कोरोना नागपूर : तुकाराम मुंढे यांच्या विरोधात नितीन गडकरी यांची केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार

फोटो स्रोत, Getty Images
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात महापौर, सत्ताधारी आणि विरोधक, असा सामना रंगला असताना या वादात आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील उडी घेतली आहे.
नितीन गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्य मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
मुंढे यांनी बेकायदेशीरपणे आणि असंवैधानिकपणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रं हाती घेतल्याचं तक्रारींमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
नागपूर महापालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारनं फेब्रुवारी महिन्यात नियुक्ती केली. तुकाराम मुंढेंनी कार्यभार हाती घेतल्यापासून अनेकदा त्यांचे आणि महापौर संदीप जोशी यांच्यामधील मतभेद समोर आले आहेत.

पण आता या दोघांमधील वाद इतका विकोपाला पोहोचलाय की, तुकाराम मुंढे यांच्याविरोधात संदीप जोशी यांनी नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
'नागपूर महानगर स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे' सीईओ म्हणून तुकाराम मुंढे यांनी खाजगी कंत्राटदारांना फायदा होईल यासाठी दस्ताएवजांमध्ये फेरफार केली, असा आरोप त्यांनी केला आहे.
हे झालं आताचं प्रकरण. पण या दोघांमध्ये नेमके का आणि कशावरून मतभेद, वाद आहेत, हे समजून घ्यायचा प्रयत्न आपण आता करणार आहोत.
वादाला नेमकी सुरुवात कधी?
तुकाराम मुंढे यांची फेब्रुवारी महिन्यात नागपूरचे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती झाली.
त्याचवेळी आता राज्य सरकारकडे थकीत असलेलं अनुदानही पाठवा, असं महापौर संदीप जोशी यांनी म्हटलं होतं. तसंच आधीचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची कामगरीसुद्धा उत्कृष्ट होती, असंही ते म्हणाले होते.
तुकाराम मुंढे जेव्हा नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून शहरात आले, तेव्हापासूनच या वादाला सुरुवात झाली, असं मत लोकमतचे नागपूर प्रतिनिधी गणेश हूड व्यक्त करतात.
ते सांगतात, "महापालिकेच्या स्थायी समितीनं जवळपास 3100 कोटी रुपयांचं बजेट तयार केलं होतं, तर तुकाराम मुंडेंनी जवळपास 2500 कोटी रुपयांचं बजेट तयार केलं होतं. सध्या जी कामं गरजेची आहेत तीच प्राधान्यानं करावीत, असं तुकाराम मुंढेंचं मत होतं. त्यामुळे मग या दोन्ही बजेटमध्ये जवळपास 600 कोटी रुपयांचा फरक राहिला. पण, मग महापालिकेच्या स्थायी समितीनं मंजूर केलेली अनेक कामं यामुळे लांबणीवर पडली. इथूनच मुंढे आणि महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांमधील वादास सुरुवात झाली."
पुढे हा वाद असाच सुरू राहिला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
"यातच दर महिन्याला होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा होत नव्हती. महापालिकेची सभा मुंढे यांनी रद्द केली. यानंतर पुन्हा एप्रिल महिन्यात मुंडे यांनी सभेस परवानगी नाकारली. पण, शासनाचे आदेश होते की, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सभा घेता येऊ शकते. यावर मुंडेंनी पुन्हा शासनाकडे अभिप्राय मागितला आणि मग त्यांना सभा घ्यावी लागली," गणेश हूड पुढे सांगतात.
केटी रुग्णालय प्रकरण काय?
हा वाद असाच सुरू असताना शहरात कोव्हिड -19च्या रुग्णांसाठी स्वतंत्र हॉस्टिपल असावं आणि महापालिकेची 5 हॉस्पिटल्स हे कोव्हिड- 19 साठी हस्तांतरित करण्याचा निर्णय मुंढे यांनी घेतला.
हे सर्व काम महापालिकेकडून सुरू असताना नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची टीका मुंढे यांच्यावर होत होती. पण, लॉकडाऊन आणि कोरोनाची स्थिती लक्षात घेता आपल्याला लोकांच्या आरोग्याची चिंता असल्यानं योग्य तेच करत असल्याचं मुंढे सांगत होते.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

दरम्यान, नागपूरातील केटी नगर येथील महापालिकेच्या रुग्णालयाशेजारील एका इमारतीत कोव्हिड-19चं हॉस्पिटल उभारण्यासाठी आयुक्तांनी कारवाई सुरू केली. पण, या जागेचं आरक्षण हटवण्यात आलं आहे आणि या ठिकाणी शॉपिंग मॉलसाठी जागा असल्याचं नगरसेवकांनी सांगितलं आणि या निर्णयाला विरोध केला.
शनिवारी (20 जून) आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत याच केटी नगर परिसरातील जागेवरील कोव्हिड-19 हॉस्टिपलसाठी आयुक्तांनी आरक्षण का हटवले, यावरून भाजपचे नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी पाँईट आफ इन्फर्मेशन अंतर्गत मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर तुकाराम मुंढे सभेतून निघून गेले.
सभेत काय घडलं ?
शनिवारी (20 जून) झालेल्या सभेत नेमकं काय घडलं, याविषयी तुकाराम मुंडे आणि संदीप जोशी या दोघांनीही माध्यमांसमोर आपापली बाजू मांडली.
तुकाराम मुंढेंच्या मते, "मी सभेतून निघून नाही गेलो, तर सभात्याग केला. सभेदरम्यान स्थानिक प्रश्न सोडवण्याबद्दल अधिकारी उत्तर देत असताना त्यांचं कुणी ऐकेना. मग मी उत्तर द्यायला सुरुवात केली असताना नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी उठून 'पाँइंट ऑफ इन्फर्मेशन'चा मुद्दा काढला आणि चढ्या आवाजात बोलायला सुरुवात केली. त्यामुळे मग मी महापौरांनी म्हटलं की, हे असंच सुरू राहिलं, तर मी सभेत राहणार नाही. त्यानंतर परत दुसरे नगरसेवक बोलायला लागले. परत वैयक्तिक टीका करू लागले, तुमचं नाव तुकाराम आहे, तुकाराम संत होते, तुम्ही त्या नावाला कलंक आहात. त्यानंतर मात्र मी सभात्याग केला."

फोटो स्रोत, ANI
"सभागृहात नियमांचं काटोकोरपणे पालन करून घेणं हे महापौरांचं काम आहे. अधिकाऱ्यांची मुस्कटदाबी चालणार नाही, त्यांना उत्तरं देऊ दिली जात नसतील, तर हे चालणार नाही, असं मी पहिलेही महापौरांनांही सांगितलं होतं. पण त्यांनी काहीच केलं नाही. उलट महापौरांनी मला रविवारी (21 जून) पत्र दिलं आणि त्यात ते म्हटलं की, आयुक्तांनी सभात्याग करणं हा सभागृहाचा कलंक आहे, पण ज्यावेळी नगरसेवक मला कलंक म्हणत होते, त्यावेळी तुम्ही सदस्यांना का थांबवलं नाही. महापौरांचं बाहेर वागणं आणि आत वागणं हे दुटप्पी आहे."
केटी नगरमधील कोव्हिड केअर सेंटरविषयी माहिती देताना ते म्हणाले, "मी कोणतही रिझर्व्हेशन चेंज केलेलं नाही. आपण आवश्यक त्या ठिकाणी कोव्हिड केअर सेंटर स्थापन करू शकतो, त्या बाजूला PHC आहे, त्या बिल्डिंगमध्ये कोव्हिड केअर सेंटर स्थापन केलेलं आहे. कमर्शियल आणि रेसिडेन्शिअल बिल्डिंगमध्ये कोव्हिड केअर सेंटर स्थापन करता येत का, तर त्याचं उत्तर 'हो' असं आहे."
महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढेंना उत्तर देताना म्हटलं, "त्या ठिकाणी PHC आहे आणि त्याच ठिकाणी आम्ही हॉस्पिटल करतोय, असं आयुक्तांनी म्हटलं. त्यावर दयाशंकर तिवारींनी पॉइंट ऑफ इन्फरमेशन घेतलं आणि म्हटलं की मी त्या ठिकाणी जाऊन आलो आहे. मी तुकाराम मुंढेंना आवाहन करतो की, त्याठिकाणी मुंढेंनी यावं आणि पाहावं की, PHC रस्त्याच्या बाजूला आहे. मध्ये रस्ता आहे आणि नंतर हॉस्पिटल आहे. त्यावर त्यांच्या अधिकाऱ्यानं नगरसंचालकानं स्पष्ट सांगितलं, की रिझर्व्हेशन चेंज न करता त्याठिकाणी काम केलं. त्यानंतर मुंढे डिस्टर्ब झाले, आपली चूक कबुली केली जात आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. "
महापौर दुटप्पी आहेत, या तुकाराम मुंढेंच्या आरोपावर ते म्हणाले, "चार महिन्यांमध्ये तुकाराम मुंढेंनी आयुक्तांच्या फोनला साधं उत्तरं दिलं नाही, त्यावेळी नाही वाटला दुटप्पीपणा. महापालिकेतील छोटे छोटे निर्णय महापौर-उपमहापौर यांना कळवायला पाहिजे, हे कायद्यात लिहिलंय. ते मागचे दोन महिने कळवलं नाही, त्यावेळी नाही वाटला दुटप्पीपणा. तुकाराम मुंढे एवढं बोलल्यावरही आम्ही त्यांना विनंती करतो की, जनेतच्या प्रश्नांसाठी एकत्र येऊया."
"तुम्ही जर महापौरांना अमुक माहिती दिली, तर याद राखा, मी तुकाराम मुंडे आहे," असं ते अधिकाऱ्यांना सांगतात आणि माझ्यावर मुस्कटदाबीचे आरोप करतात, असंही जोशी पुढे म्हणाले.
(प्रवीण मुधोळकर यांनी दिलेल्या इनपुटसह)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








