नारायण राणे : 'उद्धव ठाकरे सरकारला घरी पाठवून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे'

फोटो स्रोत, ShahidShaikh
'महाराष्ट्र सरकारला घरी पाठवून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे,' अशी मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे.
"जे सरकार जनतेचं संरक्षण करू शकत नाही, ते सरकार बदलल्याशिवाय कोरोनावर नियंत्रण मिळवता येणार नाही. घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहिल्यांदा पाहिला," असंही राणे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. बीबीसी मराठीसाठी प्राजक्ता पोळ यांनी यांची मुलाखत घेतली.
नारायण राणे यांच्या या मुलाखतीचा संपादित अंश इथं देत आहोत.
राज्यात कोरोनाची परिस्थिती आहे. दक्षिण मुंबईतले काही आकडे कमी झालेले आहेत. याआधी तुम्ही एक मागणी केली होती की सरकार अपयशी आहे त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी त्या मागणीवर तुम्ही ठाम आहात का?
मी राजकीय मागणी केली नव्हती. कोरोनाची आजही परिस्थिती तुम्ही पाहिली तर मुंबईमध्ये 4689 मृत्यू झालेत. आणि महाराष्ट्रात 8178 एवढी मृत्यू संख्या आहे. बाधीतांची संख्या तर विचारूच नका. रोज रूग्ण वाढतायेत, मृत्यूमुखी पडतायेत याला जबाबदार कोण? हे सरकार जर मृत्यू थांबवण्यात अपयशी ठरत असेल तर हे सरकार काय कामाचं? रोज नवीन आदेश निघतात, त्याचं पालन होत नाही. जे सरकार जनतेचं संरक्षण करू शकत नाही ते सरकार बदलल्याशिवाय कोरोनावर नियंत्रण मिळवता येणार नाही असं माझं ठाम मत आहे. कारण हे बेजबाबदार सरकार आहे. घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहील्यांदा पाहिला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहीजे की हे सरकार बदललं पाहीजे?
या सरकारला आधी घरी पाठवून राष्ट्रपती राजवट लागू केली पाहीजे.
भाजप अजूनही आशावादी आहे का?
भाजप सरळ मार्गाने सत्ता स्थापनेसाठी आजही आशावादी आहे. देशात आमचं सरकार आहे. राज्यात आम्ही चांगलं सरकार देऊ शकतो एवढी ताकद भाजपमध्ये आहे.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

त्यादृष्टीने काही प्रयत्न सुरू आहेत का?
वरिष्ठ आम्हाला जसं मार्गदर्शन करतील त्यादृष्टीने प्रयत्न चालू आहेत.
ही तुमची वयक्तीक भूमिका आहे की पक्षाची भूमिका आहे?
ज्याअर्थी तुम्ही मला येऊन विचारता ती माझी वयक्तीक भूमिका आहे मी पक्षाला विचारून थोडी आलो.
तुम्ही म्हणताय प्रयत्न सुरू आहेत तर मग भाजप कोणासोबत जाईल?
जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत आम्ही कसे प्रयत्न करतोय हे सांगणं योग्य होणार नाही.
तुम्ही याआधी एक भाकीत केलं होतं की हे सरकार पडणार... आता हे सरकार पाच वर्षं टिकेल असं म्हणतायेत. तुम्हाला काय वाटत?
पाच वर्षं नाही.. या सरकारच एक वर्ष जाणं मुश्किल आहे. आता अंतर्गत किती वाद आहेत. हे सरकार एकजीव नाही. प्रत्येक पक्षातले अंतर्गत वाद, भिन्न पक्षांचे वाद.. इतके मतभेत असताना हे सरकार एकजीव नाही. लोकांसाठी काय करतात? इतकं मोठं चक्रीवादळ येऊनही एक रूपया नाही. विकासासाठी एकही रूपया नाही. सिंधुदुर्गाला २५ कोटी रूपये पण मिळत नाहीत. विकास कामं बंद आहेत. हे कसलं सरकार आहे?

फोटो स्रोत, Getty Images
तुम्ही म्हणताय राष्ट्रपती राजवटीवर ठाम आहात, पण याआधी तुम्ही जेव्हा ही मागणी केली होती तेव्हा पक्षाने तुम्हाला साथ दिली नव्हती, ते म्हणाले राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी भाजपची इच्छा नाही आणि सत्तेसाठी आम्ही प्रयत्न करत नाही ही विसंगती का?
मी माझं मत सांगितलं. राज्यातील जनता आज सुरक्षित नाही. कोरोनामुळे जे मृत्यू आणि बाधित रूग्ण वाढतायेत, देशाच्या कोणत्याच राज्यात आता अशी परिस्थिती नाहीये. आज देशाच्या कोरोना रूग्णांची संख्या ही ५ लाखांपर्यंत गेली त्याला कारण महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात दोन लाख रूग्ण आहेत. महाराष्ट्रामुळे देशाचा आकडा वाढतोय. याला जबाबदार कोण? आरोग्य खातं काय करतं? रूग्णांना कसं ठेवलं जात? काय व्यवस्था आहे हे बघा कोरोनाची पार्थिवं ठेवायला जागा नाहीये तर जिवंत रूग्णांची काळजी घेण्याची यांची क्षमता आहे का? या सरकारकडे कोरोनावर मात करण्याची क्षमता नाही.
लॉकडाऊन करण्यावरून तीन पक्षांमध्ये मतभेद होते. पुन्हा लॉकडाऊन करताना मंत्र्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही असं काही मंत्र्यांचं म्हणणं होतं ते त्यांनी शरद पवारांना सांगितलं. तुम्हाला काय वाटत हे लॉकडाऊन पुन्हा करायला पाहीजे होतं की शिथील करायला हवं होतं?
लॉकडाऊन पुन्हा केलं गेलय पण ते पाळलं कुठे जातंय. मुंबईतला काही भाग असा आहे की लॉकडाऊन ठेवा किंवा कर्फ्यू लावा परिणाम काहीच होत नाहीये. काय करतात अधिकारी? लॉकडाऊन वाढवून उपयोग नाही त्याचा फायदा किती होतोय हे महत्वाचं.
देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत असं म्हटलं होतं महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याआधी शरद पवार यांनी फडणवीसांना सरकार स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. पण पवारांनी एका मुलाखतीत त्यावेळी मोदींकडून प्रस्ताव आल्याचं म्हटलं होतं. खरं काय?
ते आता हे देवेंद्र फडणवीसांना माहिती असेल. पण देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात लक्षात ठेवावं शरद पवार हे जेव्हा प्रस्ताव देतात तेव्हा ते एकाच पक्षाला देतात का? यावर विश्वास ठेवावा इतपत विश्वास ठेवावा. पण आता ही गोष्ट इतिहास जमा झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी समर्थपणे याची उत्तरं दिलेली आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
याचा अर्थ शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवू नये असं म्हणायचय तुम्हाला ?
सरकारबद्दलचे किंवा राजकीय प्रस्ताव जे येतात ते आपल्यालाच दिले असतील यावर विश्वास ठेवून पुढे जाऊ नये असं मला वाटतं.
भारत चीन सीमेवर जो तणाव झाला यावर बोलताना पवारांनी कॉंग्रेसला एकटं टाकून मोदींची बाजू घेतली याकडे तुम्ही कसं बघता?
हा राष्ट्रीय प्रश्न आहे. ते संरक्षण मंत्री होते त्यामुळे त्यांना सर्व माहिती आहे. त्यातून काही चुकीचं किंवा कॉंग्रेसला एकाकी टाकलं असं मी म्हणणार नाही.
पण या वक्तव्यामागे काही दडलेलं असू शकतं का? यावरून काही घटना घडू शकतात का?
शरद पवार काहीही घडवू शकतात हे मला माहिती आहे.
तुम्हाला काय अपेक्षित आहे?
मला काही अपेक्षित नाही ते काहीही घडवू शकतात इतकं माहिती आहे.
जसे मतभेद सरकारमध्ये आहेत तिच खदखद भाजपमध्येही आहे अनेक नेते नाराज आहेत?
कोणतीही खदखद किंवा मतभेद भाजपमध्ये नाही. आमच्या पक्षनेतृत्वावर सर्वांचा विश्वास आहे.
भाजपमधल्या वरिष्ठ नेत्यांना कोणतीही पदं देताना डावललं जातय, त्यात पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे आहेत यांना कुठली पदं दिली गेली नाहीत. तुम्हाला काय वाटतं त्यांना पदं मिळायला हवी होती?
यावर आमचे नेते भाष्य करतील मी बोलणार नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








