आषाढी एकादशी : उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी पंढरपूर येथे केली विठ्ठलाची महापूजा

    • Author, नामदेव अंजना
    • Role, बीबीसी मराठी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे शासकीय महापूजा करण्यात आली.

पहाटे दोन वाजता सुरू झालेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेचे मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि अनुसया बढे (चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) हे दांपत्य ठरले. मुख्यमंत्र्यांसोबत ते महापूजेत सहभागी झाले होते.

ही महापूजा संपन्न झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी ट्वीट केलं त्यात ते म्हणाले, मी माऊलीला साकडं घातलं आहे की आता आम्हाला चमत्कार बघायचा आहे, आम्हाला चमत्कार दाखव. कारण मानवाने हात टेकले आहेत. आपल्याकडे औषध नाही, काही नाही. हे तोंडाला पट्टी बांधून कसं जीवन जगायचं?

म्हणून मी साकडं घातलं आहे, आज आषाढी आहे, आजपासूनच कोरोनाचे संकट नष्ट होवो आणि संपूर्ण जगाला आनंदी, मोकळं आणि निरोगी जीवन जगण्याचं भाग्य प्राप्त होवो असे मी विठुरायाच्या चरणी साकडं घातलेलं आहे, मातेच्या चरणी साकडं घातलेलं आहे, असं ट्वीट उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

टाळ-मृदंगाचा गजर, विठू-रखुमाईचा जयघोष आणि देहभान हरपून पंढरीच्या ओढीनं पायी चालणारे वारकरी... हे चित्र यंदा कोरोना विषाणूमुळे दिसलं नसलं, तरी पालखीची परंपरा पार पडणार आहे. पालखीचं स्वरूप मात्र यंदा वेगळं पाहायला मिळालं.

यंदा शिवनेरी बसमधून 20 वारकऱ्यांसोबत पालखी पंढरीत पोहोचली. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालख्या बसमधून पंढरपूरला पोहोचल्या आहेत.

तुकोराम महाराजांच्या पादुका एसटीतून पंढरीच्या दिशेने रवाना झाल्या. त्याआधी पंचपदी अर्थात पाच भजन झालं. त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालून पादुका घेऊन बस पंढरीकडे रवाना झाली. पारंपरिक मार्गावरूनच ही एसटी मार्गस्थ झाली. या दरम्यान इनामदार वाडा, अनगडशाह बाबा दर्गा, चिंचोलीचं शनी मंदिर इथं आरती करण्यात आली. ही बस आज रात्री पंढरीत पोहचली.

पण या पार्श्वभूमीवर कोर्टात एक याचिका दाखल झाली आहे.

आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज (30 जून) राज्यभरातून मुख्य नऊ पालख्या पंढरीच्या दिशेनं निघतील. या पालखीसोबत केवळ 20 वारकऱ्यांना येण्यास सरकारनं परवानगी दिलीय.

मात्र, या निर्णयाला विरोध करत, प्रत्येक पालखीसोबत 100 वारकऱ्यांना येण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी रीट याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलीय. पुण्यातील वारकरी सेवा संघानं ही याचिका दाखल केलीय. या याचिकेवर आजच मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

आषाढी एकादशीच्या दिवशी (एक जुलै) चंद्रभागा नदीत स्नान करण्यास आणि विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची परवानगी द्यावी, अशीही मागणी या याचिकेतून करण्यात आलीय. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.

चंद्रभागेच्या वाळवंटात वर्षानुवर्षांच्या परंपरेनुसार लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित हरिनामाचा गजर ऐकायला मिळणार नसला, तरी वारीची पंरपराही खंडित होणार नाहीय.

यंदा किती पालख्या पंढरीत येतील?

पंढरपूरमधील श्री रुक्मिणी मंदिर समितीचे सहाय्यक लेखाधिकारी विनोद पाटील यांच्याकडे सरकारनं पालख्यांच्या समन्वयाची जबाबदारी दिलीय.

बीबीसी मराठीनं त्यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं, यंदा एकूण 9 पालख्यांना आरोग्यासंबंधी सुरक्षेची सर्व काळजी घेऊन पंढरपुरात येण्यास परवानगी दिलीय.

या 9 पालख्यांना परवानगी :

  • संत एकनाथ महाराज संस्थान (पैठण)
  • संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान (त्र्यंबकेश्वर)
  • संत सोपानदेव महाराज संस्थान (सासवड)
  • श्री संत चागगवटेश्वर देवस्थान (सासवड)
  • संत मुक्ताबाई संस्थान (मुक्ताईनगर, जळगाव)
  • विठ्ठल-रुक्माई संस्थान (कौंडिण्यपूर, अमरावती)
  • संत तुकाराम महाराज संस्थान (देहू)
  • संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (आळंदी)
  • संत नामदेव महाराज संस्थान (सोलापूर)

'इन्सिडंट कमांडर'ची नेमणूक

या पालख्यांसोबत प्रशासनातील उच्चपदस्थ एक अधिकारीही असेल. 'इन्सिडंट कमांडर' असं त्याला संबोधलं गेलंय. ज्या जिल्ह्यातून पालखी निघेल, त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने 'इन्सिडंट कमांडर'ची नेमणूक केलीय.

यातील आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पालखीसाठी 'इन्सिडंट कमांडर' म्हणून पुण्यातील खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली यांची नेमणूक करण्यात आलीय.

बीबीसी मराठीनं संजय तेली यांच्याशी बातचीत करून, त्यांची नेमकी काय भूमिका असेल, हे जाणून घेतलं.

संजय तेली यांनी बीबीसी मराठीला सांगितलंय की, "सध्या कोरोनाच्या रुपानं मोठं आरोग्य संकट आहे. या वातावरणात कुठलीही बाधा न येता वारीची परंपरा पूर्ण व्हावी म्हणून इन्सिडंट कमांडर नेमण्यात आलेत. आरोग्य सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी इन्सिडंट कमांडरवर असेल."

प्रत्येक पालखीसोबत जास्तीत जास्त 20 जणांना पंढरीत येण्यास परवानगी देण्यात आली असून, शिवनेरी बसने पालखी मंगळवारी (30 जून) दुपारी दोन वाजता पंढरीच्या दिशेनं प्रस्थान करेल, अशीही माहिती संजय तेली यांनी दिली.

रात्री 11 वाजेपर्यंत पंढरपुरात पोहोचण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. त्यामुळे दुपारी निघाल्यानंतरही सहज पोहोचता येईल, असं तेली म्हणतात. मात्र, अर्थात इतर पालख्यांच्या ठिकाणांनुसार त्या त्या पालख्या वेळेचं नियोजन करून निघतील.

वारकऱ्यांची काय काळजी घेतली जाईल?

संजय तेली यांच्या माहितीनुसार, पालखीसोबत जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांची आणि शिवनेरी बसच्या चालकाची कोव्हिड चाचणी घेतली जाईल. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह येईल, त्यांनाच सोबत नेलं जाईल. शिवाय, एसटी बसचंही पूर्णपणे निर्जंतुकीकरण केलं जाईल.

या पालख्यांचे पंढरपुरातील समन्वयक म्हणून काम पाहणारे विनोद पाटील यांनीही संजय तेली यांच्या माहितीला दुजोरा दिला.

विनोद पाटील म्हणाले, "कोरोना निगेटिव्ह असल्याचे अहवाल असायला हवेच, शिवाय वारकरी 60 पेक्षा कमी वयाचा असेल, याचीही दक्षता घेण्याचे आदेश आहेत."

शिवाय, सध्याच्या आरोग्य संकटात आपण नेहमी ज्या खबरदारी घेतोय, म्हणजेच मास्क वापरणं, सॅनिटायझर, फेसशिल्ड, हँडग्लोव्ह्ज इत्यादी गोष्टी तर बंधनकारक आहेतच.

पालख्या पंढरीत पोहोचल्यानंतर कार्यक्रम कसा असेल?

30 जून रोजी पालख्या पंढरपुरात दाखल होतील. रात्री 11.30 ते एक जुलैच्या पहाटे 1.30 वाजेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महापूजा होईल.

त्यानंतर 1 जुलै रोजी पहाटे मानाच्या सर्व पालख्या चंद्रभागेत स्नान करतील आणि प्रदक्षिणा घालून मठात दाखल होतील.

2 जुलै रोजी पालख्यांची भेट झाल्यानंतर संध्याकाळी आपापल्या ठिकाणी प्रस्थान करतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)