केरळ कपल: इंटिमेट फोटोशूट करणाऱ्या जोडप्याला का केलं जातंय ट्रोल?

फोटो स्रोत, AKHIL KARTHIKEYAN
- Author, गीता पांडेय
- Role, बीबीसी प्रतिनिधी
लग्नानंतर इंटिमेट फोटोशूट करून ते सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या एका दांपत्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
प्रचंड ट्रोलिंग होत असलं तरी हे फोटो सोशल मीडियावरून काढणार नसल्याचं या जोडप्याने बीबीसीशी बोलताना स्पष्ट केलं.
लक्ष्मी आणि ऋषी कार्तिक यांनी सप्टेंबर महिन्यात लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी हे फोटोशूट चहाच्या मळ्यात हे फोटोशूट केलं आहे. पांढऱ्या कपड्यांमध्ये ते चहाच्या मळ्यात हसताना, एकमेकांना आलिंगन देताना तसंच एकमेकाच्या दिशेने धावताना दिसत आहेत.
कोरोनामुळे त्यांनी साधेपणाने लग्न केलं होतं. त्यामुळे हे फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला असं लक्ष्मी-ऋषी यांनी सांगितलं.
"घरच्यांच्या परवानगीने आमचा प्रेमविवाह झाला आहे. गेल्या वर्षी आम्ही एकमेकांच्या घरच्यांची भेट घडवून आणली. त्यानंतर आमच्या भेटीगाठी वाढल्या. आम्ही एकमेकांवर आणखी प्रेम करू लागलो", असं लक्ष्मीने सांगितले.
ऋषी टेलिकॉम कंपनीत काम करतो तर लक्ष्मीने नुकतंच इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंगची पदवी मिळवली आहे.

फोटो स्रोत, AKHIL KARTHIKEYAN
पोस्ट वेडिंग फोटोशूट इंटिमेट असावं यासाठी ऋषीने इंटरनेटवर विविध पर्यायांचा शोध घेतला. त्यांचा फोटोग्राफर मित्र अखिल कार्तिकेयनने हे फोटोशूट केलं. हॉटेलच्या खोलीत ते चहाच्या मळ्यात अशा विविध ठिकाणी हे फोटोशूट करण्यात आलं.
"हा एक मजेशीर अनुभव होता. फोटोशूटवेळी आम्ही हसत होतो. फोटोशूट करायचं या कल्पनेनेच आम्ही उत्साहात होतो. काही महिन्यांपूर्वीच आमचं लग्न झालं, त्यामुळे आम्हाला स्वतंत्र झाल्यासारखं वाटत होतं. या फोटोशूटमुळे ट्रोलिंगला सामोरं जावं लागेल असं वाटलं नव्हतं", असं लक्ष्मीला वाटतं.
फोटोशूट करणाऱ्या अखिलने हे फोटो फेसबुकवर शेअर केल्यानंतर ट्रोलिंगला सुरूवात झाली. हे फोटो अश्लील, लाजिरवाणे आणि घाणेरडे असल्याचं काहीजणांनी म्हटलं.
काहीजणांनी हे फोटोशूट म्हणजे पॉर्नोग्राफी असल्याचं काहीजणांनी म्हटलं. हे फोटोशूट काँडमच्या जाहिरातीसाठी योग्य असल्याचं काहीजणांनी म्हटलं. तुम्ही हॉटेलची रुम बुक करण्याचा सल्ला काहींनी या जोडप्याला दिला.
"दोन दिवस टीकेचा भडिमार झाला. तुम्ही नग्नतेला प्रोत्साहन देत आहात असंही बोललं गेलं. तुम्ही आतमध्ये कपडे घातलेत का? अशीही विचारणा झाली. प्रसिद्धी मिळवण्याचा सोस असल्याचीही टीका झाली. लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न आहे," असं काहीजण म्हणाले असं लक्ष्मीने सांगितलं.

फोटो स्रोत, AKHIL KARTHIKEYAN
बहुतांश ट्रोलर्सनी मला लक्ष्य केलं असं लक्ष्मीने सांगितलं. हा अनुभव माझ्यासाठी भयंकर असा होता. पॉर्न चित्रपटात जाऊन काम करण्याचा सल्लाही मला मिळाला. मला लाज वाटू लागली. ट्रोलिंग करणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश होता. जुन्या फोटोंमध्ये ज्यामध्ये मी मेकअप न करता होते, ते त्यांनी शोधून काढले. या फोटोंमध्ये किती खराब दिसते अशी टीका केली.
मात्र हे ट्रोलिंग होत असतानाच काही नेटिझन्सनी त्यांना पाठिंबा दिला. हे फोटोशूट भन्नाट आणि अद्भुत असल्याचं काहीजण म्हणाले. ट्रोलिंगकडे लक्ष देऊ नका असा सल्ला काहीजणांनी या जोडप्याला दिला.
"ट्रोलिंग करणाऱ्यांना आम्ही ओळखतही नव्हतो. लोक आमच्यावर तुटून पडले होते. आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांनाही आम्ही ओळखत नाही. मात्र त्यांच्या शब्दांमुळे आम्हाला आधार मिळाला".
केवळ अनोळखी ट्रोलर्स नव्हे तर नातेवाईकांच्या खोचक टोमण्यांनाही या जोडगोळीला सामोरं जावं लागलं.

फोटो स्रोत, AKHIL KARTHIKEYAN
"सुरुवातीला फोटोशूटची कल्पना ऐकल्यानंतर आईबाबांना हे पसंत पडलं नाही. परंतु आम्ही त्यांना समजावलं. त्यांनी होकार दिला. नातेवाईकांनी मात्र आम्ही पाश्चिमात्य गोष्टी रुढ करत असल्याचं म्हटलं.
हे करायची काय गरज होती असा सवाल अनेकांनी केला. तुम्हाला आपल्या संस्कृतीचा-परंपरांचा विसर पडला आहे असं त्यांनी सुनावलं".

फोटो स्रोत, AKHIL KARTHIKEYAN
अनेकांनी हे फोटो काढून टाका असं सांगितलं. लक्ष्मी आणि ऋषिकेश यांना कौटुंबिक व्हॉट्सअपग्रुपवरूनही काढण्यात आलं. मात्र फोटो सोशल मीडियावरून काढायचे नाहीत यावर हे जोडपं ठाम राहिलं.
"फोटो काढणं म्हणजे चूक मान्य केल्यासारखं आहे. आम्ही कोणतीही चूक केलेली नाही. आम्ही पांढऱ्या आवरणामागे कपडेही परिधान केले होते.
सुरुवातीला ट्रोलिंगचा सामना करणं अत्यंत अवघड होतं. मात्र आता आम्हाला याची सवय झाली आहे. समाज कसा आहे हे आता आम्हाला समजू लागलं आहे आणि त्यानुसार आम्ही वागत आहोत", असं लक्ष्मीने सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








