कोरोनाः जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन पद्धतीनं होणार की ऑनलाईन?

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांवरून पंकजा मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे आता शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीनं होणार, की ऑफलाईन पद्धतीनं होणार याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

पंकजा मुंडे यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलंय, "कोरोनाच्या धर्तीवर शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन पद्धतीनं होणार असं ऐकलं आहे. ज्याचा वशिला नाही, वाली नाही अशा गरीब शिक्षकांसाठी हा ऑफलाईनचा निर्णय कोरोनाच्या संकटात आणखी संकट आणेल, त्यामुळे राज्य सरकारनं यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे."

सरकारच्या या निर्णयामुळे पारदर्शकता आणि मेरिट सोडून भ्रष्टाचार व शोषण होईल, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पुढे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा निर्णय बदलावा या मागणीसाठी पत्र लिहिलं आहे.

ग्रामविकास विभागाच्या 15 जुलै 2020च्या एका पत्राचा संदर्भ देत त्यांनी या पत्रात लिहिलं आहे की, "जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन पद्धतीनं करण्याचे निर्देश सरकारनं जिल्हा परिषदांना दिले आहेत.

ग्रामविकास विभागाच्या 2017 मधील शासन निर्णयानुसार, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या मानवी हस्तक्षेपाशिवाय संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन करण्यात आल्या होत्या. त्यानुसार 2018-19मध्ये राज्यभरात जवळपास 98 हजार शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांच्या धोरणावर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले होते."

"महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांचे 16 जुलै 2020 आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांचे 16 जुलै 2020च्या निवेदनाद्वारे जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीनेच करण्यासाठी सरकारकडे विनंती केली आहे.

"सध्या कोरोनाच्या संकटात सगळीच कामं ऑनलाईन पद्धतीनं केली जात आहे. तसंत वर्क फ्रॉम होम संकल्पनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असताना शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या रद्द करून ऑफलाईन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा."

शासनाच्या निर्णयाला मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांनीही विरोध दर्शवला आहे.

शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीनंच झाल्या पाहिजेत, अशी त्यांची भूमिका आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीनंच झाल्या पाहिजेत. पंकजा मुंडेंच्या काळात ऑनलाईन पद्धतीत अनेक त्रुटी राहिल्या होत्या. त्यामुळे शिक्षकांचे हाल झाले होते. त्यामुळे मग ऑनलाईन पद्धतीतून ज्यांच्यावर अन्याय होईल, अशा शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन करा, अशी आमची मागणी होती.

"शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन झाल्यास त्यात भ्रष्टाचार होऊ शकतो. एकतर राजकीय हस्तक्षेप होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे सोयीनुसार बदल्या केल्या जाऊ शकतात. हे दोन्ही थांबवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनंच बदल्या व्हायला हव्यात."

याशिवाय, प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक भाषेची जाण असणारे शिक्षकच असावेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकणं सोपं जाईल, असंही पाटील म्हणतात.

शिक्षण तज्ज्ञ काय म्हणतात?

शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीची परंपरा बंद करू नका, असं मत शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना मांडलं.

ते म्हणाले, "सरकारनं शिक्षकांच्या ऑफलाईन बदल्यांचा निर्णय आताच आणायची काही गरज नव्हती. कारण, अजून सध्या शाळा बंद आहेत. दिवाळीनंतरही सरकार या गोष्टीवर विचार करू शकत होतं. पण, आता कोरोनाच्या संकटाआडून सरकारनं ऑफलाईन बदल्यांची पद्धत परत सुरू करू नये. कारण, ऑनलाईन बदल्यांची परंपरा चांगली आहे, कारण त्यामुळे बदल्यांमधील भ्रष्टाचाराला आळा बसतो."

सरकारची भूमिका काय?

"यंदा जिल्हांतर्गत शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन पद्धतीनं होणार असून पुढच्या वर्षीपासून सगळ्या बदल्या ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे," असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

ते म्हणाले, "यंदा राज्य सरकार जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीनं करणार आहे. जिल्हांतर्गत बदल्या मात्र ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. कारण या बदल्यांसाठीचं सॉफ्टवेअर कोरोनाच्या संकटामुळे तयार झालेलं नाही."

"खरं तर यंदा कोरोनाच्या संकटामुळे शिक्षकांच्या बदल्या करू नये, अशी सरकारची भूमिका होती. पण, आमची गैरसोय होईल, अशी भूमिका शिक्षकांनी आमच्याकडे मांडली आणि मग आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. पुढच्या वर्षीपासून मात्र सगळ्या बदल्या ऑनलाईन पद्धतीनंच होतील."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)