चंद्रकांत पाटील म्हणतात, 'पुणेकरांनो, पंतप्रधान मोदींकडे बघा, ते दिवसातले 22 तास काम करतात' #5मोठ्याबातम्या

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, Facebook/Chandrakant Patil

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. पुणेकरांनो, पंतप्रधान मोदींकडे बघा, ते दिवसातले 22 तास काम करतात - चंद्रकांत पाटील

पुणेकरांची पाट्या, बाकरवडी, तिरकस स्वभाव आणि दुपारी झोपण्याची सवय या गोष्टींवरून अनेक विनोद केले जातात. नेमका हाच संदर्भ घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांना टोमणा मारला आहे.

"पुण्यात काही जणांना दुपारी 1 ते 4 झोपण्याची सवय असते. याकाळात काही काम करण्यास नकार दिला जातो. पण मोदींकडे पाहा, ते दिवसातील 22 तास काम करतात" असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पाटील बोलत होते. त्यावेळी झोपण्याच्या सवयीवरून त्यांनी पुणेकरांना टोला लगावला.

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, Twitter/Chandrakant Patil

"काम करण्यासाठी निवडून यायचं असतं. अन्यथा काही नेते पाच ते सहा वेळा आमदार झाले तरी काही उपयोग होत नाही. आपल्या आयुष्यातील ध्येयं आधी ठरवायची असतात. त्यासाठी कष्ट करावे लागतात. पंतप्रधान मोदींकडून हे शिकलं पाहिजे. ते दिवसांतले 22 तास काम करतात. काही तासांची झोपसुद्धा पुरेशी असते."

पण पुण्यात काही जणांना दुपारी 1 ते 4 झोपण्याची सवय असते, असा उपदेश पाटील यांनी कार्यकर्त्यांसह पुणेकरांना दिला. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.

2. विहिंपने धार्मिकस्थळांसाठी मोर्चे काढण्यापेक्षा प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन करावं - अस्लम शेख

कोरोना विषाणू संसर्ग आणि लॉकडाऊनपासून बंद असलेली धार्मिक स्थळं उघडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने मोर्चाचं आयोजन केलं. यावरून वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे आणि मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

"सध्याच्या काळात स्थळं उघडणं हा जनतेच्या जीविताच्या सुरक्षिततेपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे का? यापेक्षा प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यासाठी जर विश्व हिंदू परिषदेचे लोक रस्त्यावर उतरले असते, तर ते जनतेच्या फायद्याचं ठरलं असतं," असं मत अस्लम शेख यांनी व्यक्त केलं.

अस्लम शेख

फोटो स्रोत, Facebook

"कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव आखण्यात आला आहे. लवकरच धार्मिक स्थळं उघडण्यात येतील. महाविकास आघाडी सरकार या संदर्भात एक आदर्श कार्यप्रणाली (S.O.P) तयार करूनच हा निर्णय घेईल," असं अस्लम शेख म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

3. पंतप्रधान मोदी यांचा 45 दिग्गज CEO शी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगभरातील तेल आणि वायू कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये (सीईओ) एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. सोमवारी (26 ऑक्टोबर) संध्याकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होईल.

निती आयोग आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात जागतिक तेल आणि वायू क्षेत्राला आकार देणारे 45 मुख्य कार्यकारी अधिकारी यामध्ये सहभागी होणार आहेत. दर दोन वर्षांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, PIB

सध्याच्या काळात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक देश बनला आहे.

भारताची तेल आणि वायू क्षेत्रातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी 2030 पर्यंत 300 अब्ज डॉलर्सची (21 लाख कोटी) गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. भारतीय तेल वायू साखळीत गुंतवणूक वाढवण्यासाठी सर्वोत्तम पद्धती जाणून घेणे, सुधारणांवर चर्चा, रणनीतींची माहिती देणे हा या बैठकीचा उद्देश आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

4. माझ्या भवितव्याबाबत कुणीही चिंता करू नये - पंकजा मुंडे

एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पंकजा मुंडे यांच्याबाबतही चर्चा सुरू होती. या चर्चांना पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे.

माझ्या भवितव्याबाबत कुणीची चिंता करू नये, असा टोला पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला आहे.

पंकजा मुंडे

फोटो स्रोत, Twitter/Pankaja Munde

"कार्यकर्त्यांचे प्रेम आणि उत्साह हेच माझ्यासाठी मोलाचे आहे. गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी केलेले भाजपसाठीचे काम महत्त्वाचे आहे. मी माझी भूमिका गोपीनाथ गडावर स्पष्ट केली होती. ऊसतोड मजुरांचा संप आता संपला आहे. ऊस कामगारांच्या मुद्द्यावरून कोणी हाता राजकारण करू नये," असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे तब्बल आठ महिन्यानंतर बीड जिल्ह्यात आल्या. यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं. आता पंकजा या सावरगावमध्ये दसरा मेळावा घेणार आहे. हा मेळावा ऑनलाईन होणार असून इथं त्या काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे. ही बातमी झी 24 तासने दिली आहे.

5. अपक्ष आमदार गीता जैन यांचा शिवसेनेत प्रवेश

मिरा-भाईंदरमधील अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी गीता जैन यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

गीता जैन या 2002 मध्ये काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्या. 2007 च्या महापालिका निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

2012 ला भाजपकडून विजय मिळवला. 2014 मध्ये त्यांनी मिरा-भाईंदर महापालिकेच्या नगरसेविका म्हणून काम पाहिलं. तर 2017 मध्ये त्या पुन्हा भाजपकडूनच नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.

2019 विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडे तिकिटाची मागणी केली होती. पण तिकीट नाकारण्यात आलं. त्यांनंतर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. यावेळी त्यांनी भाजपचे तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. निवडून आल्यानंतर त्यांनी भाजप पक्षालाच पाठिंबा जाहीर केला. पण आता एका वर्षाने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )