अनुराग कश्यप: लाइट, कॅमेरा, अॅक्शन आणि न पटणाऱ्या गोष्टींवर रिअॅक्शनही...

    • Author, विकास त्रिवेदी
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर तसेच कार्यालयांवर आयकर विभागाकडून छापे मारण्यात आले.

आयकर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कर चोरी प्रकरणी या अभिनेत्यांवर छापेमारी सुरू करण्यात आली आहे. याचसोबत फॅंटम फिल्मवरही छापासत्र सुरू करण्यात आलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनीही या प्रकरणी केंद्र सरकारवर टीका करताना म्हटलं, "ज्या पद्धतीने अनुराग कश्यम आणि तापसी पन्नू यांच्या घरी आणि आस्थापनेवर छापा मारण्यात आला यातून हे दिसते की जे लोक केंद्र सरकार विरोधात भूमिका घेतात त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे."

काँग्रेसनेही अशीच टीका केली होती.

यानंतर अनुराग कश्यप हे नाव पुन्हा चर्चेत आलं.

अनुराग हे केवळ आपल्या चित्रपटांसाठीच ओळखले जात नाहीत, तर रोखठोक भूमिकांसाठीही ओळखले जातात. बीबीसी प्रतिनिधी विकास त्रिवेदी यांनी जून 2020 मध्ये अनुराग कश्यप यांच्याशी संवाद साधला होता. या मुलाखतीत अनुराग यांनी आपली चित्रपट निर्मितीची प्रक्रिया, माध्यमांबद्दलची भूमिका, आपली राजकीय मतं यावर भाष्य केलं होतं. या मुलाखतीचा संपादित अंश.

एक मुलगा रोज झाडाखाली उभा राहून चिंचा पाडण्याचा प्रयत्न करायचा. पण त्याचा नेम लागायचा नाही. दगड लांब जाऊन पडायचा. लोक त्याच्याकडे पाहून हसायचे. एक दिवस त्या मुलानं मारलेला दगड दुसऱ्या मुलाला जाऊन लागला. तो मुलगा चिंचा पाडणाऱ्या मुलाला शाळेत त्रास द्यायचा. नंतर कळलं की, खरंतर तो मुलगा दुसऱ्या मुलाला दगड कसा मारता येईल याचीच प्रॅक्टिस करत होता आणि लोकांना असं वाटावं की, हा तर बिचारा चिंचा पाडत होता.

एखाद्या शाळकरी मुलानं अशाप्रकारच्या गोष्टी लिहिणं कोणाच्या पचनी पडणारं नव्हतं. त्यामुळे या मुलाच्या गोष्टी कधीच छापून आल्या नाहीत. शेवटी त्यानं गोष्टी लिहिणंच थांबवलं.

अर्थात, मोठा झाल्यावर पुन्हा एकदा त्याचं लिखाण सुरू झालं. तो 40-50 पानं हातानं सहजच लिहून काढायचा.

काही कथांनी त्याला नाव मिळवून दिलं आणि काहींनी केवळ पैसे. मालिका, चित्रपट लिहिले. त्यानंतर त्यानं एका अशा नावानं चित्रपट बनविण्याचा विचार केला, ज्या नावाच्या चित्रपटाला 2020 साली ऑस्कर मिळालं होतं. पण नंतर त्यानं आपल्या चित्रपटाचं नाव बदलण्याचा विचार केला. कारण या नवख्या दिग्दर्शकाला वाटलं की, 'पॅरासाइट' हे नाव लोकांना चटकन समजणार नाही. त्यामुळे 'पॅरासाइट' हे नाव बदलून पांच हे नाव ठेवण्यात आलं. 'पांच' हा चित्रपट आजतागायत थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला नाही.

चिंचा पाडणाऱ्या मुलाची ती गोष्ट लिहिणारा मुलगा म्हणजे अनुराग कश्यप. त्याने लिहिलेल्या गोष्टी कदाचित आजही अनेकांच्या पचनी पडत नाहीत. पण यामुळे अजिबात विचलित न होता अनुराग लाइट, कॅमेरा, अॅक्शन म्हणतच आहेत आणि ज्या गोष्टींमुळे त्रास होतो, त्यावर रिअॅक्शनही देत आहेत.

अनुराग कश्यप यांना मीडियाचं वावडं का आहे?

गँग्स ऑफ वासेपूरमध्ये 'रिश्तों के भी रूप बदलते हैं, नए-नए सांचों में ढलते हैं' हे मालिकेचं टायटल साँग सुरू असतानाच गोळीबार सुरू होण्याचा सीन असो, की मुक्काबाज चित्रपटात रोमँटिक सीननंतर टीव्हीतून 'ये आसन कई बार करें' असं सांगणारा रामदेव बाबांचा आवाज...अनुराग कश्यपच्या चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंडला टीव्हीचे आवाज कौशल्यानं वापरलेले असतात.

'चोक्ड' चित्रपटातही बॅकग्राऊंडला असेच आवाज ऐकायला मिळतात.

''मशरूम खाइए, नरेंद्र मोदी बन जाइए. जी हां चौंकने की आवश्यकता नहीं. प्रधानमंत्री मोदी की चुस्ती फुर्ती के पीछे मशरूम...''

''नक्सलियों की नाक में दम हो गया है. 500-1000 नोट बंद किए जाने से इन लोगों की प्लॅनिंग बिगड़ गई है.''

याच चित्रपटातील एका दृश्यात नवीन नोट घ्यायला गेलेली व्यक्ती विचारते- नोटेमध्ये मायक्रोचिप आहे का?

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर अशाप्रकारच्या बातम्या तुम्हीही न्यूज चॅनेल्सवर ऐकल्या असतील.

अनुराग कश्यपना मीडियाचं वावडं आहे का?

या प्रश्नाचं उत्तर देताना अनुराग कश्यप आपल्या लहानपणीची एक आठवण सांगतात.

"जेव्हा आम्ही मोठे होत होतो, तेव्हा आमचे वडील नेहमी सांगायचे की, वर्तमानपत्रं वाचा. जगात काय सुरू आहे, हे कळायला हवं. छापून आलेला शब्द महत्त्वाचा मानला जातो, सत्य मानला जातो. आपण चित्रपटांमध्येही पाहतो की, पत्रकार हा नेहमी गरीब असतो. झोला अडकवून, कुर्ता-पायजमा घालून सत्याच्या मार्गावर चालणारा असतो. पण तुम्ही मोठे होता, तेव्हा कळतं की, वर्तमानपत्रात जे छापलं आहे ते सत्य नाहीये."

अनुराग यांनी पुढे म्हटलं, "जिथून जास्त जाहिराती येतात, त्यांचं अनेकदा बातम्यांवर नियंत्रण असतं. अजून जरा कळतं झाल्यावर लक्षात आलं की, फिल्म कंपन्या, मीडिया काही ठराविक भांडवलदारांच्या हातात आहेत.

नंतर गेल्या पाच-सहा वर्षात असं लक्षात आलं की, जे संपादक आहेत, त्यांना हटविण्यात येतंय. जे स्वतःची भूमिका मांडू पाहतात, स्वतःवर संपादकीय नियंत्रण लादून घेऊ इच्छित नाहीत, त्यांना काढण्यात आलं. त्यानंतर तुमच्या लक्षात येतं की, एकतर्फी बातम्या दिल्या जात आहेत. याचा मला त्रास व्हायला लागला. सत्य काय आहे? त्याचा शोध कुठे घ्यायचा? असे प्रश्न मला पडायला लागले."

चित्रपट बनविण्यापूर्वी कायद्याच्या अभ्यासाचा सल्ला का?

अनुराग कश्यप यांना सत्याबद्दल प्रश्न पडत असले, पण एकदा अनुरागही खोट्या प्रचाराला बळी पडले होते. काही महिन्यांपूर्वी अनुराग कश्यप यांनी हिटलरच्या भाषणाचा चुकीचे सबटायटल असलेला व्हीडिओ शेअर केला होता. अर्थात, हे ट्वीट त्यांनी लगेच डिलीटही केलं होतं.

अनुराग याबद्दल सांगतात, "एक-दोन ठिकाणी ही बातमी वाचली आणि चुकून रिट्वीट केली. नंतर कळलं की, ती बातमीच चुकीची आहे. चुकीच्या बातम्या एकाच बाजूने येत नाहीत, सगळीकडूनच येतात. प्रचाराला उत्तर प्रचारानंच दिलं जातं. पत्रकार असल्याची मर्यादा सांभाळणारे मोजकेच लोक आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे की, जे खरं आहे असं समजत मोठे झालो, त्या आदर्शांची आज काहीच किंमत नाहीये."

खरं बोलणं हे धाडसाचं समजलं जातं. एवढं धाडस येतं कोठून असा प्रश्न लोक विचारतात. याआधी लोकांच्या मनात असा विचारही यायचा नाही. खरं बोलण्यासाठी धाडस लागत नाही, नियत लागते. आता असं वाटायला लागलंय की, जर तुम्ही पाचपेक्षा जास्तवेळा खरं बोललात तर परमवीर चक्र दिलं जाईल. आपला देश आता अशा परिस्थिती येऊन पोहोचला आहे. काही ठराविक लोकच अर्थव्यवस्था, बातम्या, सरकार, सिस्टीम...सगळंच नियंत्रित करत आहेत."

अनुराग कश्यप यांनी म्हटलं, "या लोकांना वाटतंय की, आपण सगळ्यांनी हिंदू-मुस्लिमसारख्या वादात अडकून पडावं. मग प्रश्न मजुरांचं स्थलांतर असो की कोव्हिड-19. सध्याचा काळ असा आहे की, आपण काही बोलूही शकत नाही. कारण ही सिस्टीम आपल्याला काही बोलू देत नाही."

आपल्याला स्वतःचे मार्ग शोधावे लागतातच. कायद्याचा, संविधानाचा अभ्यास करायला हवा.

पहिला चित्रपट पांच, ब्लॅक फ्रायडेपासून उडता पंजाब प्रोड्युस करण्यापर्यंत अनुराग कश्यपना कधी सेन्सॉर बोर्ड, कधी कोर्टाची लढाई लढावी लागली. यावेळी अनुराग कश्यपना कायद्याचा अभ्यास करणं उपयोगी ठरलं.

ते सांगतात, "चित्रपट बनवण्याआधी राज्यघटना, कायद्याचा अभ्यास करावा असा सल्लाच मी देतो. ज्या गोष्टीसाठी आपण लढू शकतो, चित्रपटात त्याच उतराव्यात. कारण सिनेमा हे इतकं स्वस्त माध्यम नाहीये. पैसा आणि अनेक लोकांचे श्रम गुंतलेले असतात. त्यामुळे मला जर माझं म्हणणं मांडायचं असेल तर कायद्याच्या चौकटीत राहूनच मांडावं लागेल. माझे अनेक चित्रपट वादात सापडले होते. पण शेवटी विजयाचा मार्ग खडतरच असतो."

'नायक' आवडत नसलेला दिग्दर्शक?

'चोक्ड' चित्रपटातील एक सीन शूटिंगच्याच वेळी कापण्यात आला. या प्रसंगात दोन लोक एकमेकांसोबत बोलत असतात. एकजण म्हणतो की, पीएम मोदींनी आपलं घरदार सोडलं आहे. दुसरा माणूस उत्तर देतो- इंदिरा गांधींनीसुद्धा घर सोडलं होतं.

अनुराग यांनी म्हटलं, "पंतप्रधानांना देशानं नायक बनवून ठेवलं आहे. नायक बनवण्याच्या नादात त्यांनी घराचा त्याग केला, यासारख्या कथा रचल्या गेल्या. अशा कथाकहाण्या रचून तुम्ही एखाद्या व्यक्तिला मायथॉलॉजी (पुराणकथा) बनवत आहात. मी स्वतःबद्दलही विकिपीडियावर वाचतो की, या माणसानं रस्त्यावर दिवस काढले होते. मायथॉलॉजीचा अर्थच एखादी गोष्ट सत्य नसणं हा आहे. सत्याच्या आसपास जाणारी ही कथा आहे, हेच लोकांच्या लक्षात येत नाही. मी माझ्या संघर्षाबद्दलही अशा कथा ऐकल्या आहेत.

मला स्वतःला संघर्ष करून आनंद मिळाला आहे. मी स्ट्रगल केला, कारण ती माझी 'चॉइस' होती. पण लोक हे लक्षात घेत नाहीत. पंतप्रधान मोदींनादेखील ही गोष्ट लागू होते. त्यांनी हे केलं, ते केलं असं सांगितलं जातं. असं शोधायला बसलो तर सगळ्यांच्याच कहाण्या सापडतील."

हे सांगत असतानाच अनुराग त्यांच्या 'चोक्ड' चित्रपटातल्या त्या सीनबद्दल सांगतात. "लोकांच्या अशाच कहाण्या सांगण्याच्या स्वभावावरून आम्ही हा सीन लिहिला होता. त्यानंतर लक्षात आलं की, चित्रपटातील नायिका सरिता (सयामी खेर) हिला गाण्यांची आवड आहे. ती राजकारणावर का भाष्य करेल? त्यावेळी चित्रपटाचा लेखक निहित भवेने म्हटलं की, सरिता अनुराग कश्यपप्रमाणे बोलत आहे."

"चित्रपट बनवताना प्रामाणिक राहणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला तुमची गोष्ट बाजूला ठेवून कथा सांगावी लागते. भाष्य करायचं असेल तर ट्विटरवर करतोच. चित्रपटातूनही हे करू शकतो...अगदी टोकदारपणे करू शकतो. पण मग प्रोपागंडाचं उत्तर प्रोपागंडानं दिल्यासारखं वाटेल."

अनुराग कश्यपचे चित्रपट समजून घेणं अवघड का?

अनुराग कश्यप यांच्या 'बॉम्बे वेलवेट', सेक्रेड गेम्स-2, 'चोक्ड'सारख्या चित्रपटांमध्ये असे अनेक सीन्स आहेत, जे समजून घेणं अवघड आहे.

साध्यासरळ शब्दांत कथा न सांगितल्याने चित्रपटाचं नुकसान होतं नाही का?

याबद्दल अनुराग कश्यप म्हणतात, "नुकसान तर होतंच. मी जर हे असं आहे, तसं आहे असं सगळं सरळसोटपणे सांगायला लागलो तर तो चित्रपट कथा न राहता भाषण होतो. मला भाषण द्यायचं नाहीये. भाषणाला स्थळ-काळाची मर्यादा असते, वेळ बदलल्यानंतर त्या भाषणाचं मूल्य संपुष्टात येतं. एखाद्या गोष्टीचा परिप्रेक्ष्य समजण्यासाठी 15 ते 20 वर्षांचा कालावधी द्यावा लागतो. जर्मनीमध्ये जेव्हा नाझीवाद आला, तेव्हा त्यांना असं वाटलं होतं की, हे काहीतरी वेगळं आणि चांगलं आहे. पण त्याचे दुष्परिणाम दुसरं महायुद्ध संपल्यानंतर लक्षात आले.''

"भारतात चित्रपटांमध्ये नेहमी एकच मेसेज असतो. चांगलं करा, चांगलं मिळेल आणि वाईट वागला तर वाईट होईल, हाच संदेश दिला जातो, जगानं काय शिकलं? काही नाही. आपण लोक संस्कार, कौटुंबिक मूल्यांचा विचार करतो, पण आपल्या आयुष्यात ही मूल्यं कोठे आहेत. आपल्याला अगदी लहान मुलांसारखं वागवलं जातं. जनता काय मूलच आहे, हा कन्टेन्ट अडल्ट आहे. आम्हाला 'मोठं' होऊ द्या. 18 वर्षांचा झाल्यामुळे माणूस 'जाणता' होत नाही. माणूस जाणता तेव्हा होतो, जेव्हा तो स्वतःसाठी विचार करायला लागतो. तुम्हाला मात्र वाटतं की, जगानं तुमची 'मन की बात' ऐकावी, पण आपली 'मन की बात' करू नये," असं अनुराग कश्यप यांनी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांना विरोध का?

अनुराग कश्यप हे वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात मतप्रदर्शन करताना दिसतात.

नोटबंदीपासून लॉकडाऊनपर्यंतच्या सरकारच्या अनेक विषयांवर अनुराग कश्यप यांनी टीका केली होती.

त्याबद्दल बोलताना अनुराग यांनी म्हटलं, "ज्यादिवशी नोटबंदी घोषित करण्यात आली, त्यादिवशीचं माझं ट्वीट शोधून पाहा. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे, असं म्हणणाऱ्यांपैकी मी एक होतो.

हा निर्णय घेतलाय म्हणजे दोन वर्षांपासून नियोजन सुरू असेल, असं मला वाटलं होतं. नवीन नोटा वगैरे तयार असतील, तेव्हाच त्यांनी अशी घोषणा केली असेल. जेव्हा चित्रपट तयार होतो, तेव्हाच आम्ही ट्रेलर रिलीज करतो. इथे उलटाच प्रकार होता. चित्रपट प्रदर्शित केला...पण तयारी काहीच नव्हती. स्क्रीनसमोर जाऊन बसल्यावर समोर बोर्ड आला...रुकावट के लिए खेद है. नोटबंदी अशी होती."

अनुराग कश्यप यांनी पुढे म्हटलं, "माझी भाषा सभ्य नसेल, मात्र सभ्य भाषेचा वापर त्यांच्यासाठी केला जातो, जे स्वतः सभ्य असतात.

ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्यांनी राज्यघटना लिहिली त्यांच्याबद्दल गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान कशी भाषा वापरतात? आपले माजी पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याबद्दल कसे शब्दप्रयोग केले जातात? मी जेव्हा हिंदीमध्ये बोलतो, तेव्हा माझं म्हणणं त्या लोकांपर्यंत पोहोचतं, ज्यांच्यापर्यंत ते पोहचू नये, असं यांना वाटतं."

इतर सरकारांवरही अशीच टीका?

अनुराग कश्यप यांच्या अनेक चित्रपटांवर निर्बंध घालण्यात आले होते. अनुराग कश्यपने चित्रपटांमधून, सीरीजमधून काँग्रेसवरही टीका केली आहे.

सेक्रेड गेम्समध्ये राजीव गांधी यांच्या उल्लेखावरून वाद झाला होता आणि गुलाल चित्रपटात इंदिरा गांधी यांच्या 'गरीबी हटाओ' घोषणेवर भाष्य करण्यात आलं होतं.

अनुराग यांनी म्हटलं, "माझा याआधीही सरकारांसोबत संघर्ष झाला आहे, पण कोणी कधी भीती नाही घातली. कोणी कधी हे नाही म्हटलं, की तुम्ही हे असं कसं करू शकता? माझे पहिले तीनही चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत अडकले होते. गुलाल चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा काँग्रेसची सत्ता होती. गुलालच्या सुरुवातीच्या दृश्यातच काँग्रेसवर टीका करण्यात आली होती. त्यावेळी कोणत्याही सरकारकडून त्रास झाला नाही. मला सेन्सॉर बोर्डानं प्रश्न विचारले, मी उत्तरं दिली आणि चित्रपट प्रदर्शित झाले. मी कधीच असं वातावरण अनुभवलं नव्हतं. जर तुम्ही कोणाचं मत खोडून काढत असाल, तर तुम्ही देशद्रोही ठरता."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)