दिवाळी : मुंबईत मोठ्या फटाक्यांवर बंदी, महापालिकेचा निर्णय

मुंबई महानगरपालिकाने सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.

मुंबईत फुलबाजा किंवा पाऊस सारखेच मोठा आवाज नसलेले फटाके फोडण्यास फक्त दिवाळीच्या रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहेत.

"दिल्लीत कोरोनाचा आकडा वाढत आहे, पाश्चिमात्य देशांत पेशंट वाढत आहेत. दिल्लीत प्रदूषण वाढलंय. त्यामुळे कोरोनाचा विषाणू घातक परिणाम करतो आणि परिस्थिती हाताबाहेर जाते. त्यामुळे दिवाळीत हे प्रदूषण टाळण्यासाठी फटाके फोडण्याआधी विचार करा," असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केलं आहे.

"बंदी घालण्यापेक्षा सामंजस्यानं फटाके वाजवायचे नाहीत, हे ठरवा. सार्वजनिक ठिकाणी अजिबात फटाके वाजवायचे नाहीत," असंही ठाकरे यांनी म्हटलं होतं.

पण मुंबई महापालिकेनं त्यांच्या अधिकारक्षेत्रात हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.

"दिवाळीत रोषणाई जरूर करा, दिवे पेटवा, पण फटाके वाजवू नका. आपल्या परिसरात कुणाला त्रास होणार नसेल तर वाजवू शकता.

तसंच दिवाळीनंतरचे 15 दिवस फार कसोटीचे आहेत. कारण पाश्चिमात्य देशांत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. इंग्लंडमध्ये तर पुढचे 4 ते 6 आठवडे कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. थंडीला सुरुवात होत आहे आणि कोरोनाचे रुग्ण वाढत आहे, त्यामुळे आता ही दुसरी लाट नाही तर त्सुनामी आहे," असं उद्धव ठाकरे यांनी रविवारी ( 8 नोव्हेंबर 2020) केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलं आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिवाळीच्या काळात असलेल्या नियमांची यादी प्रसिद्ध केलेली आहे. ते नियम असे आहेत -

महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडायला आणि आतिशबाजी करायला बंदी घालण्यात आली आहे. फटाक्यांच्या धुराचा कोव्हिड-19 च्या पेशंट्सला त्रास होऊ शकतो हे लक्षात घेऊन ही बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, तसंच खाजगील ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत. फक्त लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी फुलबाज्या, अनार यांसारखे आवाज न करणारे फटाके खाजगी परिसरात फोडण्याची परवानगी दिली आहे.

हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यवसायिक परिसर, विविध समूह इत्यादींद्वारे आणि त्यांच्याशी संबंधित परिसरांमध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतिशबाजी आणि त्या संबंधीचे कार्यक्रम करता येणार नाहीत असंही मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. या नियमांचा भंग केला तर महानगरपालिका आणि मुंबई पोलीस यांच्याव्दारे संयुक्तरित्या कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही म्हटलं आहे.

तसंच कोव्हिडच्या पाश्वभूमीवर सजग आणि सतर्क राहून दिवाळी साजरी करण्याचं आवाहनही महानगरपालिकेने केलं आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी परवानगी दिलेले फटाके फोडतानाही कोव्हिडसंबंधीच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. यावेळी मास्क वापरणं, साबणाने हात स्वच्छ धुणं आणि शारीरिक अंतर पाळणं गरजेचं आहे.

त्याचबरोबर यंदाच्या दिवाळीत दारापुढे रांगोळी काढताना आणि पणत्या लावताना त्यासोबत पाण्याने भरलेली बादली आणि साबण दरवाजा जवळ आठवणीने ठेवायचा आहे. जेणेकरुन घरात येणा-या प्रत्येक व्यक्तिला हात - पाय - चेहरा योग्यप्रकारे धुवूनच घरात प्रवेश करता येईल, अशी मार्गदर्शक सूचना करण्यात आली आहे.

तसेच सॅनिटायजर हे ज्वालाग्रही असू शकते, ही गोष्ट लक्षात घेऊन दिवाळीच्या निमित्ताने दिवे लावताना सॅनिटायजरचा वापर करू नये, अशीही मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहे.

कोव्हिडच्या अनुषंगाने हात स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायजर हे ज्वलनशील असण्याची शक्यता असते. ही गोष्ट लक्षात घेऊन दिवाळीचे दिवे लावताना, मर्यादित स्वरुपात आतिशबाजी करताना आणि फटाके फोडताना हाताला सॅनिटायजर लावलेले नसल्याची खात्री करुन घ्यावी. अशा प्रसंगात सॅनिटाझरचा वापर करू नये, आपल्या आसपास सॅनिटायझर नाही याची खात्री करणे आणि आपल्याजवळ सॅनिटायझरची बाटली ठेवू नये असं महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

यंदाची दिवाळी नियंत्रित स्वरूपात साजरी करावी, या काळात मोठ्या प्रमाणावर लोकांनी एकत्र येणे टाळावे असंही महानगरपालिकेने म्हटलं आहे. एकमेकांना शुभेच्छाही फोन किंवा ऑनलाईन द्याव्यात असंही म्हटलं आहे.

दिवाळीची खरेदी करण्यासाठी गरज असेल तरच बाहेर जा आणि कमी गर्दीच्या ठिकाणी खरेदी करा अशी सूचना मुंबई महानगरपालिकेनी दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)