तुकाराम मुंढे : कडक शिस्तीचा अधिकारी की हटवादी नोकरशहा?

तुकाराम मुंढे

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, तुकाराम मुंढे
    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. यावेळी मात्र ते कुठे जाणार याची माहिती त्यांना देण्यात आली नाहीये. पण त्यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश दिले आहेत आणि पुढील आदेशाची वाट पाहावी असे सामान्य प्रशासनाचे सचिव नितीन गद्रे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

तुकाराम मुंढे यांच्याकडे कुटुंब कल्याण विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार होता. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकपदाचा कार्यभार होता. आपल्या जवळील सर्व कार्यभार सार्वजनिक आरोग्याचे प्रधान सचिवांकडे सोपवावे आणि पुढील आदेशाची वाट पाहावी असे या पत्रात म्हटले आहे.

तुकाराम मुंढे म्हटलं की सतत होणारे वाद आणि बदल्या हे समीकरण पक्कं झालं आहे. का होतं असं?

2008 मध्ये एक तरुण अधिकारी नागपूर जिल्हा परिषदेचा सीईओ म्हणून रुजू झाला. सर्वप्रथम त्यांनी शिक्षकांकडे मोर्चा वळवला. वेळेवर उपस्थित राहण्याची सक्ती केली. शिक्षकांना ड्रेस कोड सुरू केला, "जर शिक्षक शाळेत दहा वाजता हजर झाले नाहीत तर दहा वाजून पाच मिनिटांनी शाळेचं दार बंद करणार." अशी अभूतपूर्व शिस्त त्यांनी शिक्षकांना लावली. तमाम शिक्षकांना धडकी भरली. जिल्हा परिषदेला आलेली मरगळ दूर केली. परिणामी जिल्हा परिषदेला आयएसओ मानांकन मिळालं. हा अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे.

कोरीव मिश्या, विना फ्रेमचा चष्मा, करारी भावमुद्रा आणि टापटीप व्यक्तिमत्त्वाचे तुकाराम मुंढे मुळचे मराठवाड्यातील बीडचे. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांचं बालपण शेती करण्यात गेलं. भाऊ एमपीएससीच्या परीक्षा देऊन अधिकारी झाला तेव्हा तुकाराम यांनीही हे स्वप्न पाहिलं.

कला शाखेत प्रवेश घेतला. मात्र सुरुवातीला ते युपीएससीची कोणतीही परीक्षा पास झाले नाहीत. मग त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. तरीही अधिकारी होण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देईना. मे शेवटी 2004 मध्ये त्यांनी जोमाने प्रयत्न केले आणि ते भारतातून 20 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

तुकाराम मुंढे जिथे जातील तिथल्या प्रशासनाला धडकी भरते. वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने त्यांच्या बातम्यांनी भरून निघतात. मग याच सगळ्या गोंधळात त्यांची बदली होते. लोक आंदोलनं करतात. पुन्हा त्याची बातमी. पुन्हा नवीन ठिकाणी गेलं की पहिले पाढे पंचावन्न. मुंढेच्या कारकिर्दीचा आता तो अविभाज्य घटक झाला आहे.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

दणदणीत सुरुवात

प्रशिक्षण झाल्यानंतर सहायक सोलापूरचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर देगलूरचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली नियमांवर बोट ठेवून काम करणं ही त्यांची खासियत आहे. ही ओळख त्यांनी कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच निर्माण केली आहे. कायदा काय म्हणतो त्याप्रमाणे यांचं काम सुरू असतं त्यामुळे सुरुवातीपासून सरकारने त्यांची बदली करायला, त्यांना योग्य पोस्टिंग न देण्याची सुरुवात केली.

2008 मध्ये ते नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले. त्यावेळी शिक्षकांना त्यांनी खूप शिस्त लावली IAS मध्ये येण्याआधी ते स्वत: शिक्षक होते हा त्याचा परिणाम असावा.

अनेक शिक्षकांना निलंबित केलं. त्याचा परिणाम असा झाला की तिथल्या शिक्षकांना शिस्त लागली, नागपूर जिल्हा परिषदेला ISO प्रमाणपत्र मिळालं. पण मुंढेवर अविश्वास प्रस्ताव आणला गेला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी तो फेटाळला. 26/11 च्या हल्ल्यानंतर विलासरावांनी राजीनामा दिला आणि काही दिवसातच मुंढेचीही बदली झाली.

तुकाराम मुंढे
फोटो कॅप्शन, तुकाराम मुंढे

नंतर त्यांना काही कमी महत्त्वाची पदं मिळाली. नंतर ते वाशिमच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. एकदा ग्रामसेवकांच्या युनियनच्या अध्यक्षांना त्यांनी निलंबित केलं. म्हणून त्याने मुंढेंना पेपरवेट फेकून मारला. सुदैवाने मुंढेंना इजा झाली नाही. हे प्रकरणही तेव्हा फार गाजलं होतं. मे 2010 मध्ये त्यांची खादी विकास महामंडळावर नियुक्ती झाली. ती संस्था नफ्यात आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

2011 मध्ये जालन्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. तिथे पाण्याची समस्या त्यांनी सोडवली. पाणी पुरवठ्यातील दलालांची मक्तेदारी मोडून काढली.

सोलापूरशी ऋणानुबंध

त्यांच्या कारकिर्दीचा बराचसा काळ त्यांनी सोलापूरमध्ये व्यतित केला. सहायक जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त अशी पदं त्यांनी भूषवली.

त्यांच्या कारकिर्दीचं विश्लेषण करताना ज्येष्ठ पत्रकार राजा माने म्हणतात, "ते माझे चांगले मित्र आहेत, तरीही मी त्यांच्या विरोधात लिहिलं आहे. परंतू ते सोडलं तरी त्यांच्या भूमिकेशी माझी सहमती होती. उदा. सिद्धेश्वर यात्रेचं आयोजन त्यांनी ऐतिहासिक पद्धतीने त्यांनी केलं. "

"त्यांची कार्यपद्धती लोकाभिमुख नसली तरी कायदाभिमुख आहे. लोकांसाठी वेगळं काही करण्याची त्यांची सतत धडपड असते. हे करत असताना ते कुणाचाही विचार करत नाही. त्यामुळे त्यांच्या डोक्यात जे येतं तेच करणं हीच त्यांची कार्यपद्धती आहे. याविषयी विचारणा केली की कायमच ते कायद्याची चौकट दाखवतात.मी कसा बरोबर आहे ते पटवून देतात. लोकांचा पाठिंबा असला तरी, ते लोकाभिमूख नाहीत. नियम आणि लोकहित याला ते सगळ्यात आधी प्राधान्य देतात.

सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना एकदा ट्रकचा अपघात होऊन अनेक वारकरी दगावले. तेव्हा जमाव चिडला होता. काही केल्या ऐकेना. तेव्हा मुंढेनी गोळीबाराचे आदेश दिले आणि जमाव पांगला होता. सोलापूरचीही पाणी समस्या त्यांनी सोडवली. "

महापालिका दणाणून सोडल्या

नाशिक, नवी मुंबई आणि नागपूर महापालिका या तीन मोठ्या महापालिकांचं आयुक्तपद त्यांनी भूषवलं. नगरसेवकांशी आणि महापौरांशी भांडणं, नगरसेवकांना वाईट वागणूक, सत्ताधाऱ्यांशी कायम वाद, शिस्तीचे भोक्ते असल्यामुळे जिथे जातील तिथे आधी वेळेवर उपस्थितीची सक्ती करणे, दणादण निलंबनाची कारवाई करणे, एकाधिकारशाही आणि आढ्यताखोर वर्तंन ही नेहमीची वैशिष्ट्यं.

मुंढे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना सुधाकर सोनावणे महापौर होते. मुंढेच्या कारकिर्दीविषयी बोलताना ते सांगतात, "तुकाराम मुंढे अधिकारी म्हणून प्रामाणिक आहेत. पण 135 कोटी लोकांनी लोकप्रतिनिधी निवडून दिलेले असतात. त्यामुळे त्यांचं महत्त्व जास्त आहे.तुकाराम मुंढेंना लोकशाही मान्यच नाही. त्यांना असं वाटतं की सगळे लोकप्रतिनिधी भ्रष्ट असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामाला कधीही प्राधान्य देत नाही. स्वत:च जनतेत जातात. मग निवडणुकांची गरज काय? मनाला येईल तशी दुकानं सील केली. लोकशाहीत लोकप्रतिनिधींना मान्यताच द्यायची नाही अशी त्यांची भूमिका आहे. एखादी व्यक्ती सातत्याने 25 वर्षं निवडून येत असेल तर तो उगाच निवडून येत नाही ना?"

सोनावणे महापौर असताना ऑटोमॅटिक मीटर, वॉक विथ कमिश्नर या मुद्दयांवरून त्यांचे अनेक खटके उडाले. मुंढेंवर अविश्वास प्रस्तावही आणण्यात आला होता. नगरसेवक दोषी असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, फक्त आरोप करू नका अशी भूमिका सोनावणे यांनी त्यावेळेला घेतली होती. मुंढेंवर अविश्वास प्रस्तावही दाखल करण्यात आला होता. तो मंजूरही झाला होता.

हाच कित्ता त्यांनी नाशिक महाालिकेतही गिरवला. कामात दिरंगाई झाली की तातडीने निलंबन, नगरसेवकांशी असहकार यामुळे मुंढेंची नाशिक महापालिकेतली कारकीर्द गाजली नसती तरच नवल.

'स्वत:च्या प्रेमात पडलेला अधिकारी'

नवी मुंबईतल्या वादळी कारकिर्दीनंतर आणि नाशिक महापालिका आयुक्तपदाच्या आधी त्यांची

PMPML (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd) च्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली. पुण्यासारख्या अजस्त्र शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न कायम चर्चेत असतो. या पदावर असताना पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांबरोबर समन्वय साधायचा असतो.तिथेही त्यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आणि असंतोष ओढवून घेतला.

सकाळच्या पुणे आवृत्तीचे वृत्तसंपादक सुनील माळी सांगतात, " मुंढे पीएमपीएमलचे व्यवस्थापकीय संचालक असताना वाहतूक व्यवस्था अजिबात सुधारली नाही. जनतेला असे स्वच्छ अधिकारी एकदम सेलिब्रिटी वाटतात. मुंढे स्वत:च्या अतिशय प्रेमात आहेत. मीच तेवढा स्वच्छ आणि इतर सगळे कसे भ्रष्टाचारी आहेत अशी एक धारणा त्यांची आहे.

त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका नसते, ते पैसा खात नाहीत, त्यांना कामही करायचं नसतं. पण खरं सांगायचं तर ते व्यवस्थेतही रुळत नाही आणि कामही करत नाही. ते फक्त माध्यमांना बातम्या देऊ शकतात.लोकांच्या मनात व्यवस्थेविरोधात राग निर्माण करू शकतात. जे सकारात्मक काम करून पुढे जायचं आहे असं काम ही मंडळी करू शकत नाही."

पीएमपीएमल मध्येही त्यांना काम करता आलं असतं. पण त्यांनी काहीही केलं नाही. त्यांच्या हातून सुधारणात्मक काम काहीही झालं नाही. आपण काय केलं, कोणाला शिस्त लावली, ही कामं करणं आणि ते प्रसारमाध्यमात नेणं हेच त्यांचं काम आहेत.मुंढेही त्याला अपवाद नाही असं माळी सांगतात.

कोरोनाचा काळ आणि नागपूर

शिवसेना- काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आल्यावर तुकाराम मुंढेंची नागपूर महापालिका आयुक्त म्हणून बदली झाली. नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यांना शह देण्यासाठी ही बदली केली अशी चर्चा होती.

त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुंढे यांच्यामुळे नागपुरात कोरोना आटोक्यात राहिला अशी धारणा माध्यमांत आणि समाजमाध्यमात करण्यात आली.कोरोनाच्या काळात Institutional Quarantine सारख्या उपाययोजनेमुळे कोरोना बराच नियंत्रणात राहिला असं म्हणतात.

ग्रीन झोन होऊनही रेड झोन ठेवण्याची सक्ती केली. राज्य आणि केंद्र सरकारची अनेक मार्गदर्शक तत्त्वं त्यांनी गुंडाळून त्यांना मिळालेल्या अधिकारांचा या काळात पुरेपूर वापर केला. मात्र हे यश न पचल्यामुळेच लोकप्रतिनिधी मुंढेंवर डूख धरून आहे असं नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार मंडळींचं म्हणणं आहे.

तुकाराम मुंढे

फोटो स्रोत, NMC FACEBOOK

फोटो कॅप्शन, नागपूरमधील दृश्य

मात्र प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम लोकप्रतिनिधींनी केलं, असं नागपूर महापालिकेचे सभागृह नेते दयाशंकर तिवारी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

काही दिवसांपूर्वी नागपूर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनचं CEOपद कोणी घ्यावं, यावरून महापौर संदीप जोशी आणि मुंढे यांच्यात वाद झाला होता. या प्रकरणावरून वाद विकोपाला गेल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे मुंढेंविरोधात तक्रार केली होती.

मुंढे यांनी बेकायदेशीरपणे आणि असंवैधानिकपणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रं हाती घेतल्याचं तक्रारींमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

त्यानंतर अखेर 10 जुलैला झालेल्या नागपूर स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत मुंढेंकडून नागपूर स्मार्ट सिटी CEOपदाचा पदभार काढून घेण्यात आला. महेश मोरोने यांच्याकडे नागपूर स्मार्ट सिटीचं प्रभारी CEOपद देण्यात आलं.

'कामाचा लेखाजोखाही मांडा'

तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीबद्दल इतर सनदी अधिकाऱ्यांना काय वाटतं हेही आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मुंढे यांच्याबदद्ल बोलताना निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे म्हणाले, "एखाद्या अधिकाऱ्याने जनसामान्यांसाठी किती काम केलं याचाही लेखाजोखा मांडला पाहिजे. एखाद्या कामामुळे जनतेला किती फायदा झाला, ती परंपरा टिकून राहिली का? हेही सगळं जनतेसमोर आलं पाहिजे. राजकारण्यांबरोबर काम करताना ही लोकशाही आहे आणि ती आपल्याला इतक्या सहजी मिळालेली नाही याचं भान ठेवलं पाहिजे."

मुंढे किंवा अशा तत्सम अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतही झगडे यांनी भाष्य केलं. अधिकाऱ्यांची बदली हा कायमच वादाचा विषय आहे. पण ही बदली करताना नियम पाळले गेलेत का? एखाद्या अधिकाऱ्याची तीन वर्षं बदली करू नये असा नियम आहे. त्याआधी करायची झाल्यास त्याची ठोस कारणं देणं गरजेचं असतं. तुकाराम मुंढेंच्या अनेक बदल्या झाल्यात. पण त्या करताना नियम पाळले गेले होते का याचा विचार राजकारण्यांही करायला हवा असं ते म्हणतात.

तुकाराम मुंढे या आरोपांवर काय म्हणतात?

मध्यंतरी तुकाराम मुंढेचा हसतानांचा एक फोटो व्हायरल झाला होता. असं हसू त्यांच्या चेहऱ्यावर दुर्मिळ आहे. कायम करारी मुद्रेने विरोधकांना प्रत्युत्तर देणाऱ्या मुंढेनी त्यांच्याविषयी असलेल्या तक्रारींनाही उत्तरं दिली आहेत.

तुकाराम मुंढे

फोटो स्रोत, NMC FACEBOOK

फोटो कॅप्शन, तुकाराम मुंढे

तुम्ही लोकप्रतिनिधींचा सन्मान करत नाही या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले, "मी एका संस्थात्मक रचनेचा भाग आहे, अधिकारी आहे. त्याचा मान राखणं माझी जबाबदारी आहे, आणि जसा लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा मान आहे तसाच माझाही आहे. मी आतापर्यंत कोणता अपशब्द वापरला, तुम्ही सांगा. त्याउलट, मी म्हणजे तुकाराम मुंढे हा तुकाराम महाराजांच्या नावावर कलंक आहे, असं हे नगरसेवक म्हणतात तेव्हा महापौरांनी त्यावर आक्षेप का घेतला नाही?"

सातत्याने होणाऱ्या बदल्यांवर ते म्हणतात, "माझ्या बदल्या काही माझ्या हातात नसतात. जे करतात त्यांना हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. मी माझं काम करतो, जो रोडमॅप आखतो, त्यानुसार 3 महिन्यांत यंत्रणा सुधारण्याचा माझा बेत असतो. मी 100 टक्के यशस्वी होतोच, असं नाही. माझा कायमच प्रयत्न असतो काम करायचा."

नागपुरात गेल्या काही दिवसांपूर्वी ते आमसभेतून उठून गेले होते. काल पुन्हा ते सभेला उपस्थित राहिले. "एका सभेत माझ्यावर अतिशय खालच्या पातळीची टीका केल्यानंतरसुद्धा मी तुमच्या आमसभेला हजर राहतो, याला तुम्ही सॉफ्ट स्टँड नाही का म्हणणार? मी काही आधीच्या अधिकाऱ्यांनी केलं, तेच केलं पाहिजे असं नाही ना. मी नियम-कायदे पाळणारा माणूस आहे, तुम्ही म्हणाल तर मी परिस्थिती समजून घेईन, पण जो कायदा त्याच्याशी अजिबात तडजोड करणार नाही." असं सडेतोड उत्तर ते लोकप्रतिनिधींना देतात.

हिरो, हिरो आणि फक्त हिरो

मीडिया आणि सोशल मीडियावर त्यांची प्रतिमा हिरो अशी झाली आहे. ती जपण्याचाही ते पुरेपूर प्रयत्न करतात. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी केलेलं प्रत्येक काम फेसबुक पेजच्या माध्यमातून पोहोचवलं. सोशल मीडियावर लोक त्यांना हिरो मानतात. त्यांच्या कामाची स्तुती करतात. तेव्हा 15 वर्षांच्या कार्यकाळात स्वच्छ, कडक शिस्तीचा अधिकारी ही प्रतिमा निर्माण करण्यात ते चांगलेच यशस्वी ठरले आहेत.

2008 मध्ये जेव्हा ते नागपूर मध्ये होते तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांना झिडकारलं होतं. त्यामुळे त्यांच्या कामाची फारशी दखल प्रसारमाध्यमांनी घेतली नव्हती. ही चूक त्यांनी नंतर सुधारली. मात्र प्रसारमाध्यमांच्या अतीजवळ जाऊ असा अनाहूत सल्लाही त्यांना अनेकांनी दिला आहे.

"हटवादीपणा आणि हेकेखोरपणामुळे त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेतली जात नाही. म्हणून ते ठसवायला ते प्रसारमाध्यमांचा आधार घेतात. ते बातम्या पुरवतात म्हणून प्रसारमाध्यमांच्या ते गळ्यातील ताईत आहेत. त्याचवेळी व्हिलन आहेत अशी प्रतिमा निर्माण करण्यात राजकारणी कायम आघाडीवर असतात. त्यामुळे एकूणच मुंढेंनी हटवादी न होता संवादी व्हावं", असं मत महाराष्ट्र टाइम्सच्या नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित यांना वाटतं.

तुकाराम मुंढे

फोटो स्रोत, NMC FACEBOOK

फोटो कॅप्शन, तुकाराम मुंढे जनतेशी संवाद साधताना

त्यांच्या एकूण कार्यपद्धतीचा अभ्यास केल्यावर असं कळतं की नियमांवर बोट ठेवून काम करतात ही चांगली गोष्ट आहे. पण राजकारण्यांना ते अत्यंत वाईट वागणूक देतात. त्यामुळे चांगलं काम करूनही त्यांची लगेच बदली होते. मग चांगलं काम अपूर्ण राहतं. मग त्यांनी लावलेल्या शिस्तीचं, त्यांनी घेतलेल्या कष्टाचं काय हे प्रश्न अनुत्तरित राहतात

"तुम्ही बस ड्रायव्हर आहात असं समजा, एखाद्या वेळी तुमचं डोकं सटकलं म्हणून तुम्ही बस दरीत वळवत नाही. किंबहुना संकटकाळात बसमधील प्रवासी कसे वाचतील यावर लक्ष देता की नाही" असा प्रश्न सुधाकर सोनावणे विचारतात आणि त्यांना लोकाभिमुख होण्याचा सल्ला देतात.

आतापर्यंतच्या सगळ्या पोस्टिंग समाधानकारक असल्याचं तुकाराम मुंढे सांगतात. सोलापूरमध्ये त्यांनी सगळ्यात जास्त काळ घालवला तिथे त्यांनी बरीच कामं केली. नवी मुंबई, नाशिक या शहरात बरीच कामं केली असल्याचं ते सांगतात.

"असं कुठलं एक काम सर्वात चांगलं झालं, असं काही नाही. जे करायचं ते 100 percent चांगलं करायचं असा माझा प्रयत्न असतो." मुंढे सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)