अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये संघर्षाची ठिणगी; सीमावर्ती भागात नेमकं काय घडतंय?

योग्य वेळी प्रत्युत्तर दिले जाईल असे तालिबानने म्हटले आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, योग्य वेळी प्रत्युत्तर दिले जाईल असे तालिबानने म्हटले आहे.
वाचन वेळ: 3 मिनिटे

पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमावर्ती भागात पाकिस्तानने हवाई हल्ले केलेले आहेत, अशी माहिती पाकिस्तानने दिली आहे.

आम्ही गुप्तचर माहितीच्या आधारे पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमावर्ती भागातील 'सात दहशतवादी अड्डे आणि छावण्या' यांना लक्ष्य केलेलं आहे, असं पाकिस्ताननं म्हटलेलं आहे.

तर दुसरीकडे, अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की, नंगरहार आणि पक्तिकामध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांसहित अनेक जण मृत्युमूखी पडलेले आहेत.

सोबतच, 'योग्य वेळी प्रत्युत्तरादाखल कारवाई केली जाईल,' असं तालिबान सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे.

बीबीसी पश्तोने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे.

या निवेदनात त्यांनी नंगरहार आणि पक्तिका प्रांतातील 'नागरी वस्ती'वर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांचा निषेध केला आहे.

या हल्ल्यामुळे, नंगरहारमधील एका घरातील वीस लोक मृत्युमूखी पडल्याचा दावा करण्यात येतोय. तर दुसरीकडे, पक्तिकामधील एका मदरशालाही लक्ष्य करण्यात आलंय.

दुसरीकडे, पाकिस्तानचं म्हणणं आहे की त्यांच्या देशात अलीकडेच झालेल्या आत्मघाती हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

पाकिस्तानने काय म्हटलं?

पाकिस्तानने म्हटलंय की, त्यांनी गुप्त माहितीच्या आधारावर पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा भागातील 'सात दहशतवादी तळांना तसेच छावण्यांना लक्ष्य' केलेलं आहे.

पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हे हल्ले पाकिस्तानी तालिबान आणि त्यांच्याशी संबंधित फितना अल-खवारीज (FAK) आणि इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान प्रांत (ISKP) यांच्या 'दहशतवादी ठिकाणांवर आणि छावण्यांवर' करण्यात आले.

पाकिस्तानचं असं म्हणणं आहे की, ही कारवाई अलीकडेच त्यांच्या देशात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल करण्यात आली आहे.

तालिबान सरकारने म्हटले आहे की पक्तिका प्रांतातील बारमल जिल्ह्यात एका मदरशाला लक्ष्य करण्यात आले.
फोटो कॅप्शन, तालिबान सरकारने म्हटले आहे की पक्तिका प्रांतातील बारमल जिल्ह्यात एका मदरशाला लक्ष्य करण्यात आले.

"पाकिस्तानकडे असे ठोस पुरावे आहेत की हे दहशतवादी हल्ले खवारीज गटाने त्यांच्या अफगाणिस्तानस्थित नेतृत्वाच्या आणि हँडलर्सच्या सूचनेवरून केलेले होते. फितना अल-खवारीजशी संबंधित अफगाणिस्तानातील पाकिस्तानी तालिबान, त्यांचे सहयोगी आणि इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान प्रांत यांनीही या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे," असंही एका निवेदनात म्हटलं आहे.

पाकिस्ताननं म्हटलं आहे की, त्यांनी अफगाणिस्तानातील तालिबान सरकारकडून वारंवार ठोस कारवाईची मागणी केली होती; परंतु या गटांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.

यासोबतच, पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारकडे मागणी केली की, त्यांनी 'ख्वारीज आणि इतर दहशतवाद्यांकडून' पाकिस्तानविरुद्ध होणारा त्यांच्या देशाच्या भूमीचा वापर थांबवावा.

तालिबान सरकारने दिला इशारा

अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानी सैन्यावर अफगाणिस्तानच्या सीमेचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

तालिबान सरकारच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की, पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यामध्ये महिला आणि लहान मुलांसहित अनेक लोक मृत्युमूखी पडले आहेत.

तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद (फाइल फोटो)

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद (फाइल फोटो)

जबिहुल्लाह मुजाहिद यांनी एका वक्तव्यात म्हटलंय की, "काल रात्री पाकिस्तानी सैन्याने नंगरहार आणि पक्तिका प्रांतांमध्ये आमच्या निष्पाप नागरिकांवर बॉम्बहल्ला केला. त्यामध्ये महिला आणि मुलांसह कित्येक लोक मारले गेले आणि जखमी झाले."

तालिबान सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्लाह ख्वारिझमी यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, "संरक्षण मंत्रालय अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचं पाकिस्तानकडून झालेलं हे घोर उल्लंघन आणि गुन्हा यांचा तीव्र निषेध करते. तसेच, हे कृत्य आंतरराष्ट्रीय कायदा, शेजारधर्म आणि इस्लामिक मूल्यांचे स्पष्टपणे उल्लंघन आहे, असेही आम्ही मानतो."

"संरक्षण मंत्रालय देशाचे आणि लोकांच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य मानते आणि योग्य वेळी प्रत्युत्तरादाखल कारवाई केली जाईल," असंही या निवेदनात म्हटलेलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)