You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार असं का म्हणाले रफाल विमान गेमचेंजर ठरणार नाही?
गेली अनेक वर्षे ज्या विमानांवर चर्चा सुरू होती ती रफाल विमानं काल भारतात येऊन पोहोचली आहेत. फ्रान्सहून 7000 किमी प्रवास करून 5 रफाल लढाऊ विमानांची पहिली बॅच अंबालाच्या एअरफोर्स स्टेशनवर दाखल झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांच्या काल प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीमधील वक्तव्यावरुन आता चर्चा सुरू झाली आहे. सीएनएन न्यूज 18 या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी वक्तव्य केले आहे.
काल रफाल भारतात आल्यानंतर या विमानांचे स्वागत करण्यात आले. राजनाथ सिंह यांनी ट्वीटरवरून या विमानांच्या क्षमतेची माहिती दिली होती. तसंच त्यांची प्रशंसा केली. या विमानांमुळे आता भारतीय वायू दल कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सक्षम आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं.
"आमच्या भौगोलिक अखंडतेला आव्हान देण्याची ज्यांची मनिषा आहे, त्यांनी भारतीय वायू दलाच्या या क्षमतेनंतर आता चिंता करायला हवी," असं ट्वीट करत राजनाथ सिंह यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला.
मुलाखतीमध्ये शरद पवार यांना, रफाल भारतात येण्याकडे आपण कसे पाहाता असा प्रश्न विचारताच त्यांनी रफाल भारतात येण्याची प्रक्रिया फार आधीपासून सुरू झाल्याचं पवार यांनी सांगितलं. मी संरक्षण मंत्री असताना रफालच्या कारखान्याला भेट दिली होती. त्याचा फोटो बारामतीच्या प्रदर्शनातही दाखवला होता," अशी आठवण त्यांनी सांगितली. राफेल विमानं भारतात येणं हे चांगलं आहे, असं उत्तर त्यांनी दिलं.
रफालच्या श्रेयवादाबद्दल भाजप आणि काँग्रेस यांच्यामधील चढाओढीबाबत विचारले असता त्यांनी ही प्रक्रिया सुरू केली हे 100 टक्के सत्य आहे आणि ती भाजपने पूर्ण केली हे 100 टक्के सत्य आहे. त्यामुळे त्यात श्रेय घेण्याचा प्रश्न उद्भवतच नाही असे उत्तर दिले.
'रफाल गेमचेंजर का ठरणार नाहीत?'
रफाल विमाने गेमचेंजर ठरतील का असे विचारल्यावर शरद पवार यांनी आजिबात नाही असे स्पष्ट उत्तर दिले. रफाल विमाने भारताकडे येणं यावर चीन गंभीरपणे विचार करत असेल पण चीन चिंता करत असेल असं वाटत नाही. संरक्षण तयारी आणि भारताची तयारी यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे ही विमानं काही गेमचेंजर नाहीत.
दरम्यान, रफाल विमानांचा फटका 2018 साली राष्ट्रवादी काँग्रेसला बसला होता. रफाल विमानांच्या प्रकरणात काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले होते.
रफालबाबत पंतप्रधानांच्या हेतूबाबत लोकांच्या मनात शंका असेल असं वाटत नाही असे शरद पवार यांनी एका मुलाखतीत मत व्यक्त केले होते. तेव्हा त्यांचे जुने सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून बरोबर असणारे तारिक अन्वर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि लोकसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता.
शरद पवार यांनी गेल्यावर्षीही रफालबाबत असेच एक वक्तव्य केले होते. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना रफेाल करार मान्य नव्हता म्हणूनच त्यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन गोव्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले असे पवार यांनी सांगितले होते. त्यावरही मोठा गदारोळ झाला होता.
'गाफील राहायला नको'
याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना माजी एअर चीफ मार्शल अनिल टिपणीस म्हणाले, " 2 स्क्वॉड्रन्स म्हणजे आपल्याला वाटतं की फार जास्ती आहे, ते असं बिलकुल नाहीये. आपली सरहद्द किती लांबीची आहे, हे तुम्हाला माहिती आहे. ती हजारो किलोमीटर्सची आहे.
चीनकडे जितकी विमानं आहेत ती कदाचित राफेल इतकी चांगली नसतील. अगदी मिराज किंवा सुखोई इतकीही नसतील. पण तरीही त्यांची संख्या अफाट आहे. विमान हे फक्त एक माध्यम आहे. ते शस्त्रं घेऊन जातं. ती शस्त्रं किती असायला हवीत याचाही अंदाज घ्यायला हवा, तो केला असेल. पण तुम्ही किती बॉम्ब आणणार? किती एअर टू ग्राऊंड वेपन्स घेणार? किती एअर टू एअरवेपन्स घेणार? कारण प्रत्येक बॉम्ब किंवा मिसाईलची किंमत एकेक, दोन‐दोन कोटी आहे. ही अतिशय महागडी गोष्ट आहे, पण आपल्याकडे शस्त्रं असणंही गरजेचं आहे आणि ती किती घेतली आहेत, हे आपल्याला काही माहिती नाही.
ही विमानं महागडी आहेत, एकही विमान गमावणं परवडणारं नाही. किंवा त्याचं नुकसान होऊनही चालणार नाही. तुम्ही ते वापरताना नीट वापरलं जाईल, ट्रेनिंग चांगलं झालं आहे, तुमच्याकडे शस्त्रं आहेत, तुमच्याकडे योग्य माहिती आहे याची खात्री करायला हवी. जे आपल्याला पाहिजे ते मिळालं आणि आता चीन आपल्याविरुद्ध काही करणार नाही, असा विचार मनात यायला नको. पुढचे दिवस कठीण असतील. छत्तीसच नाही, माझं म्हणणं आहे याच्या कमीत कमी चार ते पाच स्क्वॉड्रन्स असायला पाहिजेत. तुम्हाला अक्साई चीनपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत जायचं आहे. चीन आल्यानंतर पाकिस्तान स्वस्थ बसणार आहे का? एक छोटीशी जरी आग लागली तर ती एकदम पसरू शकते. याबद्दल अतिशय जागरूक रहायला हवं."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)