सय्यद अली गिलानी : 'हुर्रियत कॉन्फरन्सशी यापुढे माझा काहीही संबंध नाही'

गिलानी
    • Author, रियाझ मसरूर
    • Role, बीबीसी उर्दू, श्रीनगर

काश्मीरचे फुटीरतावादी नेते सय्यद अली गिलानी यांनी हुर्रियत कॉन्फरन्स या फुटीरतावादी गटांच्या संघटनेपासून स्वतःला वेगळं केलं आहे.

सोमवारी जारी केलेल्या 47 सेकंदांच्या ऑडिओ क्लिपमध्ये 91 वर्षीय गिलानी सांगतात, "हुर्रियत कॉन्फरन्समधल्या सद्यस्थितीमुळे मी या गटासोबतचे संबंध पूर्णपणे तोडतोय."

मात्र त्यांचा हा निर्णय केंद्र सरकारच्या कडक कारवाई किंवा त्यांच्या नाजूक प्रकृतीमुळे नाही, असंही त्यांनी हुर्रियन नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधत दिलेल्या या ऑडिओ संदेशात स्पष्ट केलंय.

"एवढे कडक निर्बंध आणि माझं वय झालं असतानाही मी तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचण्याचा प्रयत्न केला. आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी तुम्हाला जाब विचारला जाईल, तुमच्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले जातील, हे तुम्हाला लक्षात येताच तुम्ही नेत्यांविरुद्ध बंड पुकारला," असंही ते म्हणालेत.

मध्यंतरी हुर्रियतच्या नेत्यांची एक बैठक झाली होती, ज्यात गिलानी यांना प्रमुखपदावरून हटवण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जातं.

सध्या हुर्रियतमध्ये भारताचा विरोध करण्याची भावना कमी होत चालली असल्याचं ते म्हणाले. तसंच या चळवळीच्या हितात अनेक गैरव्यवहारांकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असंही त्यांनी कबूल केलं.

मात्र हुर्रियतमधून बाहेर पडल्यावरही आपण काश्मीरमधल्या भारतीय प्रशासनाविरोधात आवाज उठवणार आणि आपल्या जनतेचं नेतृत्व करणार असल्याचं ते म्हणाले.

कोण आहेत सय्यद अली गिलानी?

सय्यद अली गिलानी हे 15 वर्षं जम्मू काश्मीरच्या विधानसभेत जमात-ए-इस्लामी पक्षाचे आमदार होते.

1989 साली सशस्त्र गटांनी बंड पुकारल्यानंतर त्यांनी चार इतर नेत्यांसह आमदारकीचा राजीनामा दिला होता. आता जमात-ए-इस्लामी ही संघटना प्रतिबंधित आहे.

1993 साली 20 हून अधिक राजकीय आणि धार्मिक गटांनी एकत्र येत सर्वपक्षीय हुर्रियत कॉन्फरन्सची स्थापना केली होती. तेव्हा 19 वर्षांचे असलेले मिरवाईज उमर फारूक हे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. नंतर गिलानी यांची हुर्रियतच्या अध्यक्षपदी निवड झाली.

गिलानी

फोटो स्रोत, AFP

त्यानंतर काही काळाने पाकिस्तानचे तत्कालीन लष्करी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी चार कलमी फॉर्म्युला सुचवला.

काश्मीरच्या फुटीरतावादी नेत्यांनी दिल्लीस्थित केंद्रीय नेतृत्वाशी यासंदर्भात चर्चा करावी, असं त्यांनी सुचवल्यानंतर गिलानी यांनी हुर्रियतपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. 2003मध्ये त्यांनी स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन केला आणि या हुर्रियत(G)चे ते आजीवन अध्यक्ष म्हणून निवडले गेले.

या दोन्ही संघटनांमध्ये कायमच तणाव राहिला, कारण फारूक यांच्या नेतृत्वातील हुर्रियत गटाची दिल्लीसोबत चर्चा करण्याची तयारी होती. तसंच काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याबाबतही त्यांची मवाळ भूमिका होता. दुसरीकडे गिलानी यांनी कायमच दिल्लीकडे पाठ फिरवली आणि कधीच चर्चा करण्यास तयार झाले नाहीत. संयुक्त राष्ट्रांच्या समक्ष काश्मीरमध्ये सार्वमत घेण्यात यावं, अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती.

हेही नक्की वाचा -

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)