You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मध्य प्रदेशात केवळ भूमिपुत्रांनाच सरकारी नोकरी - शिवराजसिंह चौहान : #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. मध्य प्रदेशात केवळ भूमिपुत्रांनाच सरकारी नोकरी देणार - शिवराजसिंह चौहान
मध्य प्रदेश सरकारने नोकऱ्यांबाबत एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. मध्य प्रदेशात आता सरकारी नोकऱ्या केवळ भूमिपुत्रांनाच मिळणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सरकारने घेतला आहे. यासाठी आवश्यक असणारा कायदा आणला जाईल, असंही चौहान यांनी स्पष्ट केले आहे. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिले आहे.
एका व्हीडिओच्या माध्यमातून शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा केली आहे. या व्हीडिओमध्ये ते म्हणतात, "मध्य प्रदेशातील सरकारी नोकऱ्यांवर पहिला अधिकार स्थानिकांचा आहे. त्यामुळे सर्व नोकऱ्या त्यांच्यासाठी आरक्षित असतील."
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
मध्य प्रदेशात 27 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय असल्याचं मानलं जात आहे. यापूर्वी कमलनाथ सरकारने स्थानिक उद्योगांमध्ये 70 टक्के रोजगार स्थानिकांना देण्याचं अनिवार्य केलं होतं.
2. अर्णब गोस्वामी पुन्हा अडचणीत
अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून पत्रकार अर्णब गोस्वामी कोणत्याही पुराव्याशिवाय शिवसेना आणि सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांना टार्गेट करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.
अर्णब गोस्वामी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशा मागणीचं निवेदन त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
पत्रकार अर्णब गोस्वामी अत्यंत बेजबाबदार बातम्या देत असून कॅबिनेट मंत्र्यांवर बेछूट आरोप करण्यापर्यंत चॅनेलची मजल गेल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करताना त्यांची देहबोली संतापजनक आणि आक्षेपार्ह होती. तसेच ते प्रेस काऊन्सील ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचं सावंत यांनी म्हटलंय.
'पुरावा नसताना अशाप्रकारे बातम्या प्रसिद्ध केल्याने तपास यंत्रणांच्या कामात व्यत्यय येऊ शकतो. अशा बातम्यांमुळे समाजातही तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे,' असं निवेदनात म्हणत अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या वृत्तवाहिनीवर कारवाई करवी अशी मागणी अरविंद सावंत यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.
3. फिलिपिन्समध्ये 'धारावी पॅटर्न' राबवला जाणार
आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धारावीत कोरोना विषाणूच्या संसर्गाला आटोक्यात आणण्यात सरकारला यश आलं. याच धारावी पॅटर्नची दखल WHOने घेतल्यानंतर आता फिलिपिन्समध्ये 'धारावी पॅटर्न' राबवला जाणार आहे. सामना या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
फिलिपिन्समधील काही भाग दाटीवाटीचा असून धारावीसारख्या झोपड्यांनी व्यापलेला आहे. याठिकाणी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी फिलिपिन्स धारावी पॅटर्न अंमलात आणणार आहे. यासाठी फिलिपिन्स सरकारने मुंबई महानगरपालिकेशी संपर्क साधून धारावी पॅटर्नची माहिती घेतली आहे.
धारावीत कोरोना रोखण्यासाठी मिशन धारावी राबवण्यात आलं होतं. त्याअंतर्गत ट्रेसिंग, ट्रॅकींग, टेस्टींग, ट्रिटींग असा चतु:सुत्री कार्यक्रम धारावीमध्ये राबवण्यात आला होता.
4. पुण्यात रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट 50 रुपये कारण...
पुण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मचे तिकिटाचे दर 50 रुपये केल्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. राजकीय नेत्यांनीही यासाठी भाजपवर आरोप केलेत. पण कोरोना काळात विनाकारण लोकांनी प्लॅटफॉर्मवर येऊ नये यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवल्याचे स्पष्टीकरण रेल्वेकडून देण्यात आले आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
कोरोना काळात सुरुवातीपासूनच रेल्वेकडून 250 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट दर वाढवल्याची माहिती रेल्वेच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मवर लोकांनी गर्दी करू नये तसंच सोशल डिस्टंसिंग पाळता यावं यासाठी दरात पाच पट वाढ करण्यात आल्याचंही रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी प्लॅटफॉर्म तिकिटाच्या या दरवाढीव दरावरून भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, "काँग्रेसच्या काळात प्लॅटफॉर्म तिकीट 3 रुपये होतं. पण भाजपच्या काळात हे दर 50 रुपयांपर्यंत पोहेचले."
5. भारतात प्रत्येक चार व्यक्तींमागे एकाच्या शरीरात अँटीबॉडी
भारतात दर चार व्यक्तींमागे एका व्यक्तीच्या शरीरात कोरोनाचा सामना करण्यासाठी अँटीबॉडीज तयार झाल्याची शक्यता असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. एका राष्ट्रीय पातळीवरील प्रयोगशाळेने हे सर्वेक्षण केलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
पुणे, मुंबईसारख्या शहरांमधील स्थानिक स्वराज्य संस्था आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR,IISER) अशा काही स्वतंत्र संस्थामध्ये हे सर्वेक्षण पार पडलं. मुंबईत झोपडपट्टी भागांमध्ये 57 टक्के तर पुण्यात 50 टक्के सेरो पॉझिटीव्हीटी असल्याचं समोर आले आहे.
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज असतात तेव्हा त्या व्यक्तीकडे कोरोनाच्या विषाणूंचा सामना करण्यासाठी प्रतिकारक्षमता असते. पण ही प्रतिकारक क्षमता तात्पुरती आहे की दिर्घ काळासाठी हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, ऑक्सफर्डची अस्ट्रा-झेनेका लस भारतात वर्षाअखेरीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतात स्थानिक कंपनीकडूनही लशीचं उत्पादन होणार आहे. यासाठीची प्रक्रिया वेळेत पार पडली तर ही लस काही आठवड्याच्या अंतराने भारतीय बाजारात उपलब्ध होऊ शकते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)