भारत-चीन तणावः चिनी लष्कराच्या तयारीबद्दल भारताच्या गुप्तचर संस्थेला कळलं कसं नाही?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जुगल पुरोहित
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतानं आपल्या गुप्तचर विभागांच्या भूमिकेचं परीक्षण केलं पाहिजे, चीनसोबतचा तणाव संपला की त्यातील अडथळे दूर केले पाहिजेत, असं मत भारतीय सैन्याचे माजी गुप्तचर विभाग प्रमुख जनरल (नि) अमरजीत बेदी यांनी व्यक्त केलं आहे.
बीबीसीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ते म्हणाले, भारतीय सैनिक गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांना भिडले, त्यांच्यापर्यंत ही माहिती आधी पोहोचायला हवी होती.
ते म्हणाले, "आपल्या सैनिकांना चिनी सैनिकांच्या हालचालींची माहिती आधीपासून मिळायला हवी होती. मला वाटतं हा प्रश्न संपल्यावर याची पूर्ण चौकशी व्हावी. आपल्या सैनिकांना त्याचा काहीच सुगावा कसा लागला नाही."
"आपली व्यवस्था भविष्यात चांगली होण्यासाठी चौकशीची गरज आहे. केवळ सैन्यातच नाही तर गुप्तचर संस्थांमध्येही चौकशी झाली पाहिजे. अशा प्रकारची चौकशी आम्ही कारगिल युद्धानंतर केली होती. त्यासाठी विशेष टास्कफोर्स तयार करण्यात आला होता."

फोटो स्रोत, TPG
जनरल बेदी यांच्यामते चीनने ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेतली आणि हिंसक संघर्षात आपले सैनिक मृत्युमुखी पडले, ते पाहाता चीनने हे सगळं नियोजनबद्ध पद्धतीने केलं आहे.
ते म्हणतात, "मला वाटतं चीन दीर्घकाळ यावर काम करत होता. कदाचित त्यांनी मार्च-एप्रिलपासूनच याची तयारी सुरू केली असेल."
गलवान खोऱ्यातील हल्ल्यानंतर या घटनेला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही 'नियोजनबद्ध' आणि 'पूर्वनियोजित' असं म्हटलं होतं.
मग भारताच्या गुप्तचर संस्थांमध्ये अशा नियोजनबद्ध आणि पूर्वनियोजित हल्ल्याबद्दल इशारा देण्याची क्षमता नाही का?
या प्रश्नावर जनरल बेदी म्हणाले, "हे गुप्तचर आणि मॉनिटरिंग एजन्सींचं अपयश आहे, असं मी म्हणू शकत नाही. आपण स्वतःला तयार ठेवलं होतं. मात्र चीन करारांमधील तरतुदींनुसार वागेल, असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही."
जनरल बेदी मार्चपर्यंत सैन्याच्या गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख होते. तोपर्यंत चीनच्या हालचालींबाबत भारताला काही समजलं होतं का?
यावर ते म्हणाले, "आपल्याला चीनमध्ये होणाऱ्या सर्व हालचालींप्रमाणे पायाभूत सुविधा तायर कराव्या लागतील. त्यांचा सराव असो वा एखादी असामान्य हालचाल… मार्चपर्यंत सर्व समजत होतं. चिनी सैनिकांच्या सरावाबद्दल काही संकेत मार्चपर्यंत मिळाले होते, त्याची माहिती आम्ही पुढे पाठवली होती."
चीनच्या गुप्तचर आणि मॉनिटरिंग संस्थांच्या क्षमतेबद्दल बेदी यांचं मत काय आहे?
ते सांगतात, "नक्कीच आपल्यापेक्षा त्यांच्याकडे जास्त साधनं आहेत. काळानुरूप चीनने आपल्या सैन्यक्षमतेत भरपूर सुधारणा केल्या आहेत. चीनकडे भारताच्या तुलनेत चारपट जास्त उपग्रह आहेत. सध्या त्यांची क्षमता जास्त आहे हे स्पष्ट आहे. म्हणून आपल्याकडे फार कमतरता आहे असं नाही. भारतानेही काळानुरूप आपल्या क्षमतेत वाढ केली आहे."
सध्या भारत आणि चीन यांच्यात तणाव आहे. उपग्रह आपल्याला सीमेची स्थिती दाखवणारे स्पष्ट छायाचित्र देऊ शकते का?
यावर जनरल बेदी म्हणतात, "आपल्याकडे 'जिओ-स्पॅशिअल' साधनं गेल्या आठ-नऊ वर्षांमध्ये वाढली आहेत. मात्र प्रत्येक चांगल्या-वाईट हंगामातील जमिनीवरची स्थिती आपल्याला मिळेल इतके आपले सॅटेलाईट विकसित नाहीत."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








