कोरोना : अंडरकाउंटिंग म्हणजे काय आणि भारतात किती अंडरकाउंटिंग होतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सौतिक बिस्वास
- Role, भारत प्रतिनिधी, बीबीसी
भारतातल्या कोव्हिड-19 आजारामुळे आतापर्यंत 50 हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोव्हिड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत भारताने युकेला मागे टाकत चौथा क्रमांक लावला आहे.
मात्र, भारतात दर दहा लाख माणसांमागे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण केवळ 34 एवढं आहे. युरोप आणि उत्तर अमेरिकेच्या तुलनेत ही आकडेवारी खूप कमी आहे.
आपला केस फॅटिलिटी रेट (CFR) म्हणेज कोरोनाबाधितांमध्ये मृत्यूचं प्रमाण केवळ 2% आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे मृत्यूदर सर्वात जास्त आहे तिथेदेखील कोव्हिड-19 मृत्यूदराचा डबलिंग रेट 40 दिवसांचा आहे.
म्हणजेच कोरोना विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या दुप्पट होण्यासाठी 40 दिवसांचा वेळ लागतो आहे. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. के. श्रीनाथ रेड्डी म्हणतात, "कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी मृत्यूदर कमी आहे."
अनेक साथरोगतज्ज्ञांच्या मते भारतात कोव्हिड-19 चा मृत्यूदर कमी असण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे इथली तरुण लोकसंख्या. भारतात तरुणांची संख्या मोठी आहे आणि या आजारात सर्वाधिक धोका हा वृद्धांना असतो.
कोरोना कुटुंबातल्या इतर विषाणूंविरोधात तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती हे देखील कमी मृत्यूदर असण्यामागचं कारण आहे का, हे अजून स्पष्ट नाही. शिवाय, दक्षिण आशियातल्या इतरही देशांमध्ये तरुण लोकसंख्या अधिक आहे आणि तिथेही मृत्यूदर कमी आहे. ही बाबही लक्षात घेण्यासारखी आहे.
बांगलादेशात कोव्हिड-19 आजारामुळे दर दहा लाख लोकांमागे मृत्यू होण्याचं प्रमाण 22 आहे तर पाकिस्तानात हेच प्रमाणे 28 एवढं आहे.
लोकसंख्येच्या आकाराच्या दृष्टीने बघितल्यास युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत भारताची परिस्थिती खूप चांगली आहे. मात्र, जागतिक बँकेचे माजी प्रमुख अर्थतज्ज्ञ कौशिक बासू म्हणतात त्याप्रमाणे, "असं कारण देऊन स्वतःची सांत्वना करून घेणं बेजबाबदारपणाचं आहे."

फोटो स्रोत, Sopa images
प्रा. बासू यांच्या मते भौगोलिक परिस्थितीच्या दृष्टिकोनातून तुलना करण्याला मर्यादा आहेत. ते सांगतात, "भौगोलिक परिस्थितीच्या अंगाने तुलना केल्यास तुमच्या असं लक्षात येईल की त्या आघाडीवरही भारताची कामगिरी वाईट आहे.
चीनमध्ये दर दहा लाख लोकांमागे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण केवळ 3 एवढं कमी आहे आणि भारतात 34 आहे. दक्षिण आशियाचा विचार केला तर भारतापेक्षा फक्ता एका देशाची कामगिरी खराब आहे. तो देश आहे अफगाणिस्तान आणि भारताची सध्याची परिस्थिती बघता लवकरच भारत अफगाणिस्तानलाही मागे टाकेल."
प्रा. बासू सांगतात की भारत त्या मोजक्या देशांपैकी एक आहे ज्या देशांमध्ये कोरोना संक्रमणाचा ग्राफ खाली आलेला नाही. ते म्हणतात, "मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ते आतापर्यंत कोरोनाग्रस्त आणि मृत्यूमुखी पडलेल्यांची केवळ संख्याच वाढत आहे, असं नाही तर त्याचा दरही वाढत आहे."
इतकंच नाही तर तज्ज्ञांच्या मते केवळ मृत्यूदर कमी असल्याने संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही. शिवाय, काही राज्यांमध्ये 'अंडरकाउंटिंग' होत असल्याचंही अनेकांना वाटतं. म्हणजे भारतातल्या काही राज्यांमध्ये प्रत्यक्षात जेवढे कोरोनाग्रस्त आहे त्यांची संपूर्ण नोंद होत नाहीय.
पहिली गोष्ट म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने सांगूनही अनेक राज्य संशयित कोरोनाग्रस्तांची कोरोना रुग्ण म्हणून नोंद करत नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
दुसरी गोष्ट अशी की अनेक राज्यांमध्ये कोव्हिड-19 असणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा कोव्हिडमुळे मृत्यू अशी नोंद करण्याऐवजी त्या रुग्णाला इतर कुठला आजार असल्यास त्या आजारामुळे झालेला मृत्यू अशी नोंद करत आहेत. गुजरात आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अंडरकाउंटिंग झाल्याचा अंदाज आहे.
आरोग्यविषयक पत्रकार प्रियंका पुल्ला यांनी याबाबत एक सविस्तर रिपोर्ट केला आहे. गुजरातच्या वडोदरा शहराचं उदाहरण बघूया. या शहरात गेल्या दोन कोरोनाग्रस्तांच्या संख्येत तब्बल 329 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, याच काळात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या केवळ 49 टक्क्यांनी वाढली आहे.
तिसरं म्हणजे कोव्हिड-19 मुळे मृत्यू झालेल्यांची सरकारी आकडेवारी आणि शहरांमधल्या स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या मृतदेहांची संख्या यात तफावत आहे.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

शिवाय, भारतात जेमतेम 2% लोकसंख्येची कोरोना चाचणी झाली आहे. म्हणजे भारतात चाचण्यांचं प्रमाणही खूप कमी आहे. चाचण्यांचं कमी प्रमाण आणि अनेक मृत्यूंची नोंदच न होणं, या सगळ्यामुळे भारतात अनेक कोरोनाग्रस्तांची नोंद होत नाहीय का, असा प्रश्न पडतो.
भरीस भर म्हणजे भारतात होणाऱ्या प्रत्येक चारपैकी एकाच मृत्यूचं कारण दाखल्यावर नमूद केलेलं असतं. दिल्लीतल्या ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेश या संस्थेचे ओमेन सी कुरियन म्हणतात, "भारतातली आरोग्य यंत्रणा कमकुवत असल्याने भारतात अंडरकाउंटिंग होतं, हे तर उघड आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात अंडरकाउंटिंग होत आहे, हा खरा प्रश्न आहे."
मिशिगन विद्यापीठातल्या जीवशास्त्र आणि साथरोगशास्त्राचे प्राध्यापक भ्रमर मुखर्जी सांगतात, "भारतात ऐतिहासिक आकडेवारी आणि या काळात किती अतिरिक्त मृत्यू झाले याची माहिती नसल्याचे नेमकं किती अंडर रिपोर्टिंग होत आहे, हे सांगता येत नाही."
एका विशिष्ट कालावधीत सामान्यपणे जेवढे मृत्यू होतात त्यापेक्षा जास्त मृत्यू झाल्यास त्याला 'अतिरिक्त मृत्यू' (Excess deaths) म्हणतात. या अतिरिक्त मृत्यूंमधले काही मृत्यू हे कोव्हिड-19 आजारामुळे झालेले असू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
भारतात किती 'अतिरिक्त मृत्यू' झाले याची आकडेमोड करण्यासाठी प्रशासनाने किमान गेल्या 3 वर्षातल्या मृत्यूची आकडेवारी द्यावी, अशी मागणी जवळपास 230 भारतीयांनी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. अशी मागणी करणाऱ्यांमध्ये डॉक्टर, संशोधक आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. भारतात दरवर्षी किमान दीड लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतं. या लोकांचं म्हणणं आहे की कोव्हिड-19 मुळे नेमके किती मृत्यू झाले, याचं अधिक विश्वासार्ह माहिती मिळण्यासाठी रस्ते अपघतातल्या मृतांची आकडेवारी वेगळी ठेवावी.
अंडरकाउंटिंग केवळ भारतातच होत आहे, असं नाही. जुलै महिन्यात जगभरातल्या 28 देशांमधल्या मृत्यूच्या आकडेवारीचं विश्लेषण करण्यात आलं. यात असं आढळलं की या देशांमध्ये कोव्हिड-19 आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची जी अधिकृत आकडेवारी देण्यात आली होती त्यापेक्षा 1 लाख 61 हजार जास्त मृत्यू झाले होते. ज्या 28 देशांमध्ये हा अभ्यास करण्यात आला त्यात भारताचा समावेश नव्हता.
टोरंटो विद्यापीठातले प्रभात झा 'Million Deaths Study' या जागतल्या अकाली मृत्यूसंदर्भातल्या सर्वातो मोठ्या अभ्यासांपैकी एक असलेल्या भारताच्या महत्त्वाकांक्षी संशोधनाचे प्रमुख आहेत. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "उत्तम आरोग्य सुविधा असणाऱ्या सधन देशांमध्येसुद्धा रोज होणाऱ्या मृत्यूमध्ये अंडरकाउंटचं प्रमाण तब्बल 30 ते 60% आहे."
डॉ. झा यांचं म्हणणं आहे की भारतातल्या दूरसंचार कंपन्यांनी मार्च महिन्यापासूनचा त्यांचा डेटा सार्वजनिक करायला हवा. यावरून लॉकडाऊनच्या काळात किती भारतीय कामाच्या ठिकाणावरून आपापल्या गावांकडे परतले, याची माहिती मिळू शकेल.
दूरसंचार कंपन्यांच्या या डेटावरून सरकारला अशा हॉटस्पॉट्समध्ये पथकं पाठवून कोव्हिड-19 मुळे झालेल्या मात्र आतापर्यंत नोंद न होऊ शकलेल्या मृत्यूची नोंद करता येईल. तसंच सर्व महापालिकांनी त्यांच्या शहरांमध्ये झालेले एकूण मृत्यू (मग ते कुठल्याही कारणाने झाले असोत) आणि गेल्या काही वर्षात याच काळात झालेले मृत्यू याचा डेटा द्यावा. या आकडेवारीची तुलना करून कोरोना काळात किती 'अतिरिक्त मृत्यू' झाले याची आकडेवारी काढता येईल.
डॉ. झा विचारतात, "भारतात मृत्यूची नीट नोंदच होत नसेल तर कोव्हिड-19 चा आलेख स्थिर कसा करता येईल?"
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी जेव्हा कोरोना विषाणूची ही साथ संपेल त्यावेळी कोव्हिड-19 मुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीवरूनच संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कुठल्या देशाने किती चांगली कामगिरी केली, हे ठरवलं जाईल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








