You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसः मुंबईच्या पत्रकाराने नोकरी गेल्यावर चहा विकण्याचा निर्णय घेतला कारण...
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोरोनापाठोपाठ आलेल्या लॉकडाऊनमुळे जसं सामान्य जनजीवन ठप्प झालं, तसा अनेक उद्योगांवरही परिणाम झाला. कित्येक व्यवसायांमधील लोकांचे पगार कमी करावे लागले. काही उद्योगांनी लोकांना सक्तीची सुटी दिली तर काही व्यवसायांमधून कामगारांना, नोकरदारांना थेट नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं.
मुंबईचा वृत्तपत्र व्यवसायही याला अपवाद नाही. अनेक पत्रकारांच्या आणि वर्तमानपत्रांमध्ये काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या या काळामध्ये किंवा या कोरोनाच्या आसपासच्या महिन्यांमध्ये गेल्या.
यातील अनेक पत्रकार दहा-पंधरा वर्षांहून जास्त काळ नोकरी करत होते. काही पत्रकारांची एकाच संस्थेत दहा-पंधरा वर्षे नोकरी पूर्ण झाली होती. त्यामध्ये वार्ताहर, उपसंपादक, छायाचित्रकार, मुद्रितशोधक, डीटीपी आर्टिस्ट अशी कामं करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
अचानक नोकरी जाण्यानं धक्का बसतोच, आता पुढे काय? अशी अनिश्चितता आणि चिंता सतावत राहाते. पण मुंबईच्या एका पत्रकारानं इतरांना प्रेरणा मिळेल, हुरुप येईल असा आगळा वेगळा निर्णय घेतला आणि तो तातडीनं अमलातही आणला.
नोकरी थांबणं आणि नवी जबाबदारी
ही गोष्ट आहे दीपक वागळे या पत्रकाराची. चारचौघांप्रमाणे पत्रकारितेचं शिक्षण घेऊन आपल्या लिहिण्याची आवड लक्षात घेऊन आणि कायमस्वरुपाची एक लहानशी पण चांगली नोकरी मिळेल अशा अपेक्षेनं तो साधारणपणे दहा वर्षांपूर्वी या क्षेत्रात उतरला होता.
या काळात त्यानं लहान-मोठी साप्ताहिकं, मासिकं, मग वर्तमानपत्रं अशा अनेक नोकऱ्या केल्या. सरतेशेवटी गेल्या वर्षअखेरीपर्यंत मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामध्ये कंत्राटी तत्त्वावर (कॉन्ट्रॅक्ट बेसीस) त्यानं नोकरी केली.
परंतु हे कंत्राट डिसेंबरपर्यंतच होतं. त्यापुढे परंपरेप्रमाणे नवं कंत्राट पुन्हा मिळेल अशा आशेवर काही महिने वाट पाहिल्यावर दीपकला आता मुदतवाढ मिळणार नसल्याचं लक्षात आलं. 2020 वर्षाच्या सुरुवातीचे दोन महिने गेल्यानंतर कोरोनाची साथ आल्यावर ही शक्यता मावळतच गेली.
या सर्व घडामोडींमध्ये त्याच्या कौटुंबिक आयुष्यातही बदल घडत होते. डिसेंबर महिन्यात त्याला मुलगा झाला. नवी जबाबदारी आपल्या कुटुंबावर आली असताना आता त्याला नियमित आर्थिक पाठबळ मिळत राहील असं काहीतरी करणं क्रमप्राप्त होतं.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
चहा की वडापाव?
कोरोनाच्या काळात नव्या नोकऱ्या मिळण्याची शक्यता अंधुक झाल्यावर दीपकने आता नवा व्यवसाय करण्याची कल्पना त्याच्या घरामध्ये मांडली. आपण वडापाव किंवा चहा विकण्याचा व्यवसाय सुरू करावा अशी इच्छा त्यानं कुटुंबीयांसमोर मांडली. त्याचे आई-वडील, पत्नी यांनी त्याच्या या निर्णयामागे उभे राहाण्याचा निर्णय घेतला. गेली अनेक वर्षे त्याच्या घरामध्ये मेणबत्त्या बनवण्यासारखे अनेक लहान-लहान कामं केली जात होतीच.
आता सुरुवातीच्या काळामध्ये चहाचा विकून व्यवसाय सुरू करावा असा निर्णय त्यांनी घेतला.
विशेष म्हणजे हे सर्व लोक त्याच्या मागे पूर्वतयारीने उभे राहिले. दीपकचे वडील त्याच्यासाठी चहाचं पातेलं आणि इतर साहित्य घेऊन आले. या सर्व गोष्टी त्याचा हुरूप वाढवणाऱ्या होत्या. सर्व साहित्यानिशी सज्ज होऊन त्यानं चहाविक्रीचा श्रीगणेशा केला.
पहिल्या दिवसानं काय शिकवलं?
पहिल्या दिवशी सकाळीच लवकर उठून दीपकने दोन मोठे थर्मास चहाने भरुन घेतले. परळच्या एका जागेवर जाऊन त्यानं ग्राहकांची वाट पाहायला सुरुवात केली.
लॉकडाऊनच्या काळात मुंबईतले लहानमोठे विक्रेते नाहीसे झाले तसे चहावालेही आपापल्या गावाला निघून गेले होते. त्यामुळे इथे कोणी नवा चहा विकणारा आला आहे हे कोणालाच माहिती नव्हते. 80 कप चहा घेऊन गेलेल्या दीपकचा केवळ 20 कप चहाच विकला गेला.
मग मात्र आपण एकाच जागी उभं राहून चालणार नाही हे त्याच्या लक्षात आलं. दुसऱ्या दिवसापासून त्यानं आजूबाजूच्या दुकानांमध्ये, बँकेमध्ये जायला सुरुवात केली.
परळच्या नरे पार्क इथल्या मार्केटमध्ये न लाजता थेट चहा..चहा … असं मोठ्याने ओरडत चहा विकायला सुरुवात केली. झालं. तिथल्या भाजी विक्रेत्यांसाठी ही चांगलीच मदत होती. मार्केटमधल्या भाजी विक्रेत्यांची दीपकमुळे सोय झाली आणि त्यालाही नवे ग्राहक मिळाले.
आता रोज सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा आणि दुपारी साडेडेतीन ते संध्याकाळी सहा असं चहा विकण्याचं काम तो करतो.
काही लोकांना चहा जागेवर हवा असेल, तिथे अनेक लोक जमले असतील तर त्यांचा फोन आल्यावर तो मोटरसायकलने त्या जागेवर जाऊन चहा देतो. बँकेतल्या आणि इतर ग्राहकांना त्यानं वाणासमानही आणून द्यायला सुरुवात केली.
मोबाईल चहा
आता हळूहळू चहाच्या व्यवसायाचा अंदाज, लोकांची मागणी लक्षात आल्यावर दीपकने आपल्या नव्या कल्पनेवर विचार करायला सुरुवात केली.
ज्या लोकांना चहा आपल्या जागेवर हवा आहे त्यांनी फोन केल्यावर तात्काळ तिथं जाऊन त्यांना चहा द्यायचा आणि असा 'मोबाईल चहा'चा एक ब्रँडच विकसित करायची त्याची योजना आहे.
त्याच्या कामातलं सातत्य पाहून काही लोकांनी त्याच्याकडे नाश्ता देण्याचीही मागणी केली आहे. त्यावरही तो विचार करत आहे.
मित्रांची मदत आणि शाबासकीची थाप
पत्रकारितेमुळे दीपकने अनेक मित्रही जोडले होते. त्याच्याकडे आता जुने मित्र चहा प्यायला येतात. त्याने हा व्यवसाय सुरू केल्यावर अनेक जुन्या मित्रांनी, ओळखीच्या लोकांनी त्याला शाबासकी देण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी त्याला फोन केले.
रोज भेटणाऱ्या मित्रांनी त्याच्या व्यवसायात मदतही केली आहे. त्याचं काम पाहून एका मित्राने आनंदाने त्याला तात्काळ 1 हजार रुपयांची मदत भांडवल म्हणून दिली आहे.
समस्या नव्हे तर संधी
आपल्या कामाबद्दल सांगताना तो म्हणतो, "हे आधीच्या नोकऱ्यांपेक्षा कष्टाचं काम आहे, प्रयत्नांची परीक्षा घेणारं काम आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. त्या तयारीनंच मी या व्यवसायाला सुरुवात केली. लॉकडाऊनमुळे साधारणपणे एकप्रकारची नैराश्यावर छटा सध्या सगळीकडे आली आहे. पण मी निराश न होता, हातावर हात ठेवून न बसता प्रयत्न करायचं ठरवलं आहे. सकारात्मक विचारामुळेच मी या लॉकडाऊनकडे किंवा सध्याच्या आर्थिक संकटाकडे प्रश्न म्हणून न पाहाता संधी म्हणून पाहायचं ठरवलं."
कोरोनाच्या काळामध्ये खचून न जाता नव्या पर्यायांचा विचार सर्वांनी केला तर आपण परिस्थितीवर मात करु शकू असा विश्वास त्याला वाटतो. प्रत्येकाला आपल्याला आवडीनुसार नवा पर्याय शोधता येईल, सुरुवातीच्या थोड्या संघर्षाच्या काळानंतर प्रत्येकाला स्थैर्य येऊ शकेल असं त्याचं मत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)