IPL 2020: हरभजन सिंगची माघार; चेन्नईला सुपर किंग्सला आणखी एक धक्का

फोटो स्रोत, ANI
अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली आहे. वैयक्तिक कारणास्तव हरभजनने यंदाच्या हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
हरभजन चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे. दुबईत दाखल झाल्यानंतर चेन्नई संघ, सपोर्ट स्टाफ आणि अन्य मंडळी यापैकी 13 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्या सगळ्यांना क्वारंटीन करण्यात आलं.
यानंतर काही दिवसांतच चेन्नईचा भरवशाचा बॅट्समन सुरेश रैनाने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आणि तो मायदेशी परतला. रैना मायदेशी का परतला यावरून उलटसुलट चर्चांना उधाण आलं. आता हरभजन सिंगनेही माघार घेतल्याने चेन्नईला नव्याने संघबांधणी करावी लागणार आहे.
2008 ते 2019 अशा आयपीएलच्या सर्व हंगामात खेळणाऱ्या हरभजनने या स्पर्धेत आतापर्यंत 160 मॅचेसमध्ये दीडशे विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत लसिथ मलिंगा आणि अमित मिश्रा यांच्यानंतर हरभजनचा क्रमांक आहे.
मुंबई इंडियन्सचा अविभाज्य हिस्सा असणारा हरभजन गेल्या काही हंगामांपासून धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा भाग आहे. हरभजनच्या फिरकीने धोनीने शिताफीने उपयोग करून घेतला आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी चेन्नईचा संघ युएईला रवाना झाला तेव्हा हरभजन सिंग गेला नाही. तो भारतातच होता. वैयक्तिक कारणांमुळे हरभजन नंतरही युएईला रवाना झाला नाही.
हरभजनच्या आईची प्रकृती बरी नसल्याने तिच्याबरोबर थांबण्यासाठी हरभजनने माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. मात्र यासंदर्भात अधिक तपशील देण्यात आलेला नाही.
दरम्यान चेन्नईने यंदाच्या लिलावात पीयुष चावला आणि करण शर्मा या स्पिनर्सना समाविष्ट केल्याने त्यांना फार समस्या जाणवणार नाही. चेन्नईकडे या दोघांसह इम्रान ताहीर, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा अशी फिरकीपटूंची फौज आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








