गणपती : गणेशोत्सवासाठी कोकणात वैद्यकीय सुविधा पुरेशा आहेत का?

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

यंदा सर्व सण आणि उत्सवांवर कोरोनाचं सावट आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. पण दरवर्षीसारखी लगबग खचितच पाहायला मिळतेय.

गणेशोत्सवासाठी अनेक अटी आणि नियम सरकारने घालून दिलेले आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या दरवर्षी पाच ते सहा लाखांपेक्षा अधिक असते.

यंदा या प्रवाशांची संख्या कोरोनाच्या सावटामुळे लाखांवरून हजारांवर आली असली तरीही सध्याच्या परिस्थितीत ती जास्त आहे.

चाकरमान्यांना कोकणात पाठवण्यावरून बरीच चर्चा झाली असली तरी तिथं पुरेशा वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत का? मुळातच गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाण्याची इतकी धडपड का असते? हा प्रश्न उपस्थित होतो.

गणेशोत्सवात लोक कोकणात का जातात?

कोकणात इतर सणांपेक्षा गणपती आणि शिमगा या दोन सणांना जास्त महत्त्व आहे. कोकणातला माणूस गणपतीला मुंबईहून काहीही करून कोकणात पोहचतोच. ही जणू परंपरा झालीये. याची सुरुवात कशी झाली?

पंचांग अभ्यासक दा. कृ. सोमण सांगतात, "पूर्वी कोकणातल्या घरातला एक माणूस मुंबईत कापड गिरणीत काम करायचा. गावी मनिऑर्डर पाठवायचा. भाद्रपद महिन्यात भात शेतीच्या काढणीचा काळ असतो. त्यात घरात भरपूर अन्न यायचं पैसाही यायचा. त्यात मुंबईत असणारा घरचा मुलगा गावाला यायचा."

पुढे सोमण सांगात, "या काळात कोकणी माणसाकडे पैसे जमा होतात. मग मुंबईहून येणाऱ्यांचा पाहुणचार व्हायचा. माणसांनी भरलेलं घर आणि भातशेतीतून मिळालेले पैसे त्यात असणारा गणपती उत्सव हा दणक्यात साजरा केला जायचा.

"कोकणातलं गरीब-श्रीमंत सर्वांचं घर अन्नधान्य, पैसे आणि माणसांनी समृद्ध असायचं. मग हळूहळू गणपतीला गावी जाण्याची परंपरा सुरू झाली. जी आजही पाळली जाते. वाडीवाडीत गणपती उत्सव पारंपरिक पध्दतीने साजरा केला जातो म्हणून कोकणी माणसाला गणपती उत्सवाचं आकर्षण आहे," सोमण सांगतात.

हजारो लोक कोकणात रवाना..!

यंदाच्या वर्षीही कोरोनाच्या संकटामुळे क्वारंनटाईन आणि इतर गोष्टींमुळे 6 ऑगस्ट 2020 पासूनच गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी एसटीने मुंबई, ठाणे, पालघरच्याा प्रमुख बसस्थानकांवरून 125 बसेस सोडल्या. त्यासाठी 12 ऑगस्टपर्यंत ई-पास आणि कोव्हिड टेस्ट करणं हे बंधनकारक नव्हतं.

त्यामुळे 12 ऑगस्टपर्यंत एसटीमधून 10 हजार लोक कोकणात रवाना झाल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. इतकंच नाही तर 12 ऑगस्टनंतरची बुकिंगही सुरू आहेत.

तिकडे संपूर्ण भारतात नियमित रेल्वे सेवा बंद असली तरी मध्य रेल्वेने कोकणात जाण्यासाठी 162 गाड्या सोडल्या तर पश्चिम रेल्वेकडून 20 गाड्या सोडण्याची घोषणा करण्यात आली.

पण आतापर्यंत 1048 प्रवासी रेल्वेमधून कोकणात गेल्याची माहिती रेल्वे जनसंपर्क अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त खासगी गाड्यांमधून हजारो लोक कोकणात दाखल झालेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांची रीघ यावर्षीही आहेच.

संसर्ग वाढला तर?

अशा वेळी कोकणात कोरोना बाधितांची संख्या वाढल्यावर काय होणार हा प्रश्न उरतोच.

कोकणातल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये एकूण 27,793 कोरोना रूग्ण झाले आहेत. पण सध्या वाढत्या प्रवाशांमुळे रूग्णांची संख्या वाढू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलमध्ये फक्त 70 बेडची व्यवस्था आहे.

कणकवली विधानसभा मतदारसंघाची आरोग्य व्यवस्था कशी आहे याबाबत आमदार नितेश राणे सांगतात, "ज्या ठिकाणी 10 डॉक्टर्सची गरज आहे त्याठिकाणी दोन डॉक्टर आहेत. त्यामुळे डॉक्टरांची प्रचंड प्रमाणात कमतरता आहे. सुरक्षेच्या कारणावरून 30-40 खासगी दवाखाने बंद ठेवले आहेत. खासगी हॉस्पिटलमधलेही बेड पुरेसे नाहीत."

ते पुढे म्हणतात, "ट्रॉमा किंवा इतर एमरजन्सीसाठी रूग्णाला सिंधुदुर्गवरून गोवा किंवा कोल्हापूरला घेऊन जावं लागतं. नॉन कोव्हिड पेशंटसाठीही सरकारने कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. आता जर इमरजन्सी असेल तर गोवा आणि कोल्हापूर या दोन्ही हद्दी बंद आहेत. मग लोकांनी काय करायचं? संसर्ग वाढला तर काय?"

राणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत सरकारचं काय म्हणणं आहे यासाठी आम्ही सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी आणि पालकमंत्री उदय सामंत यांना वारंवार संपर्क केला, पण हा संपर्क होऊ शकला नाही. त्यांचा संपर्क झाल्यावर त्यांची बाजू इथं देण्यात येईल.

शक्य असल्यास येऊ नका!

जिल्ह्यात येणाऱ्या लोकांना विलगीकरण कक्ष, कोव्हिड सेंटर, ऑक्सिजन बेडसारख्या शक्य त्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातोय. पण तरीही लोकांमध्ये या रोगाविषयी मनात भीती आहे.

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी सांगतात, "चक्रीवादळामुळे अनेकजण गावी आले होते. ते इथेच आहेत. तरीही जे लोकं गणेशोत्सवासाठी मुंबईतून येतायेत. त्यांना आम्ही विलगीकरण कक्षात ठेवतोय. आम्ही जास्तीत जास्त लोकांच्या टेस्ट करतोय.

"त्याचबरोबर आम्ही जिल्ह्यात 12 खासगी हॉस्पिटल ऑन बोर्ड घेतलेले आहेत. 900 ऑक्सिजन सपोर्ट बेडच्या सुविधा तयार केली आहे. ई-पासमुळे नियंत्रण ठेवणं सोपं जात आहे. पण तरीही आपण सर्व सण साधेपणाने साजरे केले आहेत मी मुंबईतून येणार्‍या लोकांना आवाहन करेन की त्यांना गरज नसेल कृपा करू जिथे आहेत तिथेच थांबून गणेशोत्सव साजरा करावा," चौधरी सांगतात.

रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक एस. के. फुले सांगतात, "कोव्हिड रूग्णांसाठी सर्व हॉस्पिटल्स मिळून साधारण 400 बेडपर्यंतच्या सुविधा आम्ही केलेल्या आहेत. त्यापैकी 100 बेडपर्यंत ऑक्सिजन बेड आहेत. नॉन कोव्हिडसाठी 100 बेड उपलब्ध केले आहेत. पण अजून हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची गरज आहे. हॉस्पिटलचा स्टाफ कोरोनाच्या भीतीमुळे कमी येतोय. त्यांना आम्ही काऊंसिलींग करून आता आणण्याचा प्रयत्न करत आहोत."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)