अक्षय कुमारच्या नाशिक हेलिकॉप्टर दौऱ्याची चौकशी करणार: छगन भुजबळ #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, AKSHAYKUMAR/TWITTER
आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1) अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टर प्रवासाची चौकशी होणार
अभिनेता अक्षय कुमार याचा नाशिकमधील खासगी दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मुख्यमंत्र्यांपासून सगळे मंत्री कारमधून फिरत असताना, अभिनेता अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी मिळाली? असा सवाल करत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

फोटो स्रोत, Twitter/Chhagan Bhujbal
"नियम डावलून अक्षय कुमारला व्हीआयपी ट्रीटमेंटचा प्रकार धक्कादायक आहे. ग्रामीण भाग असताना अक्षय कुमारला शहर पोलिसांचा एस्कॉर्ट कसा?" असाही सवाल उपस्थित करत भुजबळांनी या सर्व प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत. माय महानगरने ही बातमी दिली आहे.
अक्षय कुमार खासगी हेलिकॉप्टरने नाशिकला आला होता. नाशिकमधील सपकाळ नॉलेज हबच्या हेलिपॅडवर त्याचं आगमन झालं. या दौर्यादरम्यान तो परिसरातीलच एका खासगी रिसोर्टमध्ये मुक्कामीदेखील थांबला होता.
2) पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण
पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. मुरलीधर मोहोळ यांनीच त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली. पुणे मिररनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
"थोडासा ताप आल्याने मी माझी कोव्हिड-19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल," अशी माहिती स्वत: मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

फोटो स्रोत, Twitter/Murlidhar Mohol
कोरोनावर उपचार घेत असतानाच कामही सुरु ठेवणार असल्याचं मोहोळ म्हणाले.
उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील, असं मोहोळ यांनी ट्वीटमधून सांगितलं.
मुरलीधर मोहोळ हे पुण्यातील भाजपचे नेते असून, सध्या पुण्याच्या महापौरपदावर कार्यरत आहेत.
3) महिला कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्या - ठाकूर
शासकीय सेवेतील गर्भवती आणि दुर्धर आजार असलेल्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थितीची सक्ती न करता त्यांना घरून काम करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेत्या अॅड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलीय. यशोमती ठाकूर या महाराष्ट्राच्या महिला व बालविकासमंत्री आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Twitter/Yashomati Thakur
यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की, "रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित आजार, हृदयविकार, श्वसनविकार इत्यादी आजार असलेल्या 50 वर्षांहून अधिक वयाच्या, तसेच गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना करोना संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे."
मानवतेच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने शासकीय महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्यापासून सूट द्यावी, अशी ठाकूर यांनी पत्राद्वारे मागणी केलीय.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

4) उद्धव ठाकरेंनी पवारांच्या सूचनांचा विचार करावा - फडणवीस
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पवारांच्या सूचना अंमलात आणण्याचा टोमणेयुक्त सल्ला दिला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
"मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शरद पवार आणि माझी अनेकदा भेट व्हायची, पवारसाहेब मला काही सूचना करायचे. त्याचं पालन मी करत असे, ठाकरेंचं मला माहित नाही. पण शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना राज्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे या मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या सूचना ऐकूण त्या अंमलात आणाव्यात," असा टोमणेयुक्त सल्ला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलाय.

फोटो स्रोत, Twitter/Devendra Fadanvis
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेची विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पनवेल, नवी मुंबईचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांना हात घातला.
5) भारतीयांचा डेटा सिंगापूरमधल्या सर्व्हरमध्ये आहे - टिकटॉकचे सीईओ
टिकटॉकचे सीईओ केव्हिन मेयर यांनी बाईटडान्स कंपनीची मुळं चीनमध्ये असल्यालाच नकार दिलाय. मेयर म्हणतात, "चीनच्या सरकारनं ना कधी आमच्याकडे युजर्सचा डेटा मागितला आणि ना आम्ही कधी त्यांना दिला." हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.
"मी हे खात्रीने सांगू शकतो की, चीनने कधीच आमच्याकडे भारतीय युजर्सच्या माहितीसाठी विनंती केली नाही. तसंही भारतीय युजर्सची माहिती सिंगापूरमधील सर्व्हरमध्ये ठेवण्यात आली आहे," असं केव्हिन मेयर म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
किंबहुना, भविष्यात जरी कुणी आमच्याकडे युजर्सचा डेटा मागितला, तरी आम्ही देणार नाही, असंही मेयर म्हणाले.
भारतात 59 चिनी अॅप्सवर बंदी आणण्यात आली. त्यात बाईटडान्सच्या टिकटॉक आणि हॅलो या अॅप्सचाही समावेश आहे. भारतातील बाजारात कायम राहण्यासाठी आता टिकटॉकनं धडपड सुरू केली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








