महाविकास आघाडी: काँग्रेसची खदखद उद्धव ठाकरे सरकारला भोवणार का?

फोटो स्रोत, Twitter/Balasaheb Thorat
- Author, नूतन कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 6 मिनिटे
राजस्थानच्या निमित्ताने काँग्रेस पक्षातले मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असताना, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधली खदखदही वाढताना दिसतेय.
महाविकास आघाडीतली तिसरा घटक पक्ष असलेला काँग्रेस नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. निमित्त ठरलं शिवसेनेने सुरू केलेल्या जॉब महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत एकाही काँग्रेस नेत्याचा फोटो नसल्याचं.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी याविषयी ट्वीट केलं आहे.
महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो आहेत. मात्र, काँग्रेसच्या एकाही नेत्याचा त्यावर फोटो नाही. यावर सत्यजित तांबे ट्वीटमध्ये लिहिलंय, "#महाजॉब्ज ही योजना महाविकास आघाडी सरकारची आहे की फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीची?"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
महाविकास आघाडीची स्थापना होताना जे काही किमान समान कार्यक्रम ठरले, त्या शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल करत तांबे यांनी एकप्रकारे काँग्रेसची खदखद व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यानंतर महाविकास आघाडी सरकारचे अगदी सुरुवातीपासून विरोधक असलेले आणि पक्षविरोधी कारवायांचा ठपका असलेले काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनीही यानिमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, "महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये काँग्रेसही सहभागी असल्याचं ऐकलं आहे ना. मग तरुणांना रोजगार देण्यासंबंधीच्या सरकारी जाहिरातीत काँग्रेस का नाही?"
इतकंच नाही तर ज्या काँग्रेस नेत्यांना शिवसेनेवर प्रचंड प्रेम उफाळून आलं आहे, अशांना मला विचारायचं आहे की शिवसेनेसमोर लोटांगण घालण्यापेक्षा याच्याशी लढा. नाहीतर पक्ष संपेल, असा घणाघातही केला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
विधानसभा निवडणुकीपासूनच संजय निरुपम यांनी काँग्रेसविरोत उघड उघड नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही शिस्तभंगाची टांगती तलवार आहे. मात्र, तरीही महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला डावललं जात असल्याची जी भावना ते बोलून दाखवतात तशीच भावना काँग्रेस पक्षातल्याच इतरही अनेक नेत्यांच्या आहेत.
काँग्रेस खासदार राजीव सातव यांनीसुद्धा महाजॉब्ज पोर्टलच्या जाहिरातीवरून योजना चांगली आहे आणि आमचं सहकार्य आहे. पण सरकार आघाडीचे आहे याची काळजी लोकांसमोर जाताना सर्वांनीच घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया दिली होती.
काँग्रेसमधली नाराजी
महाविकास आघाडीत काँग्रेस नाराज असल्याची चर्चा काही नवीन नाही. जवळपास महिनाभरापूर्वी एका ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलताना स्वतः काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात आम्ही सत्तेत सहभागी असलो तरी मुख्य धोरणकर्ते (Key Decision maker) आम्ही नाही, असं स्पष्टपणे म्हटलं होतं. खरंतर त्याआधीही सत्तेत असूनही काँग्रेस नाराज असल्याची कुरबुर होतीच. मात्र, राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली.

फोटो स्रोत, BALASAHEB THORAT TWITTER
काँग्रेसच्या नेत्यांनी वेळोवेळी आम्ही नाराज नाही, असं पत्रकारांना सांगण्याचा प्रयत्न केला. यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी वेळोवेळी सारवासारव केल्याचं दिसतं.
यावेळीसुद्धा तेच पुढे आले. शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वतः फोन करून दिलीगिरी व्यक्त केल्याचं सांगून थोरात यांनी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.
काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आघाडीतील मित्रपक्ष म्हणून काँग्रेसला योग्य स्थान मिळत नसल्याची भावना काँग्रेसमधल्या अनेक बड्या नेत्यांमध्ये आणि मंत्र्यांमध्ये वाढत असल्याचं म्हटलं होतं.
या मुलाखतीत ते पुढे म्हणतात, "दुसरं म्हणजे आमच्या काही मंत्र्यांमध्ये अशी भावना आहे की त्यांचं म्हणणं ऐकलं जात नाही, त्यावर तोडगा काढला जात नाही. आम्ही आमचे हे मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडू."

फोटो स्रोत, BALASAHEB THORAT TWITTER
तिन्ही पक्षांच्या आमदारांना जो मतदारसंघ विकास निधी दिला जातो, त्याचंही समान वाटप होत नसल्याच्या तक्रारी असल्याचंही ते म्हणाले होते.
महाविकास आघाडीत मिळत असलेलं दुय्यम स्थान, निर्णयप्रक्रियेतील सहभाग अशा काही मुद्द्यांवर काँग्रेस नेत्यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. या सर्व मुद्द्यांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जून महिन्यात मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती.
याच वर्षी मे महिन्यात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचीही एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती. यात एका कार्यकर्त्याशी बोलताना राज्यात आमचं नाही तर शिवसेनेचं सरकार आहे, असं चव्हाण यांनी म्हटलं होतं.
काँग्रेसचा नेता कोण?
ज्याप्रमाणे मध्यप्रदेश आणि राजस्थान काँग्रेसमध्ये दुफळी माजली तेवढी टोकाची स्थिती महाराष्ट्रात नाही. मात्र तरीही काँग्रेसलमध्ये कुरबूर मात्र सुरूच आहेत.
शिवसेनेचे संजय राऊत बाळासाहेब थोरात यांची स्तुती करतात. तर दुसरीकडे अशोक चव्हाण महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचं सांगतात.
मात्र, काँग्रेसमध्ये सध्या गट-तट नाही, असं पत्रकार दीपक भातुसे सांगतात. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "मध्यप्रदेशात कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत आणि सचिन पायलट अशा दोन नेत्यांमध्ये मतभेद होते. तो सत्तावर्चस्वाचा वाद होता. तशी महाराष्ट्रात स्पर्धा नाही. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत. तर बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांनी जुळवून घेतलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मतभेद होऊन पुढे पक्ष फुटण्याची अजिबात शक्यता नाही."

फोटो स्रोत, BALASAHEB THORAT TWITTER
काँग्रेसच्या मतभेदांविषयी सविस्तर बोलताना ते म्हणाले, "पूर्वी काँग्रेसमध्ये मतभेद होते. पण बऱ्याच वर्षांनी सध्या काँग्रेसमध्ये असं चित्र आहे की पक्षात गट नाहीत. पूर्वी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना देशमुख विरुद्ध प्रभा राव असा संघर्ष आपण बघितला आहे. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात मतभेद होते. पण आज विखेच पक्षात नाहीत. त्याचं एक कारण म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेसची पूर्ण सत्ता नाही. मुख्यमंत्री त्यांचा नाही. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत काँग्रेसचं स्थान तिसऱ्या क्रमांकाचं आहे. त्यामुळे पूर्वी अनेक वर्ष जो सत्तासंघर्ष महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांमध्ये होता तसा आता नाही."
राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची स्थिती
राष्ट्रीय पातळीवरही काँग्रेसची अवस्था बिकट दिसतेय. सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष आहेत. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची धुरा खाली ठेवल्यानंतर सोनिया गांधींना हंगामी अध्यक्ष करण्यात आलं होतं. मात्र, त्यांचा कार्यकाळ आता संपत येतोय. राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावं, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, त्यासाठी राहुल गांधी तयार नाहीत.
याविषयी सांगताना काँग्रेसचं राजकारण जवळून बघितलेले ज्येष्ठ पत्रकार राशीद किडवई म्हणतात, "सोनिया गांधींनी राहुल गांधी यांना 10 ऑगस्टपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याचं अल्टिमेटम दिलं आहे." मात्र, राहुल गांधी अजूनही अध्यक्षपदासाठी अनुत्सुक आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये नेतृत्त्वाचा गोंधळ कायम आहे.
प्रियंका गांधीदेखील काँग्रेस कार्यकारणीत आल्या आहेत. मात्र, त्या फक्त उत्तर प्रदेशात सक्रीय आहेत.

फोटो स्रोत, TWITTER@RAHULGANDHI
एकापाठोपाठ एक राज्य हातातून जात असताना काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरच्या काही नेत्यांनीही उघड बोलायला सुरुवात केली आहे. आपल्या तबेल्यातले सगळे घोडे गेल्यावर पक्षाला जाग येणार का, असा प्रश्न विचारत आपल्याला आपल्या पक्षाची काळजी वाटत असल्याचं ट्वीट ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केलं आहे.
तर ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही काँग्रेसला बूथ पातळीपासून ते कार्यकारिणीपर्यंत सर्वच स्तरावर पक्ष बांधणीची तातडीने गरज असल्याचं म्हटलं होतं.
सचिन पायलट प्रकरणानंतर नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनीही ट्वीट करत काँग्रेसमध्ये टॅलेंट आणि कौशल्याची कदरच केली जात नसल्याचं म्हटलं होतं.
काँग्रेसमध्ये नेतृत्व कोण करतंय, हेच काँग्रेस नेत्यांना कळत नाही, ही काँग्रेसची मोठी समस्या असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे.
काँग्रेसमधल्या याच निर्णायकी अवस्थेचा फटका मध्य प्रदेश आणि राजस्थानला बसतोय. तसाच फटका महाराष्ट्रात बसू शकतो का.
याविषयी बीबीसीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा म्हणतात, "काँग्रेसमध्ये जी यंग जनरेशन आलेली आहे त्यांना एकदम टू मिनिट्स इन्स्टंट नूडल्ससारखी झटपट सत्ता हवी. हे सगळे कुठले ना कुठले युवराज आहेत. मग ते मध्य प्रदेशातले ज्योतिरादित्य शिंदे असोत किंवा मग राजस्थानातले सचिन पायलट.

फोटो स्रोत, PTI
महाराष्ट्रात म्हणाल तर पतंगराव कदम यांचा मुलगा विश्वजित कदम, बॅरिस्टर गाडगीळांचा मुलगा आनंद गाडगीळ, शंकरराव चव्हाणांचे चिरंजीव अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरातही वारसानेच आले आहेत. हे वारसाचं राजकारण काँग्रेसला कुठेतरी थांबवावं लागेल. जमिनीवर काम करणाऱ्या लोकांना काँग्रेसमध्ये जोवर संधी दिली जात नाही, तोवर काही होईल असं वाटत नाही."
राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाविषयी बोलताना काँग्रेस नेत्यांनी यापूर्वीही पराभव बघितले. पण राहुल गांधींसारखं कुणी मैदानातून पळ काढला नाही, असंही भटेवरा यांनी म्हटलं.
ते म्हणाले, "पराभव इंदिरा गांधींचाही झाला होता. राजीव गांधींचाही झाला होता. नरसिंह रावांनाही पराभव चाखावा लागला. पण 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी ज्याप्रकारे अध्यक्षपद सोडलं आणि विजनवासात गेले तसं काँग्रेसच्या 135 वर्षांच्या इतिहासात कुणी केलं नाही. मात्र, असं असलं तरी वेगवेगळ्या राज्यांमधले काँग्रेसचे जे नेते आहेत ते फक्त सत्तेसाठी म्हणून काँग्रेस सोडून भाजपकडे जात आहेत. हा पॉवर ओरिएंटेड मॉब असून त्यांना विचारसरणीशी देणघेणं नाही. त्यांना केवळ सत्ता हवी आहे. उद्या दिल्लीत मोदी सरकारला घरघर लागली तर हा सगळा पॉवर ओरिएंटेड मॉब पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे परत आलेला दिसेल. या सर्वातून जो बदल व्हायला हवा होता ते परिवर्तन कुठेही झालेलं दिसत नाही, ही खेदाची बाब आहे."
ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेसमध्ये खदखद होती तिथे तिथे भाजपने त्याचा फायदा करून घेतला. गोवा, कर्नाटक आणि त्यानंतर मध्यप्रदेश काँग्रेसला गमवावं लागलं. आता राजस्थानात पेच निर्माण झाला आहे. पक्षांतर्गत खदखदीचा काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्येही नाराजीचे सूर आहेत. मात्र, ते तीव्र होतील का की त्यावर वेळीच तोडगा काढण्यात येईल आणि काढलाच तो कोण काढेल, या प्रश्नांची उत्तर येणाऱ्या काळात मिळतीलच.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








