You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवाजी महाराजांवरील धडे कर्नाटक सरकारने अभ्यासक्रमातून वगळले
- Author, इम्रान कुरेशी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागानं कोरोना संकटाचं कारण देत शालेय अभ्यासक्रमातून शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्यावरील धडे वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
यासोबतच विजयनगर साम्राज्य, बहामणी साम्राज्य, राज्यघटनेतील काही भाग आणि इस्लाम, ख्रिश्चन धर्माशी निगडित काही भाग वगळण्याचा निर्णयही घेतला आहे.
यासाठी कोरोनाचं संकट हे कारण देण्यात आलं आहे. इयत्ता सहावी ते नववीच्या कोर्सचा कालावधी 220 दिवसांवरून 120 दिवस करण्यात आल्यामुळे हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. शालेय अभ्यासक्रमातील बराचसा भाग आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिकवला जात आहे.
काय काय वगळलं जातंय?
इयत्ता नववीच्या समाजशास्त्र विषयातील राजपूत राजघराणाविषयीच्या धड्यांची संख्या 6 वरून 2 वर आणण्यात आली आहे. यामध्ये राजपूत राजघराणं, त्यांचं कार्य, तुर्कांचं आगमन आणि दिल्लीतील सुलतान यांचा समावेश होता
यातील राजपूत यांचं योगदान आणि दिल्ली सुलतानांविषयीचा भाग वगळण्याचा कारण हे इयत्ता सहावीत शिकवण्यात आल्याचं सांगितलं आहे.
उदा. मुघल आणि मराठा साम्राज्यावरील धडा वगळण्यात आला आहे. याविषयीच्या धड्यांची संख्या 5 वरून 2 करण्यात आली आहे. यातून मराठा साम्राज्याचा उदय, शिवाजी महाराजांचं प्रशासन आणि त्यांचे उत्तराधिकारी हे धडे वगळण्यात आले आहेत. इयत्ता सातवीत हा भाग शिकवला गेल्यामुळे असं करण्यात आल्याचं सांगितलं आहे.
- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
प्रतिक्रिया
"कोरोनामुळे अभ्यासक्रम 30 टक्क्यांनी घटवणं ठीक आहे. पण, यामुळे त्या धड्याचा मुख्य उद्देश बाजूला राहता कामा नये. पण, जर का संपूर्ण धडा वगळण्यात येत असेल, तर योग्य नाही," असं टिपू सुलतान पुस्तकावरील तज्ज्ञ समितीवरील प्राध्यापक टी. आर. चंद्रशेखर यांनी सांगितलं
टिपू सुलतान यांच्यावरील धडा अभ्यासक्रमातून वगळण्यात यावा, अशी मागणी गेल्या वर्षी भाजप आमदार अप्पाचू रंजन यांनी केली होती. त्यानंतर चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. यानंतर या समितीनं राज्य सरकारला स्पष्टपणे सांगितलं होतं की, म्हैसूरचा इतिहास आणि टिपू लुलतनाची भूमिका अभ्यासक्रमातून वगळता येणार नाही.
"प्रत्येक वर्गात प्रत्येक विषयातील नेमकं काय शिकवायचं आहे, हे ठरवलेलं असतं. जसं की टिपू सुलतानच्या बाबतीत सुरुवातीला त्यांची ओळख सांगितली जाते आणि ती तितकीच ठेवणं त्याला मर्यादित केल्यासारखं असतं. सातवीच्या वर्गात त्याला थोडं सविस्तरपणे सांगितलं जातं. यामध्ये टिपू सुलतानचं सामाजिक कार्य, हिंदू मंदिरांविषयीचं धोरण सांगितलेलं असतं," चंद्रशेखर सांगतात.
ते म्हणाले की, त्या काळात राजशाही हा कारभाराचा प्रकार होता. एका राजाने दुसर्याशी युद्ध केलं. यात युद्धात धार्मिक असं काहीही नव्हतं.
पण बंगळुरूचे मुख्य बिशप पीटर मचाडो यांनी बीबीसीला सांगितलं, "इयत्ता नववीत शिकवले जात असल्यामुळे इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमातून इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माशी संबंधित धडे काढून टाकल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. पण, आम्ही याबाबत नवव्या वर्गात विचारणा केली, तर त्यांनी सांगितलं की हे धडे सहाव्या वर्गात शिकवले जात असल्यामुळे आम्ही ते शिकवत नाही. यामुळे हा एकप्रकारचा अजेंडा असल्यासारखं वाटतं."
"या वयात मुले सुसंवाद, मानवतेची भावना आत्मसात करतात आणि एकमेकांचं कौतुक करण्यास शिकतात. भारत हा बहु-धार्मिक देश आहे आणि इतरांशी सुसंगत राहण्याची गरज आहे हे आपण शिकलं पाहिजे. मग ते हिंदू असोत वा मुस्लीम किंवा ख्रिस्ती."
अभ्याक्रमातील धडे वगळण्यात आल्यामुळे विरोधी पक्ष काँग्रेसनं आक्षेप घेतल्यानंतर सरकारनं याबाबत विषय समितीवरील तज्ज्ञांचा सल्ला घेतला.
"आम्हाला याबद्दल फोन आला आहे आणि सोमवारी बैठक होणार आहे," असं प्रा. चंद्रशेखर म्हणाले.
सरकारची भूमिका काय?
माडे गौडा हे कर्नाटक टेक्स्ट बुक सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितंल, "याविषयी आम्ही विषय समितीला निर्णय घेण्यास सांगितलं आहे. काय काढावं हे आम्ही त्यांना सांगू शकत नाही. या निर्णयाचा फेरविचार करू, असं आमचे शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे हा मेसेज आम्ही कर्नाटक टेक्स्ट बुक सोसायटीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे."
ते पुढे म्हणाले, "राज्यघटनेची प्रस्तावना सगळ्या वर्गांमध्ये शिकवली जात आहे. पाठपुस्तकातलं काही कापण्यात आलेलं नाही. पाठपुस्तकं आधीच मुलांच्या हातात सुपूर्द करण्यात आली आहे. विद्यार्थी घरी राहून अभ्यास करू शकतात."
पुढच्या वर्षी हे धडे अभ्यासक्रमातून वगळण्याचा कोणताही प्रयत्न नसल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
इतिहास शिकवणं का आवश्यक?
टिपू सुलतान यांच्याविषयीचे जाणकार आणि प्राध्यापक सॅबेस्टियन जोसेफ सांगतात, "भूतकाळ महत्त्वपूर्ण आहे, कारण आपला भूतकाळ आपल्या भविष्याचं प्रतिबिंब देखील आहे. त्या अनुषंगानं आपला समाज घडवण्याची गरज आहे. केवळ राजकीय इतिहासच नाही, तर विज्ञान विषयांच्या बाबतीतही इतिहास महत्त्वाचा आहे. कारण तो तुम्हाला काही विशिष्ट प्रक्रिया शिकवतो. जर आपल्याला विविध विषयांचा इतिहास माहीत असेल, तरच आपण आज कुठे उभे आहोत आणि आपण पुढे कसं जावं हे समजू शकेल. म्हणून इतिहास आवश्यक आहे.''
मचाडो यांच्या मते, "जेव्हा आपले नेते मेड इन इंडिया आणि निर्यातीविषयी बोलत असतात, तेव्हा मला वाटतं की धार्मिक सद्भावना ही सर्वोत्तम गोष्ट आपण निर्यात करू शकतो. आपल्या देशात वेगवेगळे धर्म असूनही धार्मिक शांतता आणि सद्भावना टिकून आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)