IPL 2020 : मुंबई इंडियन्सने अशी मारली बाजी

मुंबई इंडियन्स, रोहित शर्मा

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, रोहित शर्मा जेतेपदाचा चषक स्वीकारताना
    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

आयपीएल स्पर्धेत अद्भुत सातत्याची कमाल दाखवत मुंबई इंडियन्सने पाचव्या जेतेपदावर कब्जा केला. तेराव्या हंगामाच्या फायनलमध्ये मुंबईने दिल्लीला नमवत बाजी मारली.

खेळाडू, कर्णधार, सपोर्ट स्टाफ, व्यवस्थापन या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांच्या बळावर मुंबईने सलग दुसऱ्या वर्षी जेतेपदाची कमाई केली.

मुंबईच्या विजयात प्रत्येक खेळाडूचं योगदान आहे यातूनच त्यांची ताकद दिसून येते. एखादा खेळाडू चमकण्याऐवजी मुंबईच्या प्रत्येक खेळाडूने जिंकण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत.

यंदाच्या हंगामात प्रत्येक संघाला चढउतारांचा सामना करावा लागला. मात्र मुंबईने बॅटिंग-बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही आघाड्यांवर कमालीचं सातत्य राखत सरशी साधली.

मुंबईच्या जेतेपदापर्यंतच्या वाटचालीची ही पाच कारणं.

मुंबई इंडियन्स, रोहित शर्मा

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, जेतेपदासह मुंबईचा संघ

1. इशान किशन-सूर्यकुमार यादव जोडी जमली रे

भारतासाठी न खेळलेल्या या दोन खेळाडूंनी यंदाच्या हंगामात धावांचा रतीब घातला. इशानने 516 तर सूर्यकुमारने 480 रन्स केल्या. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे या दोघांनी जबाबदारी ओळखून खेळ केला. इशानने फिटनेसवर लक्ष दिलं तसंच जास्तीत जास्त षटकार कसे लगावता येतील यावर काम केलं. हंगामात सर्वाधिक षटकार (30) लगावण्याची किमयाही इशानने केली.

रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यानंतर इशानला सलामीला पाठवण्यात आलं. नवीन बॉलचाही समर्थपणे सामना करू शकतो हे इशानने दाखवून दिलं. U19 संघाचा कॅप्टन असलेल्या इशानने भरपूर रन्स करत टीम इंडियासाठी दावेदारी सिद्ध केली आहे.

मुंबई इंडियन्स, रोहित शर्मा

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव

सलग तिसऱ्या हंगामात सूर्यकुमारने चारशे रन्सचा टप्पा ओलांडला. सूर्यकुमारची भारतीय संघात निवड न झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. तिसऱ्या क्रमांकावर येऊन मोठ्या धावसंख्येचा पाया रचणं आणि चेसिंग करताना फिनिशर होऊन मॅच जिंकून देणं या जबाबदाऱ्या सूर्यकुमारने पेलल्या. एकेरी-दुहेरी बरोबरच चौकार-षटकार लगावण्यातल्या प्राविण्यामुळे सूर्यकुमारने आपलं वेगळेपण सिद्ध केलं.

2. बुमराह-बोल्टचा धसका

गेल्या वर्षी ट्रेंट बोल्ट दिल्ली संघाचा भाग होता. दिल्लीने ट्रेडऑफमध्ये बोल्टला मुंबईला दिलं. दिल्लीने जे गमावलं ते मुंबईने पुरेपूर कमावलं. पॉवरप्लेच्या ओव्हर्समध्ये बॅट्समन मोठ्या धावसंख्येचा पाया रचतात. मात्र ट्रेंट बोल्टने पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवत मुंबईच्या विजयाचा पाया रचला.

मुंबई इंडियन्स, रोहित शर्मा

फोटो स्रोत, BCCU/IPL

फोटो कॅप्शन, ट्रेंट बोल्ट

फायनल मॅचच्या पहिल्या बॉलवर बोल्टने धोकादायक मार्कस स्टॉइनसला आऊट केलं. पुढच्याच ओव्हरमध्ये बोल्टने अनुभवी रहाणेला फसवलं.

शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करणाऱ्या शिमोरन हेटमायरला बोल्टने झटपट तंबूत धाडलं. यंदाच्या हंगामात बोल्टने पॉवरप्लेमध्ये 16 विकेट्स पटकावल्या.

जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचा आधारस्तंभ झाला आहे. संघाला जशी गरज असेल त्यावेळी बॉलिंग करत रन्स रोखणं आणि विकेट्स पटकावणं या दोन्हीमध्ये बुमराहचं वर्चस्व अधोरेखित झालं.

मुंबई इंडियन्स, रोहित शर्मा

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, जसप्रीत बुमराह

यॉर्कर, बाऊन्सर, स्लोअरवन अशी अनेकविध अस्त्रं परजत बुमराहने हंगामात बॅट्समनला सळो की पळो करून सोडलं. हंगामात 27 विकेट्स घेताना बुमराहने आयपीएल स्पर्धेत यशस्वी बॉलर म्हणून पुन्हा एकदा सिद्ध केलं.

3. हार्दिक-पोलार्डची तुफान फटकेबाजी

सलामीवीर आणि मधल्या फळीने उभ्या केलेल्या पायावर कळस चढवण्याचं महत्त्वपूर्ण काम या जोडगोळीने यंदाच्या हंगामात केलं.

हार्दिक यंदा विशेषज्ञ बॅट्समन म्हणून खेळत होता. हार्दिकने यंदाच्या हंगामात 179.98च्या स्ट्राईक रेटने 281 रन्स केल्या. हाणामारीच्या ओव्हर्समध्ये बॅटिंगला येत तुफान फटकेबाजी करण्याचं काम हार्दिकने चोखपणे केलं.

हार्दिकने 14 चौकार आणि 25 षटकार लगावत फिनिशर म्हणून सिंहाचा वाटा उचलला. हार्दिकच्या बरोबरीने कायरेन पोलार्डने चौकार-षटकारांची लयलूट केली.

सगळी वर्ष मुंबईकडून खेळणाऱ्या पोलार्डने यंदा 22 षटकार आणि 15 चौकार लगावले. पोलार्डचा 191.42चा स्ट्राईकरेट प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवणारा होता.

4. रोहितचं प्रभावी नेतृत्व

कर्णधार म्हणून पाचव्या जेतेपदासह रोहित शर्माचं नेतृत्व किती खणखणीत आहे हे सिद्ध झालं. बॉलिंगमध्ये योग्यवेळी बदल करणं, फिल्डिंग सेट करणं, प्रतिस्पर्धी संघाने आक्रमण केल्यानंतर संघाचं मनोधैर्य वाढवणं, पराभव पदरी पडल्यास संघाची मोट बांधून ठेवणं अशा सगळ्या आघाड्या रोहितने चोखपणे सांभाळल्या.

बोल्टचा पॉवरप्लेसाठी, बुमराहचा शेवटच्या ओव्हर्ससाठी उपयोग करून घेणं, खेळपट्टीचा नूर ओळखून स्पिनर्सना आणणं, योग्य फिल्डर योग्य ठिकाणी उभा करणं यामध्ये रोहित माहीर आहे. दडपणाच्या क्षणीही आक्रस्ताळं न होता योग्य निर्णय घेण्यात तो वाकबगार आहे.

मुंबई इंडियन्स, रोहित शर्मा

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, रोहित शर्मा

सपोर्ट स्टाफ, व्यवस्थापन, विदेशी खेळाडू, युवा भारतीय खेळाडू यांच्यामध्ये समन्वयक म्हणून कर्णधाराची भूमिका निर्णायक असते. खेळाडूंचा रोहितवर आणि रोहितचा खेळाडूंवर विश्वास आहे याचा प्रत्यय मुंबईच्या सातत्यपूर्ण कामगिरीतून दिसून आला.

5. चतुर डावपेच

डावपेचांच्या बाबतीत मुंबईने वस्तुपाठ सादर केला. 'लाईक अ लाईक रिप्लेसमेंट' यासंदर्भात मुंबईने खूप काम केलं. ट्रेंट बोल्टसाठी मिचेल मक्लेघान तर जेम्स पॅटिन्सनसाठी नॅथन कोल्टिअर नील असं मुंबईचं तंत्र होतं. फास्ट बॉलर दुखापतग्रस्त होण्याची शक्यता असते.

बुमराह मुख्य बॉलर असल्याने त्याला छोट्या स्पेलमध्ये वापरण्यात आलं. लसिथ मलिंगाने वैयक्कित कारणास्तव माघार घेतल्यानंतर मुंबईने ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटिन्सनला ताफ्यात घेतलं.

पॅटिन्सन दर्जेदार फास्ट बॉलर आहे मात्र ट्वेन्टी-20 प्रकारात तो मर्यादित खेळला आहे. युएईतल्या खेळपट्यांवर मुंबईने पॅटिन्सनला नियमितपणे खेळवलं. पॅटिन्सनने 11 विकेट्स घेताना रन्स रोखत संघाचा विश्वास सार्थ ठरवला.

एकही मॅच न खेळता बदली खेळाडू म्हणून भन्नाट कॅचेस, रनआऊट्स करणाऱ्या अनुकूल रॉयने मनं जिंकली. बदली खेळाडू कोण असेल हेही मुंबईचं ठरलेलं होतं.

रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यानंतर इशान किशनला सलामीला पाठवण्याचा निर्णय चपखल होता. रोहितच्या जागी सौरभ तिवारीच खेळला. ताफ्यात ख्रिस लिनसारखा धोकादायक बॅट्समन असूनही मुंबईने त्याला एकाही सामन्यात खेळवलं नाही.

क्विंटन-पोलार्ड-बोल्ट-पॅटिन्सन/कोल्टर या चौकडीला मुंबईने धक्का लावला नाही. मुंबईने जाणीवपूर्वक भारंभार बदल टाळले. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे खूप बदल करावे लागण्याची त्यांच्यावर वेळच आली नाही.

फायनलला दिल्लीकडे डावखुऱ्या बॅट्समनची फौज आहे हे लक्षात घेऊन संपूर्ण हंगाम खेळलेल्या राहुलला चहरला वगळून ऑफस्पिनर जयंत यादवला खेळवण्यात आलं. जयंतने पहिल्याच ओव्हरमध्ये धोकादायक शिखर धवनला त्रिफळाचीत करत संघाचा विश्वास सार्थ ठरवला.

मुंबईने खुबीने कामाचं वाटप केलं होतं. रोहित-क्विंटनने पॉवरप्लेमध्ये 60 रन्सपर्यंत, इशान-सूर्यकुमार यांनी 15 ओव्हरपर्यंत 115पर्यंत आणि हार्दिक-पोलार्ड-कृणाल यांनी तिथून जितकी मोठी धावसंख्या रचली होती तिथपर्यंत न्यायचं या सूत्राने मुंबईने आखणी केली होती.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)