दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खानची NCB च्या कार्यालयात चौकशी

अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या मुंबईतील कार्यालयात चौकशी करण्यात आली.

अभिनेत्री दीपिका पदुकोणची एनसीबी कार्यालयात 5 तास चौकशी करण्यात आली. तर सारा अली खानची 4 तास चौकशी करण्यात आली. वृत्तसंस्था ANIनं ही बातमी दिली आहे.

NCB अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची ड्रग्जच्या अँगलनं चौकशी करत आहे.

शुक्रवारी (25 सप्टेंबर) अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश या दोघीजणी एनसीबीच्या चौकशीला सामोऱ्या गेल्या.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने ड्रग्जप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंहला समन्स बजावलं होतं, अशी बातमी एएनआय या वृत्तसंस्थेनी 23 सप्टेंबर रोजी दिली होती.

एनसीबीच्या या चौकशी किंवा समन्सवर अद्याप दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अभिनेता सुशांत सिंह याच्या मृत्यूची चौकशी असताना ड्रग्जचा अँगल समोर आला होता. एनसीबीने सुशांत सिंहची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केली होती.

रियासोबत तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, तसंच सुशांतच्या घरातील मदतनीस दीपेश सावंत NCB चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांच्या माहितीनुसार दीपेश सावंत यांना ड्रग्स खरेदी आणि देवाण-घेवाणप्रकरणी अटक करण्यात आली होती.

रिया आणि शौविकला सहा ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

NCB नं केलेल्या चौकशीत रियानं काही अभिनेत्रींची नावं उघड केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं.

या चार अभिनेत्रींव्यतिरिक्त फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा हिलाही एनसीबीनं समन्स बजावलं आहे.

दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर जया साहा हिने अमली पदार्थविरोधी पथकाकडून (एनसीबी) होणाऱ्या चौकशीत अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचं नाव घेतल्याची बातमी काही माध्यमांनी दिलीये.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)