मुंबई कोरोना व्हायरस : टीबीच्या रुग्णांना कोव्हिड-19 चा धोका आहे?

कोरोना

फोटो स्रोत, ANI

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

मुंबईकरांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा झपाट्याने प्रसार होतोय. डायबिटीस, उच्च रक्तदाब यांसारखे आजार असलेल्यांना कोरोनाचा धोका जास्त आहे. एकीकडे शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय. मात्र दुसरीकडे टीबी 'हॉटस्पॉट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्व मुंबईत आशादायक चित्र पाहायला मिळत आहे.

या परिसरात हजारोंच्या संख्येने टीबीचे रुग्ण असूनही, या रुग्णांमध्ये कोरोनाच्या इंन्फेक्शनचं प्रमाण अत्यंत कमी दिसून आलं आहे.

टीबीच्या रुग्णांवर काय परिणाम होतो?

टीबी रुग्णांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण कमी असल्याने डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहे. हे कसं शक्य झालं? यामागे कोणती कारणं आहेत? टीबी औषधांमुळे रुग्णांना कोव्हिड-19 ची लागण होत नाही का? असे अनेक प्रश्न डॉक्टरांना भेडसावत आहेत.

त्यामुळे यावर संशोधन होणं गरजेचं असल्याचं मत डॉक्टर व्यक्त करत आहेत.

कोरोना
लाईन

मुंबईतील टीबी रुग्ण

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, 2018 मध्ये, मुंबईत 46,513 टीबी रुग्ण आढळून आले. औषधांना दाद न देणाऱ्या (MDR) मल्टी ड्रग रेजिस्टंट टीबीचे 4969 रुग्ण आहेत तर, XDR टीबीच्या 525 रुग्णांवर उपचार सुरू होते.

मुंबईच्या पूर्व उपनगरातील मानखुर्द, गोवंडी परिसर देशात टीबीचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो. मुंबई महापालिकेच्या 'एम' वॉर्डमध्ये टीबीचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तज्ज्ञांच्या मते, या परिसरातील प्रत्येक घरात टीबीचा रुग्ण आढळून येतो.

टीबीतज्ज्ञ आणि फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. विकास ओस्वाल याच भागात गेली अनेक वर्ष आरोग्यसेवा देत आहेत. मुंबई महापालिकेच्या गोवंडी-शताब्दी रुग्णालयात टीबी युनिट प्रमुख म्हणूनही ते स्वेच्छेने सेवा देतायत.

बीबीसीशी बोलताना डॉ. विकास सांगतात, "मानखुर्द, गोवंडी परिसरात 8 हजारपेक्षा जास्त टीबी रुग्ण आहेत. मात्र, गेल्या पाच महिन्यात टीबीग्रस्त असलेल्या फक्त सहा रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलंय. कोरोना व्हायरसने मुंबईत शिरकाव केल्यानंतर सामान्यांच्या तुलनेत टीबी रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन पसरेल अशी भीती डॉक्टरांना होती."

"पण, प्रत्यक्षात टीबी रुग्णांच्या तूलनेत सामान्यांमध्ये कोरोनाचं इन्फेक्शन पसरल्याचं पाहायला मिळत आहे. टीबी रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असूनही त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही," असं डॉ. ओस्वाल पुढे म्हणाले.

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, एम-पूर्ण वॉर्डमध्ये सद्यस्थितीत 564 कोव्हिड-19 ग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत. तर 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 2656 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

शिवडी टीबी रुग्णालयील स्थिती

मुंबईतील शिवडीचं टीबी रुग्णालय जगभरात प्रसिद्ध आहे. कोव्हिड-19 चा प्रसार मुंबई झाल्यानंतर आत्तापर्यंत टीबी रुग्णालयातील 54 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली.

कर्मचाऱ्यांमुळे संसर्ग रुग्णालयातील रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरेल, अशी भीती डॉक्टरांना होती. मात्र, कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या थेट संपर्कात येऊनही टीबी रुग्णांना फार कमी प्रमाणात कोरोनाची लागण झाली.

औषधी

फोटो स्रोत, Getty Images

याबाबत बीबीसीशी बोलताना शिवडी टीबी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललितकुमार आनंदे सांगतात,

"टीबीग्रस्त रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत कमी असते. फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झालेली असते. कोरोना व्हायरस फुफ्फुसांवर आघात करतो. खरंतर टीबीग्रस्त रुग्णाला कोरोनाचा धोका अधिक असायला हवा.

एप्रिलच्या सुरुवातीला डॉक्टरांना खूप टीबी रुग्णांना कोरोनाची लागण होईल, गंभीर रुग्णांचा मृत्यू होईल अशी भीती वाटत होती. पण, प्रत्यक्षात टीबी रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण खूप कमी आहे."

डॉ. आनंदे पुढे सांगतात, एप्रिलमध्ये पुरूषांच्या टीबी वॉर्डमधील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. सर्व कर्मचारी आणि रुग्णांची तपासणी केली. एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं. मात्र, 200 पेक्षा जास्त टीबीचे रुग्ण असूनही त्यांना इन्फेक्शन झालं नव्हतं.

कोव्हिड-19 पॉझिटिव्ह टीबी रुग्णांची सद्यस्थिती

कोरोनाची लागण झालेले टीबी रुग्ण- 58

मृत्यू- 10

उपचार घेत असलेले रुग्ण - 14

डिस्चार्ज झालेले रुग्ण- 34

टीबी रुग्णांना कोरोना होत नाही का?

टीबी रुग्णांना कोरोना न होण्यामागची कारणं काय. हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

याबाबत डॉ. ओस्वाल म्हणतात, "माझ्यामते टीबी रुग्णाचं शरीर कोरोना व्हायसरला शिरकाव करू देत नाही. टीबी रुग्णाच्या शरीरात अशी कोणत्या प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. ज्यामुळे कोरोना व्हायरस शरीरात शिरकाव करू शकत नाही. यावर संशोधन होणं गरजेचं आहे."

फुफ्फुस

फोटो स्रोत, SPL

टीबीच्या औषधांमुळे हे शक्य आहे का? यावर डॉ. ओस्वाल म्हणतात, "साधा टीबी, मल्टी ड्रग रेजिस्टंट आणि एक्स्ट्रीमली ड्रग रेजिस्टंट टीबीमध्ये रुग्णाला वेगवेगळ्या प्रकारची औषधं दिली जातात. त्यामुळे औषधांमुळे कोव्हिडवर परिणाम होतो असं मला वाटत नाही."

शिवडी टीबी रुग्णालयाचे डॉ. आनंदे म्हणतात, "टीबीग्रस्त रुग्णांच्या शरीरात कोव्हिडला थोपवणारी रोगप्रतिकारक शक्ती तयार होते, की टीबीच्या औषधांमुळे त्यांना कोरोनाची लागण होत नाही. यावर संशोधन महत्त्वाचं आहे."

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयातील टीबी विभागाचे माजी उपसंचालक डॉ. सुनिल खरपडे यांच्याशी सुद्धा याबाबत आम्ही चर्चा केली.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "मुंबईतच नाही तर देशभरात असं दिसून आलं आहे की टीबी रुग्णांमध्ये कोरोना संक्रमण खूप कमी प्रमाणात होतंय. मात्र यामागे ठोस कारण काय? याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. टीबी औषधांमुळे कोरोना इन्फेक्शन रोखण्यात यश मिळतंय का यावर संशोधन महत्त्वाचं आहे."

डॉ. सुनिल खरपडे सद्यस्थितीत केंद्र सरकारच्या कोव्हिड-19 टीमचे मुंबईतील प्रमुख सदस्य म्हणून काम करत आहेत.

ते पुढे म्हणतात, "अॅंटी टीबी ड्रग्जमुळे शरीरात कोणते बदल होतात. याच्या शास्त्रीय कारणांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला टीबी औषधांचा कोरोनाव्हायरसवर परिणाम होतो का याची माहिती मिळेल."

हाफकिन्समध्ये संशोधन सुरू

टीबी होवू नये यासाठी लहान मुलांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बीसीजी (BCG) लस दिली जाते. याचा कोरोनाग्रस्त रुग्णांवर फायदा होतो का? यावर मुंबईच्या हाफकिन्स प्रयोगशाळेत संशोधन सुरू करण्यात आलं आहे.

याबाबत बोलताना हाफकिन्सचे संचालक डॉ. राजेश देशमुख म्हणतात, "बीसीजी लसीचा कोरोनाबाधितांवर काय परिणाम होतोय. हे तपासण्यासाठी संशोधन सुरू करण्यात आलं आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयात यावर क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. कोव्हिडग्रस्त रुग्णांना बीसीजीची लस देऊन त्याचा काय परिणाम होतोय. याची तपासणी केली जात आहे."

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

"बीसीजी लसीचा कोरोनाबाधितांवर होणारा परिणाम तपासण्याचं क्लिनिकल ट्रायल इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केलं जात आहे. बीसीजी लसीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे याचा कोव्हिड रुग्णांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जात आहे," असं डॉ. राजेश देशमुख पुढे म्हणाले.

बीजीसी लसीबाबत WHOचे म्हणणे काय?

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, "बीसीजी लस कोरोना व्हायरसपासून संरक्षण देते याबाबत असूनही कोणता ठोस पुरावा मिळालेला नाही. बीसीजी लसीबाबत क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत. त्याचे परिणाम तपासले जात आहेत. ठोस पुरावा नसल्यामुळे कोव्हिडपासून संरक्षणासाठी बीसीजी लसीचा वापर करू नये. टीबीचा प्रतिबंधक उपाय म्हणून बीसीजी लसीचा वापर करावा."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)