कोरोना पुणे: 800 पेक्षा अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे अरुण जंगम

अरुण जंगम

फोटो स्रोत, DevdattaKashalikar

फोटो कॅप्शन, अरुण जंगम
    • Author, देवदत्त कशाळीकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी

कोरोनाचं थैमान सुरू झालं तेव्हा रुग्णसंख्येत एकानेही वाढ झाली तरी काळजात धस्स व्हायचं. पहिला मृत्यू झाला तेव्हा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. आता चार महिन्यानंतर हा आकडा 10 लाखाच्या पुढे गेला आहे.

रोज आकडेवारी जाहीर होते, रुग्णसंख्या रोजच्या रोज वाढतच आहे, मृतांचा आकडाही वाढतोच आहे. ती फक्त आकडेवारी म्हणून त्याच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी विकसित झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

रुग्णांवर उपचार करणारे अनेक लोक आपण पाहिले. पण या रोगामुळे ज्या लोकांचा मृत्यू होतो अशा लोकांवर कोण अंत्यसंस्कार करतं हा प्रश्न आपल्याला कधी पडलाय का? फ्रंटलाईन वॉरियर म्हणून समाजातल्या विविध घटकांचं कौतुक होतंय, व्हायलाच हवं. त्यावेळी पुण्यातील जंगम कुटुंबियांना विसरून चालणार नाही.

अरुण जंगम

फोटो स्रोत, DevdattaKashalikar

पुण्यात राहणारे अरुण जंगम आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या चार महिन्यांपासून कोव्हिडने दगावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याचं काम अव्याहतपणे करत आहेत. आतापर्यंत त्यांनी 800 पेक्षा अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

अरुण जंगम हे कोरोनापूर्व काळातही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करायचे. मात्र जेव्हा कोव्हिडचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा मृतदेहांची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला तेव्हा अरुण जंगम यांचं नाव समोर आलं.

कोरोना
लाईन

अरुण जंगम मूळचे सोलापूरचे. ते सध्या पुण्यातील येरवडा भागात राहतात. त्यांच्या कामाची माहिती माहिती देताना ते सांगतात, "मी स्मशाभूमीत गेल्या 16-17 वर्षांपासून काम करतोय. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा या मृतदेहांवर अंत्यसंस्कार कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला. 9 एप्रिलला पहिला मृतदेह येरवडा भागात आला. त्या आजींना उचलणारं कुणीच नव्हतं.

कारण त्या कोरोनाबाधित होत्या. कसंतरी त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. मात्र हे सगळे प्रकार वॉर्ड ऑफिसला कळले आणि मग हे काम करायचं कुणी हा प्रश्न निर्माण झाला. मग तिथल्या अधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला. मी कसलाही विचार न करता होकार दिला. एकतर हे काम महत्त्वाचं होतं आणि ती या कठीण काळात एक प्रकारची समाजसेवाच होती.

अभिषेक जंगम

फोटो स्रोत, DevdattaKashalikar

फोटो कॅप्शन, अभिषेक जंगम

सुरुवातीला जंगम यांना अर्थातच या कामाची भीती वाटली. असा हा कोणता आजार आहे जिथे लोकांनी एकमेकांना भेटायचं नाही, बोलायचं नाही अगदी हातही मिळवायचा नाही असा कोणता आजार आहे असं त्यांना वाटलं. त्यांच्या घरचे तर मुळापासून हादरले.

अनेकदा जंगम यांना बेवारस मृतदेहांवरही अंत्यसंस्कार करावे लागले.

नेमकी प्रकिया काय?

कोव्हिड रुग्णांवर अंत्यसंस्कार कसे होतात हे जंगम सांगतात, "महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोव्हिड क्रिमेशन नावाचा एक ग्रुप तयार केला आहे. तिथे मृतांची यादी टाकली जाते. मग मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क करतो. सर्व कागदोपत्री व्यवहार झाले की मग मी तिथे रुग्णवाहिका पाठवतो. शव आलं की आम्ही पीपीई किट घालण्यास सुरुवात करतो. मग शववाहिनीला सॅनिटाईज केलं जातं, शवाला सॅनिटाईज केलं जातं. त्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार केले जातात."

अरुण जंगम

फोटो स्रोत, DevdattaKashalikar

प्रत्येक धर्माच्या अंत्यसंस्काराच्या पद्धती वेगळ्या असतात. आतापर्यंत जंगम फक्त हिंदू धर्माच्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करत होते. एकदा त्यांच्याकडे मुस्लीम व्यक्तीचा मृतदेह आला. त्यावर अंत्यविधी करण्यासाठी ते अक्सा या स्मशानभूमीत गेले मात्र तिथे लोकांनी जंगम यांना अंत्यविधी करू दिले नाही.

त्याचवेळी मुस्लीम लोकांपैकीही तिथे कुणी आलं नाही. मग त्या मृतांच्या नातेवाईंकांनी पुन्हा जंगम यांच्याशी संपर्क साधला. जंगम यांनी मुस्लीम लोकांची या कामासाठी तयार केली होती. त्यांच्या मदतीने जंगम यांनी त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.

नातेवाईंकाचे चित्रविचित्र अनुभव

मृत व्यक्तींच्या नातेवाईंकांचेही काही अनुभव जंगम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले. संपर्क हा कोव्हिडचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. त्यामुळे अनेक नातेवाईक अंत्यसंस्काराच्या वेळी येतच नाही किंवा आले तरी कुठेतरी लांब थांबतात.

अरुण जंगम

फोटो स्रोत, DevdattaKashalikar

पण नातेवाईक आलेच नाहीत कर अंत्यविधी करणार कसे हा प्रश्न जंगम यांना पडतो. कारण एखाद्या भलत्याच व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाले तर त्यातून वेगळे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. मग त्यातून पोलिसांमध्ये तक्रारी,नातेवाईंकांचं विचित्र वागणं याचाही अनुभव जंगम यांना येत आहे.

अनेकदा नातेवाईकांची इच्छा असूनसुद्धा येऊ शकत नाही, कारण कधी ते क्वारंनटाईन सेंटरला असतात. काही नातेवाईक आप्तस्वकीयांच्या जाण्याने प्रचंड भावूक होतात. त्यांना त्या व्यक्तीला शेवटचं पहायचं असतं. मात्र हे मृतदेह पॅक केलेले असतात. त्यांना उघडता येत नाही. अशा वेळी त्यांना समजावणं हे एक वेगळं आवाहन असल्याचं जंगम सांगतात.

घरच्यांचा विरोध आणि मग पाठिंबा

हे सगळं करताना जंगम यांच्या घरच्यांनीही या कामाला तीव्र विरोध केला होता. रोगाची भीती जंगम कुटुंबियांच्या मनातही होतीच. याबद्दल बोलताना जंगम यांचा मुलगा अभिषेक म्हणाला, "बाबांनी कोणताही विचार न करता या कामाला होकार दिला. आम्हाला सुरुवातीला भीती वाटली. पण बाबांनी आमची समजूत घातली आणि मी सुद्धा या कामात स्वत:ला झोकून दिलं."

अरुण जंगम

फोटो स्रोत, DevdattaKashalikar

मनपाकडून पीपीई किट आणणं, योग्य वेळी ते स्मशानभूमीत पोहोचवणं, फोनवरून मदतनीसांना सूचना देणं इत्यादी कामं मुलं करू लागली. त्यामुळे संपूर्ण जंगम कुटुंबीय या कामात गुंतलेलं आहे.

पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंडुळ यांनीही जंगम यांच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं. सध्याच्या संकटाच्या काळात जंगम यांनी या कामाची तयारी दाखवली याबदद्ल कृतज्ञता कंडुळ यांच्या बोलण्यातून जाणवली. त्यांच्या कामासाठी पुरेसं मनुष्यबळ, पीपीई किट, मास्क यांचा पुरवठा जंगम यांना सातत्याने होत असतो.

या कामात जंगम कुटुंबियांना विम्याचं संरक्षणही देण्यात आल्याचं कंडुळ यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

अरुण जंगम

फोटो स्रोत, DevdattaKashalikar

या कामात संपूर्ण जंगम कुटुंबीयांनी झोकून दिलं आहे. 800 पेक्षा अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारं हे कुटुंब पूर्णपणे या कामात अडकलं आहे. जंगम कुटुंबियांच्या नातेवाईकांनीही त्यांना या कामात पाठिंबा दिली आहे.

पण खरंतर सध्या कोण पाठिंबा देतंय, कोण पाठिशी आहे, कोण नाही हे पाहायलाही वेळ नाही असं अरुण जंगम यांचा मुलगा अभिषेक बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाला.

(शब्दांकन- रोहन नामजोशी)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)