You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Neowise Comet : निओवाईज धूमकेतू रात्रीच्या आकाशात पाहायचा कसा?
- Author, संकेत सबनीस
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
सुर्याभोवती 6800 वर्षांची दीर्घ वर्तुळाकार कक्षा पूर्ण करणारा निओवाईज धूमकेतू पुन्हा पृथ्वीभोवतीच्या अवकाशात दिसू लागलाय. सध्या सोशल मीडियावर या धुमकेतूची खूप चर्चा सुरू आहे. हा धुमकेतू कसा पाहायाचा? तो साध्या डोळ्यांना दिसेल का? असे अनेक प्रश्न सध्या नेटीझन्स एकमेकांना विचारत आहेत. याच काही प्रश्नांची उत्तरं आम्ही पुढे दिली आहेत. हा धूमकेतू पाहण्याची संधी पुढचे काही दिवसच तुम्हाला मिळणार आहे.
14 जुलैपासून 4 ऑगस्टपर्यंतचे 20 दिवस हा धूमकेतू साध्या डोळ्यांनी पाहण्याची अनोखी संधी महाराष्ट्रासह संपूर्ण पृथ्वीवासियांना लाभणार आहे. सुर्यास्तानंतर वायव्य दिशेला म्हणजेच उत्तर - पश्चिमेच्या आकाशात हा धूमकेतू पाहता येईल.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
सध्या देशात मान्सूनचं आगमन झाल्याने निरभ्र आकाश सापडणं दुर्मिळ आहे. मात्र, ही संधी उपलब्ध झाली तर हा दुर्मिळ धूमकेतू पाहणं सोडू नका. कारण, या 20 दिवसानंतर पुढची काही हजार वर्षं हा धूमकेतू दिसणार नाही. त्या आधी धूमकेतू म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेऊयात.
धूमकेतू म्हणजे काय?
धूमकेतू हे आपल्या सूर्यमालेचेच घटक असतात. 1997 साली आलेला हेल-बॉप हा धूमकेतू सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेला होता. त्यानंतर 2007 मध्ये मॅकनॉट नावाचा धूमकेतू पृथ्वीवरून दिसला होता. त्यानंतर साध्या डोळ्यांनी दिसणारा निओवाईज धूमकेतू आता पाहता येईल.
या धूमकेतूंचा आकार ओबडधोबड असतो आणि त्यात धूळ, बर्फ, वायू यांचा समावेश असतो. त्यांचा आकार काही किलोमीटरपर्यंत पसरलेला असतो. त्यांच्या कक्षेत फिरत-फिरत ते सुर्याजवळून प्रवास करतात. यावेळी सुर्याच्या प्रखरतेमुळे त्यांच्यातील बर्फ वितळतो.
यामुळे पृथ्वीवरून पाहताना त्यांची शेपूट दिसते. ही शेपूट दोन भागात विभागलेली असते. एक शेपूट धुलिकणांची असते तर दुसरी वायूंची असते. पृथ्वीजवळून जाताना या धूमकेतूंच्या धुलिकणांमुळे उल्कावर्षाव झालेला पाहायला मिळतो. सुर्यमालेत हे धूमकेतू आपापल्या कक्षेत सुर्याला प्रदक्षिणा घालत असतात.
निओवाईजचा शोध कधी लागला?
या धूमकेतूचा शोध यावर्षीच 27 मार्चला लागला. याबद्दल ओडीसा इथल्या प्लॅनेटोरियमचे उपसंचालक पथानी समंता यांनी एएनआय वृत्तसंस्थेला माहिती दिली. ते सांगतात, "27 मार्चला वायव्येकडच्या आकाशात नासाच्या दुर्बिणीला या धूमकेतूचा शोध लागला. याचा खगोलीय भाषेतील क्रमांक हा C/2020 F3 आहे. पुढचे दिवस सुर्यास्तानंतर हा धूमकेतू दिसेल."
नासाने या धूमकेतूविषयी आपल्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती दिली आहे. 27 मार्चला हा धूमकेतू सुर्याजवळून जाताना नासाच्या 'निअर अर्थ ऑब्जेक्ट वाईल्ड फिल्ड इन्फ्रारेड सर्व्हे एक्सप्लोरर' (निओवाईज) या स्पेस टेलिस्कोपने या धूमकेतूचा शोध लावला.
निओवाईज धूमकेतूबद्दल अधिक माहिती देताना दक्षिण कॅलिफोर्नियातल्या नासाच्या जेट प्रपल्शन लॅबरोटरीमध्ये निओवाईज धूमकेतूचे उपप्रमुख संशोधक जोसेफ मॅसिरो सांगतात की, "हा धूमकेतू पृथ्वीपासून सर्वांत कमी अंतरावरून म्हणजेच 10 कोटी 30 लाख किलोमीटर प्रवास करतो आहे. इन्फ्रारेड दुर्बिणीच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्आ माध्यमातून या धूमकेतूचा अभ्यास केला असता त्याचा आकार पाच किलोमीटर इतका मोठा आहे. तर, त्याला दोन शेपट्या असून त्यांचं अंतर काही लाख किलोमीटरपर्यंत पसरलं आहे. धूमकेतूच्या केंद्रभागात धूळ आणि बर्फ असून आपल्या सौरमालेच्या निर्मितीवेळीच या धूमकेतूची निर्मिती झाली आहे."
धूमकेतू कधी पाहता येईल?
निओवाईज धूमकेतू कधी पाहता येईल हे जाणून घेण्यासाठी आम्ही खगोल अभ्यासक आणि मुंबईतील खगोल मंडळाचे समन्वयक डॉ. अभय देशपांडे यांच्याशी संवाद साधला. देशपांडे याबद्दल सांगतात, "हा धूमकेतू सायंकाळी 6 नंतर रात्री साडेनऊपर्यंत पाहता येईल. आकाश स्वच्छ असेल तर तो भारतातून सगळीकडून दिसेल. येत्या 17 जुलैपर्यंत तो सकाळी सुर्योदयापूर्वीही दिसू शकेल. जेवढा तो उशिरा पाहायला जाऊ तेवढा तो अंधुक होत जाईल. 1997 साली आलेल्या हेल-बॉप धूमकेतूएवढा तो तेजस्वी दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही."
देशपांडे पुढे सांगतात की, "या धूमकेतूच्या दोन्ही शेपट्या दिसत आहेत. अमेरिका - कॅनडा इथे अनेकांनी यापूर्वी त्याचं दर्शन घेतलेलं आहे. या धूमकेतूची कक्षा मोठी म्हणजे साडेसहा हजार वर्षांची असल्याने तो इथून पुढे थेट इ. स. 8000 नंतरच पृथ्वीवरून दिसू शकेल."
दोन शेपट्यांचा धूमकेतू
नासाने त्यांच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, निओवाईज धूमकेतूला दोन शेपट्या आहेत. या धूमकेतूच्या खालच्या शेपटीत मोठ्या प्रमाणात धूळ आणि बर्फ आहे. सुर्याजवळ येत असल्याने धूमकेतूच्या केंद्र भागाचं तापमान वाढतं आणि त्यातली धूळ आणि वितळलेल्या बर्फामुळे ही मागे जाणारी शेपूट तयार होते.
या धूमकेतूच्या दुसऱ्या शेपटीत वायूंचं आणि आयनचं प्रमाण अधिक आहे. सुर्याच्या प्रखर प्रकाशामुळे या वायूंमधले इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. त्यामुळेच या दुसऱ्या शेपटीची निर्मिती झाली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)