आई माझी काळूबाईः अलका कुबल यांनी घेतली उदयनराजे भोसले यांची भेट

फोटो स्रोत, SonyMarathi
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
अभिनेत्री आणि आई माझी काळूबाई या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि अलका कुबल यांनी केलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर अलका कुबल यांनी उदयनराजे राजे भोसले यांची भेट घेतली.
उदयनराजे हे आपल्याला भावासारखे आहेत. म्हणूनच हक्काने त्यांची भेट घेतल्याचं अलका कुबल यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी ट्वीट करून या भेटीबद्दल माहिती दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"आई माझी काळुबाईचं शूटिंग साताऱ्यामध्ये सुरू आहे. गेल्या काही दिवसात जो वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्हाला शूटिंग बंद पाडण्यात येईल अशा धमक्या आल्या होत्या. अभिनेता विवेक सांगळेलाही ट्रोल केलं जात होतं. त्यामुळेच उदयनराजेंची भेट घेऊन त्यांच्या कानावर आमच्या अडचणी घातल्या," असं अभिनेत्री आणि मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी म्हटलं.
काय आहे प्रकरण?
'आई माझी काळूबाई' ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी आपल्या सहकलाकाराच्या वागणुकीमुळे ही मालिका सोडत असल्याचं म्हटलं आहे.
दुसरीकडे मालिकेच्या निर्मात्या आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी प्राजक्ताला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचं म्हटलं आहे. त्यांनी प्राजक्ता यांच्याबद्दल काही आक्षेपही घेतले आहेत.
काही महिन्यांपूर्वी या मालिकेच्या सेटवर 27 जणांना कोरोनाची लागण झाली होती. या मालिकेत भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचं कोरोनामुळे निधन झालं. त्यानंतर कोरोनाकाळात होणारं मालिका, सिनेमाचं काम, सेटवरची खबरदारी आणि विशेषत: वयानं ज्येष्ठ कलाकारांचा सहभाग याबद्दल पुन्हा प्रश्न उठू लागले आणि ही मालिका चर्चेत आली.
आता या आरोप-प्रत्यारोपांमुळे पुन्हा एकदा ही मालिका चर्चेत आली आहे.
'सीरिअल सुरू ठेवण्यासाठी असले प्रकार पाठिशी घालणार?'
"मला सीरिअलमधून काढण्यात आलं नाहीये, मी स्वतःहून ही मालिका सोडली आहे. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत," असं अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.
मग तुम्ही मालिका सोडण्याचं नेमकं कारण काय होतं या प्रश्नाचं उत्तर देताना प्राजक्ता गायकवाड यांनी सहकलाकार विवेक सांगळे यांनी केलेली शिवीगाळ आणि त्यासंबंधीच्या तक्रारीची न घेतली गेलेली दखल हे मालिकेतून बाहेर पडण्याचं कारण असल्याचं सांगितलं.
प्राजक्ता गायकवाड यांनी सांगितलं, "आई माझी काळूबाई'च्या सेटवर 27 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. साताऱ्यात जिथं आमचं शूटिंग सुरू होतं, तिथल्या गावकऱ्यांनी आम्हाला शूटिंग करण्यापासून अडवलं. त्यामुळे आम्ही मुंबईत फिल्मसिटीमध्ये शूटिंग करण्याचा निर्णय घेतला.
आम्ही मुंबईला जायला निघालो. माझ्यासोबत विवेक सांगळे येणार होते. ते दोन तास उशीरा आले. मी विचारल्यावर त्यांनी सांगितलं की, जे कोव्हिड पॉझिटिव्ह लोक होते, त्यांना मी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून येत आहे."
"हे ऐकल्यावर मनात शंका आली की, ही व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आली होती. त्यांच्यासोबत सातारा ते मुंबई प्रवास कसा करायचा? सगळं जग काळजी घेत असताना हा विचार करणं स्वाभाविक होतं. मी हे बोलून दाखवल्यावर त्यांनी मला शिवीगाळ करायला सुरूवात केली.
"अतिशय आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. मी मालिकेच्या निर्मात्या या नात्याने अलका कुबल यांच्याकडे तक्रार केली. पण दोन-तीन वेळा याबद्दल बोलूनही त्यांनी दखल घेतली नाही," असा आरोप अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी केला आहे.

फोटो स्रोत, Facebook/Prajkata Gaikwad
ही घटना सप्टेंबरमधली होती. एवढं होऊनही मी दीड महिना शूटिंग केलं. पण समोर ती व्यक्ती आली की तो प्रकारच आठवायचा. सॉरी हा एकच शब्द आपल्याला अपेक्षित असतो. पण त्या व्यक्तिच्या वागण्यात बदलच दिसत नसेल तर? शेवटी मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला, असं प्राजक्ता यांनी सांगितलं.
अलका कुबल या स्वतः दोन मुलींच्या आई आहेत. तरी त्यांनी माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही. केवळ सीरिअल सुरू ठेवायची म्हणून अशा लोकांना तुम्ही पाठिशी घालणार का, असंही प्राजक्ता गायकवाड यांनी म्हटलं.
'त्या मुलानं शिवीगाळ केली नाही'
"त्या मुलाने त्यांना शिव्या दिल्या नाहीत. प्राजक्ताने त्याला गाडीतून उतरायला सांगितल्यामुळे त्याला राग आला. तो गाडीबाहेर उतरून फोनवर कोणाशी तरी बोलायला लागला," असं म्हणत मालिकेच्या निर्मात्या आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी त्यांच्यावरील आणि अभिनेता विवेक सांगळेवरील आक्षेपांना उत्तर दिलं.
त्यानं कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांना माणुसकी दाखवून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं होतं. पण त्याचा विचार न करता त्याला गाडीतून उतरवल्यामुळे त्याला राग आला, असं अलका कुबल यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, SonyMarathi
त्यानं शिव्या दिल्या असत्या तर मी स्वतः त्याची दखल घेतली नसती का, असंही अलका कुबल यांचं म्हणणं आहे.
प्राजक्ता गायकवाड यांच्या एक्झिटला इतर बऱ्याच गोष्टी कारणीभूत असल्याचं अलका कुबल यांचं म्हणणं आहे.
'प्राजक्तासाठी सीनिअर कलाकारही ताटकळायचे'
"प्राजक्ता गायकवाड या सेटवर खूप उशीरा यायच्या. आशालाता, शरद पोंक्षे, मंजुषा गोडसे यांच्यासारखे सीनिअर कलाकार चार-चार तास थांबायचे. आमचं सत्तर जणांचं युनिट आहे. सगळं युनिट एकटीसाठी ताटकळत थांबायचं.
अनेकदा उशीर झाल्यामुळे आम्हाला नाइट शूटिंगही करावं लागलं आहे. या सगळ्यात निर्माती म्हणून आर्थिक नुकसानही झालं," असं अलका कुबल यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
इंजिनिअरिंगची परीक्षा आहे, असं सांगून प्राजक्ता सगळीकडे इव्हेंट्सना जायची असंही अलका कुबल यांनी म्हटलं.
"तीन महिने हे सहन केल्यानंतर मी 21 तारखेलाच प्राजक्ताकडे मालिका सोडण्याबद्दल बोलले आणि त्यानंतर आम्ही कोणतीही कारवाई करण्यापूर्वी त्यांनी मालिका सोडण्याबद्दलची कागदपत्र दिली. कारण आम्ही रिप्लेसमेंट शोधत आहोत, आपल्याला काढलं जाऊ शकतं याची प्राजक्ताला कल्पना आली होती," असं अलका कुबल यांचं म्हणणं आहे.
"आता आमचं सगळं सुरळीत सुरू होतंय. सेटवरची सगळी नकारात्मकता गेल्यामुळे आता मी काळूबाईची आणि सत्यनारायणाची पूजाच घालणार आहे," असंही अलका कुबल यांनी म्हटलं.
'...मग सेटवर उशीरा येण्याचा प्रश्नच कोठे येतो?'
आपण कोणतेही आरोप प्रत्यारोप न करता दहा दिवसांची नोटीस देऊन मालिका सोडली असल्याचं प्राजक्ता गायकवाड यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Facebook/Prajakta Gaikwad
मी सेटवर उशीरा यायचे, तयार व्हायला वेळ लावायचे या आरोपात तथ्य नसल्याचंही प्राजक्ता गायकवाड यांनी म्हटलं.
"आमचं शूटिंग जिथे सुरू होतं तिथेच आमची राहण्याची सोय करण्यात आली होती. त्यामुळे आम्ही तिथेच तयार होऊन सेटवर यायचो. मग उशीर होण्याचा प्रश्नच कुठे येतो?"
प्राजक्ता गायकवाड यांनी म्हटलं, "माझ्या परीक्षेचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. पण माझी इंजिनिअरिंगची परीक्षा असेल, त्यासाठी मला वेळ लागेल हे मी आधीच सांगितलं होतं. कोव्हिडमुळे मे-जूनमध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. मध्यंतरी कोव्हिडमुळे आमचं शूटिंग थांबलं होतं. त्यामुळे तू जर आता परीक्षा द्यायला गेलीस तर आपल्याला मालिका थांबवावी लागेल असं सांगितलं गेलं. त्यामुळे मी परीक्षाही दिली नव्हती. मी एवढं सगळं अॅडजस्ट केलं आहे."
कोरोना काळात सगळं बंद असताना मी कोणत्याही इव्हेंटला कशी जाईन, असंही प्राजक्ता यांनी म्हटलं.
'आई माझी काळूबाई' या मालिकेत आता प्राजक्ता गायकवाडच्या जागी वीणा जगताप प्रमुख भूमिकेत असतील.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








