You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लक्षणं : हॅप्पी हायपोक्सिया कोरोनाग्रस्तांसाठी जीवघेणा का ठरतोय?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठीसाठी
कोव्हिड-19 मुळे आतापर्यंत जगभरात लाखो लोकांचा जीव गेला आहे. हे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. महाराष्ट्रातली परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या आजारासोबत जर हॅप्पी हायपोक्सिया नावाची स्थिती असेल तर त्या रुग्णाच्या त्रासात आणखी भर होते.
नेमकी ही स्थिती काय आहे आणि त्यामुळे रुग्णाला कसा धोका पोहोचतो हे आपण पाहुयात.
'शॉर्टनेस ऑफ ब्रेथ'
कोरोना व्हायरस रुग्णाच्या फुफ्फुसांवर आघात करतो. फुफ्फुसात शिरकाव झाल्यानंतर कोरोना व्हायरस मोठ्या संख्येने पसरतो किंवा गुणाकार करतो. ज्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो.
वैद्यकीय भाषेत याला 'शॉर्टनेस ऑफ ब्रेथ' असं म्हणतात. क्रिटिकल स्टेजमध्ये श्वास घेता येत नाही, शरीरातील ऑक्सिजनची पातळी प्रचंड खालावते आणि रुग्णाला ऑक्सिजन किंवा व्हेन्टिलेटर सपोर्टची गरज भासते.
रुग्णाला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असेल तर डॉक्टर तातडीने कोरोनाची तपासणी करण्याची सूचना करतात. श्वास घेण्यास त्रास होणं, कोरोनाचा संसर्ग झाल्याचं हे एक प्रमुख लक्षण आहे.
हॅप्पी हायपॉक्सिया म्हणजे काय?
मुंबई आणि महाराष्ट्रात डॉक्टरांना कोव्हिड-19 चं एक दुर्मिळ लक्षण पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांच्या शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी असलं, तरी रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत नाही.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा- कोरोना झाल्यानंतर बरं व्हायला रुग्णाला किती वेळ लागतो?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली असली तरी रुग्ण सामान्य दिसत असतो. श्वास घेण्यास अडथळा होण्याची लक्षणं दिसून येत नाहीत. वैद्यकीय भाषेत डॉक्टर याला 'हॅप्पी हायपॉक्सिया' 'Happy Hypoxia' असं म्हणतात.
महाराष्ट्रात कोव्हिड-19 मुळे 26 जूनपर्यंत 7106 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर मुंबईत 4000 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय. राज्यातही 'हॅप्पी हायपॉक्सिया' च्या केसेस समोर आल्या आहेत.
डॉक्टरांना झाला हॅप्पी हायपॉक्सियाचा त्रास
मुंबईतील सांताक्रूज परिसरातील प्रसिद्ध जनरल फिजीशिअन डॉ. वसंत शेणॉय यांनाही 'हॅप्पी हायपोक्सिया'चा त्रास झाला होता. शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच डॉ. शेणॉय कोव्हिडवर मात करून घरी परतले. पण, अजूनही त्यांना दर मिनिटाला अर्धा लीटर ऑक्सिजन घ्यावा लागतोय.
हॅप्पी हायपॉक्सियाचा त्रास कसा होतो? ओळखता येतो का? याबाबत आम्ही डॉ. शेणॉय यांचे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
बीबीसीशी बोलताना डॉ. वसंत शेणॉय म्हणतात, "सामान्य व्यक्तीच्या शरीरात 95 ते 99 टक्के ऑक्सिजन असतो. रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा कमी झालं तर श्वास घेण्यास त्रास सुरू होतो. मला 8-10 दिवस ताप होता, अचानक एक दिवस शरीरातील ऑक्सिजन 80 टक्क्यांवर पोहोचल्याचं लक्षात आलं. तरीही श्वास घेण्यास त्रास मात्र होत नव्हता. माझ्या ओळखीचे डॉ. अभिषेक भार्गव यांनी मला 'हॅप्पी हायपोक्सिया' झाला आहे असं निदान केलं. हे कोव्हिड-19 चं दुर्मिळ लक्षण आहे.'
'शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी असलं तरी श्वास घेण्यास त्रास होत नाही, म्हणून याला 'हॅप्पी हायपॉक्सिया' असं नाव देण्यात आलंय. मात्र, यात हॅप्पी असण्यासारखं काहीच नाही.
'हॅप्पी हायपॉक्सिया' म्हणजे एक गंभीर परिस्थिती आहे. चोरपावलाने हळुहळू शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते, कळतही नाही आणि परिणाम गंभीर होतात. मी याचं निदान करू शकलो नाही, पण, सुदैवाने माझ्या मित्राने वेळीच निदान केलं, ज्यामुळे माझा जीव वाचला,' असं डॉ. शेणॉय म्हणतात.
'हायपॉक्सिया' म्हणजे काय?
आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. रक्तातून हा ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवला जातो. हायपॉक्सिया म्हणजे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होणं.
हायपो (HYPO) म्हणजे कमी आणि अॅक्सिया (oxia) म्हणजे ऑक्सिजनच प्रमाण.
शरीरातील अवयवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम रक्ताद्वारे होतं. मात्र 'हॅप्पी हायपोक्सिया'मध्ये शरीरातील पेशींना हवं असलेलं ऑक्सिजन रक्ताद्वारे पुरेशा प्रमाणात वाहून नेलं जात नाही.
'हॅप्पी हायपॉक्सिया' सामान्य आहे?
डॉ. शेणॉय पुढे म्हणतात, "मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये ही परिस्थिती सामान्यांमध्ये पाहिली नाहीये. मी अनेक कोरोना संशियत रुग्णांना ओळखून रुग्णालयात पाठवलं. पण, कोरोनामुळे हॅप्पी हायपॉक्सिया कंडिशनबाबत अधिक माहिती मिळाली आहे. ही गोष्ट प्रकर्षाने पुढे आलीये. कोव्हिडमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. रक्तात ऑक्सिजनची योग्य देवाण-घेवाण होत नाही. परिणामी शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावत जाते. पण, याची लक्षणं दिसून येत नसल्याने, कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो.'
याबाबत बीबीसीशी बोलताना मुंबईच्या जसलोक रुग्णालयाचे इन्फेक्शिअस डीसिज स्पेशालिस्ट डॉ. ओम श्रीवास्तव म्हणतात, "हृदयरोग आणि फुफ्फुसाचा आजार असलेल्या 10 ते 12 टक्के रुग्णांमध्ये हॅप्पी हायपॉक्सिया आढळून येतो. यावर योग्य उपचार झाले नाहीत तर मोठी गुंगागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. हॅप्पी हायपॉक्सियाची अनेक कारणं आहेत. हिमोग्लोबिनची कमी मात्रा, छातीचा आकार, योग्य पद्धतीने ऑक्सिजन बाइंडिंग न होणं यामुळेदेखील हॅप्पी हायपॉक्सिया होवू शकतो.'
'रुग्णालयात असे अनेक रुग्ण येतात, ज्यांच्या शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी असतं. हे रुग्ण कमी ऑक्सिजन असतानाही सामान्यांप्रमाणेच दिसतात. त्यांना कोणतंच लक्षण दिसून येत नाही," असं डॉ. श्रीवास्तव पुढे म्हणाले.
नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता मोहन जोशी बीबीसीशी बोलताना म्हणाले, "फुफ्फुसाचे आजार असलेल्या लोकांमध्ये शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं. या रुग्णांचं शरीर कमी ऑक्सिजनसाठी ट्यून झालेलं असतं. अशा रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला तर त्यांना लक्षणं लवकर दिसून येत नाहीत. या रुग्णांना शरीरातील ऑक्सिजन कमी झाला तरी ते सामान्यांसारखेच दिसतात. मात्र, शरीरातील ऑक्सिजनची मात्रा खूप क्रिटीकल झालेली असते.'
'यासाठी कम्युनि़टीमध्ये जावून रुग्ण शोधणं फार महत्त्वाचं आहे. जेणेकरून लोकांच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी असेल तर त्यांच्यावर लगेचच एक्स-रे आणि इतर तपासण्याकरून उपचार करता येतील,' असं डॉ. जोशी पुढे म्हणाले.
हायपोक्सिया'ची लक्षणं
वेब-एमडीच्या माहितीनुसार,
- त्वचेचा रंग बदलणं,
- गोंधळाची परिस्थिती
- कफ, हृदयाचे ठोसे अचानक वाढणं
- जोर-जोरात श्वास घेणं
- अचानक खूप घाम येणं
सामान्यांनी काय करावं?
शरीरातील ऑक्सिजनची पातळी आपल्याला घरबसल्याही मोजता येणं शक्य आहे. 'पल्स ऑक्सिमीटर'च्या मदतीने आपण सहजतेने शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासू शकतो.
डॉ. शेणॉय म्हणतात, "मी 'हॅप्पी हायपोक्सिया' अनुभव केला आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की दिवसातून 10 वेळा आपण आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासली पाहिजे. कोव्हिडच्या संसर्गासोबत जगताना याशिवाय दुसरा पर्याय नाही. जीव वाचवायचा असेल तर प्रत्येक घरात 1 'पल्स ऑक्सिमीटर' असणं गरजेचं आहे.'
प्रत्येक आजाराचं योग्य वेळी निदान सर्वांत महत्त्वाचं असतं. मुंबईच्या पालिका रुग्णालयाचे माजी संचालक आणि राज्य सरकारच्या डेथ ऑडीट कमिटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे म्हणतात, "हॅप्पी हायपोक्सियाचे रुग्ण सामान्य लोकांसारखेच दिसतात. पण, एखादी अॅक्टिव्हिटी करत असताना त्यांची तब्येत अचानक बिघडते. काही वेळापर्यंत त्यांना याचा त्रास होतो. पण, त्यानंतर त्यांची तब्येत बरी होते. याचं योग्यवेळी निदान होणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून योग्य उपचार सुरू करता येतात."
"हॅप्पी हायपॉक्सियाग्रस्त रुग्णांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झालेली असते. त्यामुळे दुसऱ्या स्टेजमध्ये त्यांना श्वास घेण्यास त्रास होवू लागतो. आणि तिसरी स्टेज म्हणजे अत्यंत गंभीर परिस्थितीत व्हेन्टिलेटरची गरज लागते," असं डॉ. सुपे म्हणतात.
हायपॉक्सिया कोणत्या कारणांमुळे होतो?
मुंबईच्या लिलावती रुग्णालयाचे पल्मुनरी फिजीशिअन डॉ. जलील पारकर स्वत: कोव्हिड-19 चा सामना करून कोरोनामुक्त झालेत.
डॉ. पारकर म्हणतात, "शरीरात ऑक्सिजनची मात्र खूप कमी असूनही लोकांना श्वास घेण्यास त्रास न होणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. सिव्हिअर अस्थमा, फुफ्फुसांना झालेली इजा, न्यूमोनिया यामुळे हायपॉक्सिया होण्याची शक्यता असते. फुफ्फुसाचा आजार झालेल्यांमध्ये शरीरात ऑक्सिजनची मात्र कमी तर कार्बनडाय ऑक्साईडची मात्र जास्त असते."
राज्यात कोव्हिड-19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या मृत्यूची कारणमिमांसा करताना 'हॅपी हायपोक्सिया' बाबत आरोग्य यंत्रणांनाही माहिती मिळालीये.
'Happy Hypoxia' बाबत बीबीसी मराठीशी बोलताना राज्याचे आरोग्य आयुक्त डॉ. अनुप कुमार यादव म्हणाले, 'कोरोनाबाधितांच्या मृत्यूची माहिती तपासताना 'हॅप्पी हायपोक्सिया'च्या अनेक केसेस आढळून आल्या. 'हॅप्पी हायपोक्सिया' ला कोरोना व्हायरसचं एक प्रकटीकरण (Manifestation) म्हणून शकतो. हा ट्रेन्ड मुंबई आणि महाराष्ट्रात आढळून आला आहे. अंदाजे 2 के 3 टक्के लोकांमध्ये 'हॅप्पी हायपोक्सिया' असल्याचं समोर आलंय.'
'हे रुग्ण कोरोनाग्रस्त होते. मात्र, शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानंतरही त्यांना श्वास घेण्यास कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता,' असं डॉ. अनुप कुमार पुढे म्हणाले.
"कोव्हिड रुग्णांच्या डेथ ऑडीट रिपोर्टमध्ये आम्ही 'Happy Hypoxia' बाबत माहिती दिलीये. रुग्णांच्या मृत्यूची कारणमिमांसा करताना आम्हाला ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली," असं डॉ. सुपे पुढे म्हणतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)