You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे: 'तुकाराम मुंढेंमुळे शिस्त लागलीय, मी त्यांच्या पाठीशी आहे' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1) उद्धव ठाकरे: 'तुकाराम मुंढेंमुळे शिस्त लागलीय, मी शिस्तीच्या मागे उभा'
तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेत आल्यापासून तिथं शिस्त लागलीय आणि मी शिस्तीच्या पाठीशी आहे, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून तुकाराम मुंढे विरूद्ध नागपूर महापालिकेतील लोकप्रतिनिधी यांच्यात वाद सुरू आहे. त्या अनुषंगानं 'सामना'साठी घेतलेल्या मुलाखतीत खासदार संजय राऊत यांनी याबाबत प्रश्न विचारला असता, त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी तुकाराम मुंढेंची पाठराखण केली.
"कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करून घेत असाल तर वाईट काय? त्यांनी काही नियम, काही कायदे कडकपणाने अंमलात आणले हे काही जणांना परवडत नसेल. पण तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अंमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्या पाठी सर्वांनी उभं राहायला पाहिजे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तुकाराम मुंढेंचं कौतुक करताना उद्धव ठाकरेंनी त्यांना कानमंत्रही दिलाय. कुणीही आततायीपणा करू नये, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.
2) ठाकरे सरकारमधील पाचव्या मंत्र्याला कोरोनाची लागण
महाराष्ट्राचे पाणीपुरवठा राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे उदगीरचे मतदासंघाचे आमदार संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. संजय बनसोडे यांनीच फेसबुकच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. एबीपी माझानं ही बातमी प्रसिद्ध केलीय.
संजय बनसोडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये सांगितलंय की, "मतदारसंघातील काही कामे प्रमंत्रालयात मंत्रालयात प्रलंबित असल्यामुळे मागील पाच-सहा दिवसांपासून मुंबईमध्ये येऊन कामाचा पाठपुरावा करत असताना, अनावधानाने कोरना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलो. मला काल सकाळी थोडासा ताप आणि घशामध्ये खवखव होत होती. त्यामुळे लागलीच हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जाऊन मी कोरोना तपासणी केली. काल रात्री उशिरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला."
"मागील चार दिवसांमध्ये माझा अनेक लोकांशी संपर्क आला. जे जे लोक माझ्या संपर्कात आले होते, त्या सर्वांना माझी विनंती आहे की, आपण स्वतः होम क्वारंटाईन व्हावं. उदगीर, लातूर, उस्मानाबाद येथे बैठका घेतल्या होत्या, तेथील अधिकारी आणि कार्यकर्ते यांनी होम क्वारंटाईन व्हावं. काही त्रास वाटल्यास तपासणी करून घ्यावी ही आग्रही विनंती," असं आवाहन संजय बनसोडेंनी केलं.
शिवाय, लवकरात लवकर बरा होऊन जनतेच्या सेवेसाठी आणि मतदारसंघातील विकासासाठी हजर होईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
3) महाराष्ट्रात दोन मुख्यमंत्री, एक 'मातोश्री'त तर दुसरे महाराष्ट्रभर फिरतायेत - चंद्रकांत पाटील
"सध्या महाराष्ट्रात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मातोश्रीवर बसून काम करत आहेत आणि दुसरे राज्यभर फिरत आहेत," असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीवर भाष्य केलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कोरोनाचा आढावा घेत राज्यभर फिरत आहेत. त्या अनुषंगानं चंद्रकांत पाटील यांनी दोन मुख्यमंत्र्यांचा टोला उद्धव ठाकरेंना लगावला. झी 24 तासनं ही बातमी दिलीय.
उद्धव ठाकरे यांनी माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडूनच दाखवा, असे आव्हान विरोधकांना दिले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी 'तुम्ही इतर वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन दाखवा' असा पलटवार केला. तसंच, उद्धव ठाकरे यांची मुलाखत म्हणजे 'मॅचफिक्सिंग' असल्याचे त्यांनी म्हटले.
4) सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची CBI चौकशी करा, सुब्रमण्यम स्वामींचं मोदींना पत्र
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या घटनेला एका महिन्याचा कालावधी लोटला आहे. पोलिसांनी आतापर्यंत 36 जणांची चौकशी केलीय. मात्र, अद्याप कुठलेच कारण स्पष्ट झालं नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावं, यासाठी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
सुब्रमण्यम स्वामी यांचं पत्र मिळाल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडूनही स्पष्ट करण्यात आलंय.
"मुंबईतील माझ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं ज्यांचे दुबईतील डॉनशी संबंध आहेत ते पोलिसांकडून ही ऐच्छिक आत्महत्या होती हे दाखवण्यासाठी मदत मागत आहेत," असं सुब्रहमण्यम स्वामी यांनी पत्रात म्हटलं आहे.
5) हनुमान चालीसा वाचा, कोरोना पळवा - साध्वी प्रज्ञासिंह
कोरोना व्हायरसा संपवण्यासाठी सर्वांनी घरातच 5 ऑगस्टपर्यंत प्रत्येक दिवशी संध्याकाळी सात वाजता पाचवेळा हनुमान चालीसा वाचूया, असं आवाहन भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलंय. 'सामना'नं ही बातमी प्रसिद्ध केलीय.
पाच ऑगस्टला रामलल्लाची आरती झाल्यानंतर आपापल्या घरात दिवा लावून या धार्मिक विधीचा समारोप करूया, असंही त्या म्हणाल्या.
साध्वी प्रज्ञासिंह यांच्या या आवाहनावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)