कोरोना: प्रत्येक ठिकाणी विषाणू असल्याचा संशय तुम्हाला येतो का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, कमलेश
- Role, बीबीसी प्रतिनिधी
दिल्लीत राहणाऱ्या आशा यांच्या मुलाला वारंवार हात-पाय धुण्याची सवय होती. घराबाहेरून कुठूनही आल्यावर तो सर्वात आधी हात-पाय धुवत असे. कसंतरी समजावून त्याची ही सवय सोडवण्यात आली. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रसारानंतर त्याच्यात पुन्हा वारंवार हात-पाय धुण्याच्या सवयीची लक्षणं दिसू लागली आहेत.
कोरोनाच्या काळात स्वच्छता बाळगण्यासाठी सातत्यानं हात धुण्यास सांगितलं जात आहे. जेणेकरून विषाणू आपल्या शरीरात जाऊ नये. लोकही स्वत:हून खबरदारी म्हणून सातत्यानं हात धुवत आहेत.
मात्र, जर तुम्हाला असं वाटत असेल की, प्रत्येक गोष्टीत विषाणू आहे किंवा प्रत्येक गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, तर मात्र ही आजाराची लक्षणं आहेत. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर (OCD) असं या आजाराचं नाव आहे.

फोटो स्रोत, SPL
आधीपासूनच ओसीडीचा त्रास असलेल्यांच्या कोरोनाच्या काळात अडचणी आणखीच वाढल्या आहेत.
ओसीडी काय आहे?
दिल्लीस्थित मॅक्स हॉस्पिटलमधील मानसिक आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. समीर मल्होत्रा सांगतात, "मेंदूत सिरोटोनिन नावाचं रसायन असतं. जेव्हा मेंदूतील हे रसायन कमी होत जातं, तेव्हा कुठलेही काम करताना ते अर्धवट केल्यासारखं वाटत राहतं. अनेकदा स्वच्छतेबाबतच हे प्रकर्षानं दिसून येतं. स्वच्छतेबाबत अशी माणसं फार खबरदारी बाळगून जगू लागतात."
डॉ. मल्होत्रा पुढे सांगतात, "मेंदूतील सिरोटनिन रसायन कमी झालेल्यांना विश्वासच बसत नाही की, स्वच्छता व्यवस्थित झाली. त्यामुळे वारंवार ते तेच काम करत बसतात. खरंतर हात अगदी काही मिनिटांत धुवून होतात आणि तेही अगदी स्वच्छ. कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी तर केवळ 20 सेकंद हात धुणं पुरेसं असल्याचं म्हटलं गेलंय."
ओसीडीची लक्षणं -
- वारंवार हात धुणं
- अंघोळीसाठी खूप वेळ घेणं
- संपूर्ण दिवसभर स्वच्छतेच्या मागे लागणं
- स्वत:वर विश्वास न ठेवता, हात धुण्याबाबत इतरांकडून दुजोरा मिळवणं.

फोटो स्रोत, EPA/KOEN VAN WEEL
गंभीर आजार
डॉ. मल्होत्रा यांच्या म्हणण्यानुसार, हा आजार वाढला तर अनेकांवर याचे गंभीर परिणामही होतात. काही लोक तर डिटर्जंट किंवा कपडे धुण्याच्या साबणानेही अंघोळ करू लागले आहेत. त्यांना यावर विश्वासच बसत नाही की, रोजच्या अंघोळीच्या साबणानं नीट स्वच्छता होईल. त्यामुळे हा आजार वाढल्यास शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरावर त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.
- वारंवार हात धुतल्याने त्वचा कोरडी पडत जाते. बऱ्याचदा त्वचा फाटतेही.
- दैनंदिन कामं खोळंबतात. वेळापत्रक कोलमडतं. इतर कामं सोडून तुम्ही फक्त स्वच्छतेच्याच मागे लागता.
- चिडचिड, अस्वस्थ आणि हताशपणा येतो. परिणामी नाती बिघडू लागतात.
- हिवाळा असो वा उन्हाळा किंवा अगदी पावसाळा, कुठल्याही ऋतुत मुलं बाहेरून आली की त्यांना वारंवार अंघोळ घातल्यानं त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो.
- अनेकदा लोकांना घरात येऊ दिलं जात नाही. घरातील मदतनीसांकडून वारंवार साफसफाई करून घेणं.
डॉ. मल्होत्रा यांच्याकडे तपासणीसाठी येणारा एक रुग्ण तर स्वच्छतागृहातच जात नाही. त्यांना वाटतं की, हात अस्वच्छ होतील आणि 7-8 तासांपर्यंत धुवावे लागतील. त्या रुग्णाचे हातही आता काळे पडलेत. कारण हा रुग्ण हात डिटर्जंटनं धुवत असे.
जर अशा आजारावर वेळेवर उपचार झाले नाहीत, तर आजार गंभीर रुप धारण करू शकतो. रोजची इतर कामं सोडून लोक केवळ स्वच्छतेच्या मागे लागू शकतो.
उपाय काय?
ओसीडीवर उपचार करणं आवश्यक आहे. त्यासाठी रुग्णाला औषधं दिली जातात, असं डॉ. मल्होत्रा सांगतात.

- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

त्याचसोबत, रुग्णाचं मानसिक समुपदेशन आणि बिहेवियर थेरेपीही केली जाते. जे काम रुग्णाला वारंवार करण्याची सवय जडलेली असते, ते करण्यापासून रोखलं जातं.
व्यवस्थित उपचार झाल्यास हा आजार बरा होऊ शकतो, असं डॉ. मल्होत्रा सांगतात.
जर्मोफोबिया काय आहे?
अनेकजण जर्मोफोबिया आणि ओसीडीला सारखेच समजतात. पण तसं नाहीय. या दोन्हीही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्युटमधील मानसिक आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. कामना छिब्बर सांगतात, जर्मोफोबिया आजार नाहीय. ओसीडी हा आरोग्यासाठीचा आजार मानला गेलाय. पण एक नक्की की, बऱ्याचदा जर्मोफोबियाचं रुपांतर ओसीडीत होऊ शकतं.
कुठल्याही जंतू, बॅक्टेरिया व्हायरस, मायक्रोब आणि संसर्गाच्या भीतीला जर्मोफोबिया म्हणतात. पाल किंवा सापाला जसे लोक घाबरतात, तसा हा प्रकार आहे.
जंतूंमुळे कुठलाच संसर्ग होऊ नये, त्यामुळे त्यांच्यापासून आपला बचाव केला पाहिजे, अशाप्रकारची भीती जर्मोफोबियात असते.
डॉ. कामना यांच्या म्हणण्यानुसार, "जर्मोफोबियामध्ये एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या ठिकाणी जंतू असण्याची भीती सतावते. त्यामुळे तो त्या ठिकाणाला किंवा वस्तूला स्पर्शही करत नाही. ही भीती तुरळकवेळी असते. मात्र, भीतीचं प्रमाण किंवा असं स्पर्श न करण्याचं प्रमाण वाढलं, तर मात्र स्थिती गंभीर होते."
"जर्मोफोबिया दैनंदिन जगण्याला प्रभावित करत असेल. म्हणजे, वारंवार हात धुणं, कुठल्याही ठिकाणाला स्पर्श न करणं आणि यापासून तुम्ही स्वत:ला रोखूही शकत नसाल, तर मात्र जर्मोपोबियाचं रुपांतर ओसीडीत होतं. मात्र, जर्मोफोबिया ओसीडी होईलच, असंही ठाम सांगता येत नाही," असंही डॉ. कामना सांगतात.
कोरोनाच्या काळात ओसीडीचे प्रामाण वाढले?
कोरोनाच्या काळात ओसीडीची समस्या वाढली आहे. शिवाय, भीती आणि लक्षणं दोन्हीही तीव्र असल्याचे दिसून आले आहे.

फोटो स्रोत, EMMA RUSSELL
मात्र, कोरोनापासून वाचण्यासाठी वारंवार हात धुण्यास सांगितलं जात आहे, त्यामुळे स्वच्छताही महत्त्वाची होऊन बसलीय.
"तुम्ही जर घराबाहेरून आलात, तर हात धुण्याला काहीच अडचण नाही. मग तुम्ही दिवसातून दहावेळा हात धुतला तरी चालेल. मात्र, एकदा हात धुतल्यानंतर तुम्हाला खात्री वाटत नसेल आणि वारंवार हात धुवत असाल, तर मात्र ही गोष्ट सर्वसामान्य नसते," असं डॉ. कामना सांगतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








