'आई माझी काळूबाई' वादावर विवेक सांगळे म्हणाले, '...तर मला काढणं जास्त सोपं नव्हतं का?'

विवेक सांगळे

फोटो स्रोत, Facebook/Vivek Sangale

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी

'माझं जर काही चुकलं असेल तर मला काढणं सोपं नव्हतं का? मी हिरो जरी असलो, तरी मालिकेत नायिका मुख्य आहे. तिच्यावर टीआरपीची गणितं आहे. टायटल साँगसाठी पंधरा ते वीस लाख खर्च झाला आहे. तरीही मला काढण्यात आलं नाही, याचा विचार करा ना,' असं अभिनेता विवेक सांगळेनं म्हटलं आहे.

'आई माझी काळूबाई' ही मालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि निर्मात्या अलका कुबल आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे गेले काही दिवस मालिकेची चर्चा सुरू होती.

या वादात अभिनेता विवेक सांगळे हे नावही चर्चेत आलं. विवेक सांगळे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप प्राजक्ता गायकवाड यांनी केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर विवेक सांगळे ट्रोल झाले होते. त्यांना मालिकेतून काढून टाकण्याचीही मागणी होत होती.

या सर्व पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी विवेक सांगळेंशी संवाद साधला. या आरोप-प्रत्यारोपात त्यांचं काय म्हणणं आहे, हे आम्ही जाणून घेतलं. त्या मुलाखतीचा संपादित अंश.

लाईन

प्राजक्ता गायकवाड यांचं म्हणणं सध्या माध्यमांमध्ये येतंय, अलका कुबलही पुढे येऊन बोलत आहेत. यात तुमच्यावर आरोप होत असले, तरी तुम्ही मात्र पुढे येऊन बाजू मांडल्याचं दिसत नाही. प्राजक्ता यांचं असं म्हणणं आहे की, तुम्हाला यायला उशीर झाला. त्यावर तुम्ही कुठे होतात, असं त्यांनी विचारलं. सेटवरील कोव्हिड पॉझिटिव्ह लोकांना मदत करायला गेल्याचं तुम्ही सांगितलंत. त्यामुळे त्यांनी गाडीत बसायला नकार दिला.

मी कोव्हिड पॉझिटिव्ह माणसांना मदत करत होतो, असं त्यांनी सांगितलं. आता ही मदत मी 16 तारखेपासून करत होतो. पण याचा अर्थ मी प्रत्येकाच्या सान्निध्यात जात होतो असा नव्हता. प्रत्येकाला वेगवेगळ्या रूममध्ये आयसोलेट केलं होतं. त्यांना मी मदत करत होतो म्हणजे काय, तर औषधं आणून देत होतं. त्यांच्या खोलीच्या दाराबाहेर औषधांची पिशवी ठेवून दारावर थाप मारायचो आणि बाजूला व्हायचो, मग ते पिशवी खोलीत घ्यायचे.

जेवणाच्या बाबतीत मी स्वयंपाक करणाऱ्या काकूंना सांगून प्रत्येकाचं एक वेळापत्रक तयार केलं होतं. एक वाजता याला जेवण द्यायचं, सहा वाजता त्याला द्यायचं, असं. मग काकूंना फोन करून मी सांगायचो की, अमुक व्यक्तीला आत्ता उकडलेलं अंडं द्या, वगैरे. मी काही त्यांच्यासोबत जाऊन पत्ते किंवा क्रिकेट खेळत नव्हतो.

विवेक सांगळे

फोटो स्रोत, Facebook/Vivek Sangale

दुसरी गोष्ट- अलकाताई आशालता यांच्या आजारासंदर्भात बिझी होत्या, त्यामुळे अलकाताई बिलांचे किंवा सिटीस्कॅनचे पैसे माझ्या खात्यावर ट्रान्सफर करायच्या. मी जाऊन हॉस्पिटलच्या काउन्टरवर नुसते ते द्यायचो. यात मी कुठे कोणासोबत प्रवास केला?

तिला (प्राजक्ताला) माहिती होतं की, त्याच दिवशी साडेचार वाजता केलेल्या आयटी-पीसीआर टेस्टचा रिझल्ट निगेटिव्ह आलाय. मी काही दहा दिवसांपूर्वी टेस्ट केलेली नव्हती, त्यामुळे दहा दिवसांनी मला रिस्क असल्याचा रिपोर्ट आलाय अशीही काही स्थिती नव्हती. आदल्या दिवशी अँटीजन आणि मग त्या दिवशी आयटी-पीसीआर अशा टेस्ट केलेल्या होत्या, त्यात माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. जे काही बोलायचं असेल ते माझ्याशी बोलायचं ना. आम्ही काही एकमेकांसाठी अनोळखी नव्हतो. मग मला न सांगता थेट प्रॉडक्शनला फोन लावला.

पण तुमच्यात तेवढा संवाद किंवा मैत्री नाहीये का?

तेच सांगतोय मी. मला त्याचंच आश्चर्य वाटलं की, या मुलीने आदल्या दिवशी म्हणजे 19 तारखेला रात्री माझ्या तब्येतीची विचारपूस केली. मी लोकांची मदत करतोय हे अॅप्रीशिएट करण्यासाठी मला फोन केला होता.

ती मुलगी 20 तारखेला मात्र तिला गाडीत बसण्यात रिस्क वाटतेय, हे मला समोरासमोर सांगू शकत नाही, हे कसं? हा माझा प्रश्न आहे. मलाही याचा धक्का बसलो. मी राजेशशीदेखील बोललो. मी समोर असताना ती मलाच थेट हे का सांगत नाहीये, असंही विचारलं.

मग नेमकं घडलं काय होतं?

पहिलं म्हणजे मी शिवीगाळ केली नव्हती. दुसरं म्हणजे ज्या व्यक्तीची कोव्हिड टेस्ट झाली नव्हती, त्या माणसासोबत प्रवास करायला लावला, असाही आरोप माझ्यावर केला गेला होता. पण माझ्या सगळ्या टेस्ट केल्या गेल्या होत्या.

आमच्या सेटवर सप्टेंबर महिन्यात 25-26 जण कोव्हिड पॉझिटिव्ह आले होते. आमची सीरिअल नवीन सुरू झाली होती आणि बँक एपिसोड नव्हते. म्हणून मग असं ठरवलं की जे निगेटिव्ह आले आहेत, त्यांनी मुंबईला जाऊन शूटिंग करावं.

प्रॉडक्शननं त्यासाठी गाडीचीही सोय केली होती. 21 तारखेपासून शूटिंग होतं. आम्ही 20 तारखेला संध्याकाळी निघणार होतो. जिथं आमचं शूटिंग सुरू होतं तिथे मी गेलो, कपडे घेतले आणि गाडीत पुढच्या सीटवर बसलो. माझ्यासोबत प्राजक्ता आणि तिची आई होत्या. त्या गेटवर उभ्या होत्या.

अलका कुबल

फोटो स्रोत, SonyMarathi

फोटो कॅप्शन, आई माझी काळुबाई मालिकेतील दृश्य.

निघायचं म्हणून मी तिला हाक मारली, तेव्हा ती थांब म्हणाली. दोन वेळा असं झालं. नंतर तिनं म्हटलं की, राजेश पाठक यांना तुझ्याशी बोलायचंय. म्हणून मी फोन लावला. ते आधी इकडंच-तिकडंच बोलले. मी काही प्रॉब्लेम आहे का, असं विचारल्यावर त्यांनी म्हटलं की, प्राजक्ताला तुझ्यासोबत प्रवास करायची रिस्क वाटते. तू दुसऱ्या गाडीतून ये ना...

मला दुसऱ्या गाडीतून यायला काही प्रॉब्लेम नाही. पण प्राजक्ता माझी मैत्रीण आहे, तिनं मला थेट सांगू दे, मी दुसऱ्या क्षणाला गाडीतून उतरेन, असं मी म्हटलं. मला हे हर्ट झालं, ते राजेशला जाणवलं. तो मी त्यांच्याशी बोलतो म्हणाला.

दरम्यान, मी आमचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर अमित पारकरला फोन केला. तो कोव्हिड पॉझिटिव्ह होता. त्याची चौकशी करत होतो.

दोन मुलांमध्ये ज्या भाषेत गप्पा सुरू असतात, तसंच आम्ही बोलत होतो. त्यावेळी त्या मागून आल्या. आणि त्यांचा हा गैरसमज झाला.

या सगळ्या प्रकरणात उदयनराजेंना भेटण्याची वेळ का आली?

ही घटना घडली सोमवारी. त्याच दिवशी बहुधा तिची पहिली मुलाखत प्रसिद्ध झाली. इन्स्टाग्रामवर तिचे तीन-चार फॅनक्लब आहेत, तिथून मला 'निषेध, निषेध' असं लिहिलेल्या, फुली मारलेल्या, 'माफी माग' असं लिहिलेल्या इमेजेस पाठवल्या गेल्या. त्यानंतर मला रँडम कॉल यायला लागले. मी कोल्हापूरहून हा बोलतोय, मी साताऱ्याहून ही बोलतेय, मी सांगलीहून हा बोलतोय.

ALAKA KUBAL

फोटो स्रोत, ALAKA KUBAL

सुरुवातीला मी काही कॉल टाळले. पण दिवसाला तीस-पस्तीस असे कॉल येत होते. 'आम्ही आता सेटवर येणार, शूटिंग बंद पाडणार', असंही फोनवरून बोललं जात होतं. मग ते सगळं टॉर्चर व्हायला लागलं. माझ्या घरीही दोन-तीन कॉल केले गेले. माझे आईवडील मुंबईला आहेत. त्यांना 'तुमच्या मुलाला माफी मागायला सांगा, नाही तर आम्ही काहीतरी करू' असं बोललं गेलं. सगळं टेन्शनचं वातावरण होतं.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आपली बाजू कोणत्यातरी अशा व्यक्तीसमोर मांडणं गरजेचं होतं ज्याचं साताऱ्यामध्ये प्रस्थ असेल. आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, महाराजांचं असं खूप मोठं प्रस्थ आहे, आणि ते अगदी अचूक न्याय करतात, म्हणून त्यांच्या कानावर ही गोष्ट घालणं महत्त्वाचं होतं. हे कॉल बंद होण्यासाठी आम्ही पोलिसांनाही बोलावलं होतं आणि अशा धमक्या येत असल्याचं त्यांनाही सांगितलं होतं.

हे सगळं अख्ख्या युनिटसाठी डिप्रेसिंग होतं, कोणाचंच कामात लक्ष लागत नव्हतं. सतत डोक्यात तेच चालू असतं. त्यामुळे खूप मोठ्या हुद्द्यावर असलेल्या आणि सारासार पाहू शकेल अशा एखाद्या व्यक्तीच्या कानावर ही गोष्ट घालणं गरजेचं होतं. शिवाय, त्यांनी स्वतः अलकाताईंना निमंत्रित केलं होतं, शूटिंग चालू असताना एकदा ते आमच्या सेटवरही येऊन गेले होते. त्यामुळे त्यांचे खूप चांगले, घरगुती संबंध आहेत. तर, अलकाताई त्यांना भेटल्या. एक बहीण भावाला भेटायला जाऊ शकते की.

नक्कीच जाऊ शकते. यात काहीच गैर नाहीये. ते खासदारदेखील आहेत, भाजपचे खासदार आहेत. पण यात एक मुद्दा आहे- मला हा प्रश्न विचारायचा नव्हता, पण तुम्ही ज्या पद्धतीने उत्तर देताय, त्यामुळे मला हा प्रश्न विचारावा लागतोय. अलका कुबल त्यांना भेटायला गेल्या आणि भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. त्यासोबत त्यांनी असंही लिहिलं की, 'मी मराठा घराण्यात जन्मलेली महिला आहे.' हे सगळं मांडल्यानंतर याला राजकीय स्वरूप येणार नाही, असं तुम्हाला अजूनही वाटतं का?

बरं झालं हा प्रश्न विचारलात तुम्ही. कदाचित माझ्याकडून हे स्किप झालं असतं. पण हा प्रश्न विचारल्याबद्दल थँक्स. त्याचं असं झालं की, 'इथे (मालिकांमध्ये) ब्राह्मण लोकांची लॉबी आहे आणि त्यांना माझी प्रगती न बघवल्यामुळे त्यांनी मला मालिकेतून काढलं', अशी काही वक्तव्यं एका वर्तमानपत्रामधून व वृत्तवाहिनीवरून आमच्या पाहण्यात आली.

या पार्श्वभूमीवर स्वतःची बाजू मांडण्यासाठी अलकाताई म्हणाल्या की, त्या मराठा आहेत, त्यामुळे त्या असं का करतील? मी स्वतः हिंदू वंजारी आहे. मी ब्राह्मण नाहीये. सेटवरचे कितीतरी लोक कनिष्ठ जातींमधले आहेत, मराठा आहेत, सगळेच जण आहेत. अशी काही लॉबी असती, तर हा माझा चौथा शो आहे तो- मला मिळालाच नसता, मला कामच मिळालं नसतं. तू स्वतः या इंडस्ट्रीला इतक्या जवळून ओळखतोस. इथे टॅलेन्टवर काम मिळतं, कोणाची जात किंवा समाज पाहून नव्हे. पण समोरच्या बाजूने या वादाला असे रंग दिले जात असतील, तेव्हा स्पष्टीकरण देणं गरजेचं असतं.

विवेक सांगळे

फोटो स्रोत, Facebook/Vivek Sangale

आपले प्रेक्षक खूप संवेदनशील आहेत. शिवाय, मुलीने तिची बाजू मांडली की आपण दुसरी बाजू ऐकत नाही. हे चुकीचं आहे असं मी अजिबात म्हणत नाहीये. ते तसंच असायला हवं. पण मुलाची बाजूही आपण कुठेतरी ऐकून घेतली पाहिजे. मी याबाबतीत नशीबवान आहे. कारण, आमच्या शोच्या निर्मात्या स्वतः स्त्री आहेत आणि माझी बाजू मांडत आहेत. इथे युनिटला आणि सेटवरच्या प्रत्येकाला गेल्या तीन महिन्यात किती त्रास सहन करावा लागलाय, हे त्या सांगत आहेत.

आता एपिसोड अगदी अटीतटीवर आले आहेत. चॅनलने नवरात्री विशेष म्हणून तीस-तीस मिनिटांचे एपिसोड दिले आहेत. खाली गाडी थांबली आहे आणि वर शूट करून खाली चीप नेऊन द्यायची, मग ती चीप मुंबईला जाणार, इतकं कट-टू-कट काम सुरू आहे. अशा वेळी माझी परीक्षा आहे असं सांगून एखादी व्यक्ती सुपारी घेऊन कार्यक्रमांना जाते- या कार्यक्रमांचे फोटोही आमच्याकडे आहेत, मग कोणी काय प्रतिक्रिया द्यावी यावर? म्हणून शेवटी चॅनलने व निर्मात्यांनी हा निर्णय घेतला की, हे आता सहन करणं शक्य नाही, आता त्या व्यक्तीला काढलंच पाहिजे.

त्यानंतर अचानक माझ्यावर आरोप केले जातात की, मी शिवीगाळ केली, इत्यादी. दीड महिन्यापूर्वी घडलेला कोणतातरी किस्सा, त्यातही मी काही केलेलंच नव्हतं मुळात. प्रेक्षकांचंही बरोबर आहे, ते आमच्यावर इतकं प्रेम करतात, तत्काळ प्रतिक्रिया देतात, पात्रांवर ते प्रेम करत असतात. पण उद्या मी इतिहासातल्या एखाद्या महान व्यक्तीचं पात्र केलं, तरी मी ती महान व्यक्ती होऊ शकत नाही. मी फक्त ते पात्र कॅमेऱ्यासमोर साकारण्याचा प्रयत्न करत असतो. मी ते व्यक्तिमत्त्व होऊ शकत नाही. मी त्या पात्राच्या नावाचा फायदा करून घेत असेन, तरी ते चुकीचं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)