे. त्यांनी बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घालावे असे ट्वीट राऊत यांनी केले आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
सोमय्या काय म्हणाले?
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक यांच्याशी व्यवहारिक संबंध होते. हे का लपवले? उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक यांच्याकडून जमीन घेतली होती. याचा संबंध अर्णब गोस्वामी यांच्या अटकेशी आहे का?" असा प्रश्न भाजप नेते किरिट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
भाजपच्या या आरोपांना शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. किरीट सोमय्या यांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसून अर्णब गोस्वामी यांच्या प्रकरणातून लक्ष हटवण्यासाठी असे आरोप केले जात असल्याचं शिवसेना नेते रविंद्र वायकर यांनी म्हटलं आहे.
किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हँडलवर यासंदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी जमिनीचे कागदपत्र पोस्ट केले आहेत. ही जमीन रश्मी ठाकरे आणि मनीषा रविंद्र वायकर यांनी खरेदी केल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.
रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी इंटिरिअर डेकोरेटर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. आज (बुधवारी) त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
काय आहेत आरोप?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज (11 नोव्हेंबर) भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
ते म्हणाले, "मी यासंदर्भातील कागदपत्र रायगड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना दिली आहेत. अन्वय नाईक यांच्यासोबत जमीन व्यवहार झाल्याने अर्णब गोस्वामी यांना टार्गेट करण्यात येत आहे का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित उपस्थित केला.
7/12 उताऱ्यात अन्वय नाईक, अक्षता नाईक, रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांची नावे असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.
"रायगड जिल्ह्यात मुरूड तालुक्यातील कोलेई गावातील जमीन खरेदी केली असून 21 मार्च 2014 रोजी 2 कोटी 20 लाख रुपये ठाकरे कुटुंबाने नाईक कुटुंबाला दिले. असे किती व्यवहार झाले हे उद्धव ठाकरे सांगणार का? आणखी किती आर्थिक व्यवहार झाले आहेत?" असे प्रश्न उपस्थित करत ठाकरे-नाईक यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हायला हवी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
शिवसेनेचा पलटवार
शिवसेनेचे नेते रविंद्र वायकर यांनी किरिट सोमय्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्याही नावाचा उल्लेख सोमय्या यांनी केला आहे.
रविद्र वायकर म्हणाले, "आम्ही जमीन खरेदी करू शकत नाही का? कुणीही कुणासोबत व्यवहार करू शकते. भागीदारी होऊ शकते. या व्यवहाराची कागदपत्रं लपवलेली नाही. लोकायुक्त, निवडणूक आयोग, आयकर विभाग सर्वांकडे कागदपत्र दिलेली आहेत."
"कोणत्याही प्रकारची चौकशी करा. मी किरिट सोमय्या यांना घाबरत नाही. अर्णब गोस्वामी यांच्या प्रकरणातून लक्ष हटवण्यासाठी असे आरोप करण्यात येत आहेत. अशा दबावांना आम्ही भीक घालत नाही," असंही वायकर म्हणाले.
"आम्ही जमीन खरेदी केली म्हणून अन्वय नाईक यांना आत्महत्या करू द्यायची का?" असा प्रश्नही रवींद्र वायकर यांनी उपस्थित केला आहे.
अन्वय नाईक प्रकरण चर्चेत का आहे?
दोन वर्षांपूर्वी इंटेरिअर डेकोरेटर अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. आपल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी तीन जणांची नावे लिहिली होती. त्यापैकी एक नाव रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे देखील आहे.
2020मध्ये अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी अनिल देशमुखकडे जाऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामींना अटक केली. त्यांच्या अटकेविरोधात भाजपने राज्यभरात निदर्शनं केली.
11 नोव्हेंबर 2020 रोजी अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन दिला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








