कोरोना नागपूर : तुकाराम मुंढे आणि महापौर संदीप जोशी यांच्यात कशावरून तणाव?

बंदोबस्त

फोटो स्रोत, ANI

जगात, देशभरात आणि अगदी महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढतच आहेत. त्याबाबत केंद्र सरकार, राज्य सरकारं आणि स्थानिक स्वराज्य संस्था सातत्याने काम करत असतानाच वाद किंवा मतभेद होणं साहजिक आहेच. जरा राजकारणही होताना दिसत आहे.

अशीच काहीशी परिस्थिती आता राज्याची उपराजधानी नागपुरातसुद्धा दिसतेय, जिथे कोरोनाबाधितांचा आकडा शंभरला टेकतोय आणि या आकडा प्रशासनाच्या चुकीमुळे वाढतोय, असा आरोप नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी एबीपी माझाशी बोलताना केलाय.

मात्र आपण सारंकाही केंद्र सरकार आणि आरोग्य विभागाच्या गाईडलाइन्सनुसार आणि डिस्टन्सिंगचे संपूर्ण नॉर्म्स पाळूनच करत असल्याचं नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचं म्हणणं आहे.

बीबीसी मराठीच्या गुलशनकुमार वनकर यांच्याशी साधलेल्या संवादात त्यांनी नागपूरची कोरोना प्रादुर्भावाबाबतची तयारी, शहरात लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि कोरोनामुक्त नागपूर कसं होईल, अशा विविध प्रश्नांवर चर्चा केली.

पाहा ही संपादित मुलाखत इथे-

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

या मुलाखतीचंच हे संपादित शब्दांकन -

महापौर संदीप जोशी यांनी आरोप केला आहे की नागपुरातला आकडा काही कमी होताना दिसत नाहीये आणि त्यासाठी त्यांनी प्रशासनाला जबाबदार धरलंय. काय नेमका वाद आहे?

त्यांनी तसं स्टेटमेंट का केलं, मला माहिती नाहीये. पण हे एक निश्चित सांगू शकतो, की आपण राज्य शासनाच्या, ICMRच्या आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या गाईडलाईन्सनुसारच आपण काम करत आहोत. आणि म्हणून त्या दृष्टीकोनातून आपण क्वारंटाईन का करतोय, तर त्यामुळे रोग कमीत कमी लोकांपर्यंत पोहोचावा.

आता त्या ठिकाणी आपण सर्वसाधारणपणे प्रत्येकाला वैयक्तिक रूम देतो आणि एकापेक्षा जास्त लोकांना एकाच रूममध्ये ठेवण्याची वेळ येत असेल तर आपण पाहतो की दोन कॉटमध्ये एक मीटरचं अंतर असेल.

महापौर संदीप जोशी

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, महापौर संदीप जोशी

मग लोकप्रतिनिधींची असहमती कुठे आहे? त्यांचा रोष काय आहे नेमका? जे नगरसेवक आहेत, त्यांना आपण एकत्र घेऊन काम करत नाही आहोत, असं आपल्याला वाटतं का?

याच्यामध्ये पुरेसा संवाद आहे. कालच (सोमवारी २० एप्रिल) एक मीटिंग झाली, पाण्याच्या संदर्भातही मीटिंग झाली आहे. विभागीय आयुक्त असो वा मी स्वतः अनेक मीटिंग्स घेतो आहे.

कोरोना
लाईन

यावेळी Epidemic Act नुसार कारवाई करणं आवश्यक आहे, आणि ती आपण करत आहोत. त्यासाठी वेगवेगळी पावलं जी उचण्याची आहेत, ती आधीच नमूद करून दिलेली आहेत, त्यानुसारच आम्ही काम करत आहोत. यात आम्ही वेगवेगळ्या कमिटी स्थापन केलेल्या आहेत, राज्य प्रशासनाशी संवाद साधण्यासाठी.

त्यामुळे आमच्या वतीने पूर्ण संवाद सुरू आहे, सहकार्य सुरू आहे.

पण महापौरांनी तर मंगळवारी (21 एप्रिल) असा आरोप केलेला आहे, त्यामुळे तुम्ही यापुढे संवाद वाढवण्यासाठी काही पावलं उचलणार का?

निश्चितच आपण सहकार्य आणि संवाद करण्याचा नेहमीच प्रयत्न करत आलो आहोत. तो पुढेही करू. यात माझ्याकडून, माझ्या टीमकडून विसंवाद राहणार नाही. सर्व गोष्टी वेळेच्या वेळी सांगितल्या जात आहेत. त्याच्यावर सर्वांचंच सहकार्य अपेक्षित आहे.

याबाबत बैठकाही झाल्या आहेत आणि कामंही व्यवस्थित होत आहेत. गरज फक्त एवढीच आहे, की प्रत्येकाने स्टेटमेंट करताना पूर्ण माहिती घेऊनच आणि जबाबदारीने केलं पाहिजे, जेणेकरून गैरसमज पसरणार नाही.

तुकाराम मुंढे

फोटो स्रोत, Twitter / @Nmc

तुम्ही तुमच्या टीमला यादरम्यान कसं प्रोत्साहित करत आहात? तुमची मध्यंतरी एक क्लिप व्हायरल झाली होती, ज्यात तुम्ही आरोग्य कर्मचाऱ्यांना बजावून सांगत होता?

खरंतर ती आमच्या वॉररूममधल्या मीटिंगची होती. मी सुमारे 45 मिनिट बोललो, पण त्यापैकी फक्त ती साडेसात मिनिटांची क्लिप कशी बाहेर आली, माहिती नाही.

प्रयत्न हाच आहे की प्रत्येकाने आपलं काम न घाबरता आणि निष्ठेने करावं. मी प्रत्येकाला म्हणतोय की तुम्ही आयुक्त म्हणूनच जबाबदारी घ्या.

कामं करा. रिस्क घ्या. काही वाईट झालं, अपयश आलं तर मला दोष द्या. चांगलं झालं तर तुम्ही श्रेय घ्या. पण कामं व्हायला पाहिजे.

नागपुरात लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत काय हालचाली सुरू होऊ शकतात? काही उद्योग सुरू होणार का?

कंटेनमेंट झोन

फोटो स्रोत, ANI

नागपुरात कोरोना आऊटब्रेक किंवा उद्रेक झालेला आहे, त्यामुळे आपण उद्योगधंदे सुरू करू शकत नाही. पण नागपूर शहरालगतच्या भागात बरेच उद्योग आहेत, जे नागपूरच्या बाहेर MIDC भागात आहेत. त्यांच्यात काम सुरू करण्यासाठी पुरेशी तयारी जर कारखानदार करणार असतील, म्हणजे सर्व कामगारांना एकाच ठिकाणी किंवा कारखान्याच्या जवळपासच ठेवणे, जेणेकरून त्यांचं रोजरोज शहरात येणं होणार नाही.

त्यांना फक्त एकदाच परवानगी देण्यात येईल, त्याशिवाय Annexure B मध्ये काही अटी आहेत, त्या पूर्ण करून जर आमच्याकडे काही अर्ज आले तर आम्ही विचार करू.

शहरात असे कुठलेही कारखाने सुरू होणार नाही. जर कुठला विशेष अर्ज आला, तर आम्ही आधी जाऊन चौकशी करू की तिथे योग्य पद्धतीनो सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातंय, सॅनिटायझेशन केलं जातंय, कर्मचाऱ्यांचं-कामगारांचं नियमितपणे चेकअप केलं जातंय, त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जात आहे, तरच आम्ही त्याबद्दल विचार करू. कारण आमच्यासाठी 30 लाख ही लोकसंख्या महत्त्वाची आहे. आर्थिक उद्योग महत्त्वाचे आहेच, पण या व्हायरसची साखळी तोडणं सध्या जास्त महत्त्वाचं आहे.

तुमच्या अंदाजानुसार कोरोनामुक्त नागपूर होण्यासाठी किती वेळ लागेल? आणि ते कसं होईल?

कोरोनामुक्त नागपूर करण्यासाठी सर्व नागरिकांनी यासाठी सहकार्य करणं अपेक्षित आहे. ते लॉकडाऊन किती चांगल्या पद्धतीने पाळतात, यावर ते अवलंबून आहे. त्यांनी जर लॉकडाऊन चांगल्या प्रकारे पाळला तर आपल्याला लवकरात लवकर कोरोनामुक्त होता येईल आणि आपल्याकडे लॉकडाऊन उठवता येईल.

बंदोबस्त

फोटो स्रोत, ANI

त्यासाठी आपण सध्या जे रेड झोनमध्ये आहोत, ते आधी ऑरेंज झोनमध्ये जावं लागेल. म्हणजेच आपल्या शहरामध्ये एकही नवीन रुग्ण सतत 14 दिवस जर राहिला नाही तर आपण रेडमधून बाहेर पडू आणि ऑरेंजमध्ये जाऊ.

मग शेवटचा पॉझिटिव्ह रुग्ण आल्यापासून 28 दिवस जर आपल्याकडे एकही नवा रुग्ण आढळला नाही तर आपण ग्रीन झोनमध्ये जाऊन लॉकडाऊनमधून बाहेर पडू शकू.

गरज आहे की लॉकडाऊन काटेकोरपणे पाळण्याची, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची आणि व्हायरसची साखळी आहे ती तोडण्याची. म्हणून लॉकडाऊन किती दिवस चालेल हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे.

नागपुरात केसेस सातत्याने वाढत आहेत. पण तुमची टीम प्रयत्न करत आहे, पण तुम्ही समाधानी आहात का?

आमची संपूर्ण टीम मिळून नागपूरच्या तीस लाख लोकसंख्येला केंद्रबिंदू म्हणून काम करत आहोत. अगदी भारतात आणि महाराष्ट्रात कोरोनाचे पहिले रुग्ण सापडले तेव्हापासूनच याचं नियोजन आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी याबाबत आम्ही व्यवस्थित योजना आखून काम करत आहोत.

आपला सुरुवातीचा भर हा परदेशातून आलेल्या प्रवाशांवरच होता. त्यांचं आपण एअरपोर्टवरच स्क्रीनिंग करत होतो, ज्यांच्यात लक्षणं दिसत होती, त्यांना आपण इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केलं (म्हणजे सरकारी व्यवस्थेत विलगीकरण) आणि ज्यांच्यात लक्षणं दिसत नव्हती त्यांना होम क्वारंटाईन केलं. त्यामधून पहिले चार रुग्ण आढळले होते. त्यांच्यावर आपण पूर्ण उपचार केले आणि ते बरे होऊन आपल्या घरी गेले.

रुग्ण

फोटो स्रोत, ANI

त्यानंतर आपल्याकडे दुसरे दोन रुग्ण आढळले - एक 25 मार्च आणि दुसरा 27-28 मार्चच्या सुमारास. दोघेही दिल्लीहून परत आले होते. त्यानंतर त्यांच्यात लक्षणं दिसू लागल्यानंतर आमच्या टीमने त्यांना ट्रेस केलं, टेस्ट केली आणि नंतर त्यांना क्वारंटाईन केलं. मग त्यांचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं.

त्यांच्या संपर्कात आलेले सर्व कॉन्टॅक्ट्स आम्ही इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केले होते, आणि त्यांच्यापैकी जवळजवळ 12 लोक बाधित झाले होते. त्यांच्यापैकी दोन लहान मुली वगळता इतर सर्वांना घरी सोडण्यात आलं आहे. या दोन मुलीसुद्धा आता रिकव्हर होत आहेत.

सध्या नागपुरात काय स्थिती आहे नेमकी?

घरपोच सेवा

फोटो स्रोत, ANI

(21 एप्रिलच्या आकडेवारीनुसार) सध्या आपल्याकडे 70 अॅक्टिव्ह केसेसे आहेत, ज्यापैकी 45 रुग्ण हे एकाच पेशंटच्या संपर्कात आल्यामुळे निर्माण झाले आहेत. त्या रुग्णांचा मृत्यू झाला. पूर्व नागपुरातल्या सतरंजीपुरा भागातल्या या रुग्णाला टीबी होता आणि त्यांचं कुटुंब फार मोठं आहे. त्यांची मुलं, नातवंडं असे एकूण 21 व्यक्ती आहेत. यांच्यापैकी 15 पॉझिटिव्ह आहेत, 1 निगेटिव्ह आहे तर उर्वरित लोकांचे निकाल प्रलंबित आहेत.

काही केसेस अशाही होत्या, ज्या आधी निगेटिव्ह होत्या आणि नंतर पॉझिटिव्ह आढळल्या आहेत, त्यामुळे बहुतांश रुग्ण हे या एका रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळेच तयार झाले आहेत. आपण तो परिसर कंटेन केलं आहे, सर्व लोकांचे contact tracing (म्हणजेच ते कुणाकुणाच्या संपर्कात आले असावेत) हे ओळखून मग त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केलं आहे, होम क्वारंटाईन नव्हे. त्यामुळेच जरी नागपुरातले आकडे वाढत असले तरी हे त्याच हॉटस्पॉटमधलेच रुग्ण आहे, त्याच्याबाहेर तो पसरू दिला नाहीय, ही त्यातली समाधानाची बाब आहे.

तुमच्या टीमचं काम कसं सुरू आहे?

आम्ही काँटॅक्ट ट्रेसिंगसाठी सेटअप केलेल्या टीम्स प्रभावीपणे काम करत आहे. आपण आरोग्य व्यवस्थेत नऊ-दहा टीम्स स्थापन केल्या आहेत, ज्या ऑटो मोडवर अक्टिव्हेट होतात.

जेवण

फोटो स्रोत, Twitter / NMC

कुठल्याही एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला की आमची काँटॅक्ट ट्रेसिंगची टीम सक्रिय होते आणि ती टीम तीन ठिकाणी जाते - एक हॉस्पिटलला जाऊन त्या व्यक्तीकडून काँटेक्ट हिस्ट्री घेणे, दुसरी घरी जाऊन त्यांची माहिती घेते आणि तिसरी ते जिथे कुठे काम करतात किंवा त्यांच्या शेजारी.

हे एका बाजूला होत असतानाच आमच्या Rapid Reaction Teams प्रत्येक शहरातल्या 38 वॉर्डांमध्ये एक तयार असते. जसं एखादा रुग्ण बाधित आढळला तसं आम्ही त्याला पिकअप करून हॉस्पिटलमध्ये दाखल करतो. म्हणजे तीन ते चार तासांत त्यांचा स्वॉब घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू होतात, जेणेकरून त्यांच्यापासून इतर कुणाला पसरू नये.

याच दरम्यान, आणखी एक टीम जो बाधित रुग्ण आहे, त्याच्या आसपासचा कंटेनमेंट झोन ओळखणे, त्यातली घरं शोधणे आणि किती लोक धोक्यात येऊ शकतात, हे तपासण्याचं काम करते. आणि पुढच्या तीन-आठ तासांमध्ये बॅरिकेडिंग होतं आणि कटेंनमेंट झोन तयार होतात. त्यानंतर पुढचे 14 दिवस आम्ही त्या झोनमधल्या प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवतो.

जर कुणामध्ये कोरोनाची लक्षणं दिसत असतील तर आम्ही त्यांना लगेच उपचार देतो किंवा गरज असल्यास क्वारंटाऊन सेंटरमध्ये दाखल करतो.

पण मग तुम्ही म्हणाल की कंटेनमेंट झोन्सची संख्या पाच कशी झाली? तर सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा हे दोन हॉटस्पॉट आहेत, जिथे दिल्ली कनेक्शनवाले रुग्ण सापडले आहेत.

या बाधितांच्या घरी ज्यांचा मृत्यू झाला त्यांचे नातेवाईक कुठल्यातरी दुसऱ्या भागातून आले होते, त्यांच्या मृत्यूपूर्वी किंवा मृत्यूनंतर. आपण आता त्यांचे झोन्सही कंटेन केले आहेत आणि तिथेही आता पुरेशी दक्षता घेतली जात आहे.

यापूर्वी आपल्याकडे जे चार कंटेनमेंट झोन आढळले होते, त्यांच्यापैकी एकातही आता एकही संशयित रुग्ण नाही. लक्षणं कुणातही नाही, त्यामुळे आपण ते झोन बंद केले आहेत. सध्या जे कंटेनमेंट झोन आहेत, त्यातही अशाच प्रकारे काम सुरू आहे.

ट

फोटो स्रोत, ANI

आपण घरोघरी जाऊन जे सर्व्हे करतोय, त्यासाठी आपल्याकडे पुरेशी संसाधनं आहेत का? राज्य शासन किंवा केंद्र सरकारकडून पुरेसं साहित्य आहे का?

Absolutely. आपल्याकडे कुठल्याच गोष्टींची कमतरता नाही. हा सर्व्हे आहे, ज्यासाठी आपल्याला किट लागत नाही. आपल्या या पॅरामेडिकलची टीममध्ये आशा वर्कर आणि नोंद घेणारे निरीक्षक असतात. त्यात आपण काही प्रश्न विचारतो, जसं की त्यांना कुठला रोग आहे का, ज्यामुळे कोरोना झाल्यास मृत्यूचा धोका बळावू शकतो.

याशिवाय, आपण काही रॅपिड टेस्टिंग करत नाही आहोत, जर कुणात तशी लक्षणं दिसली की त्यांना तातडीने भरती केलं जातं.

पैशांच्या बाबतीतही आपण राज्य शासनाकडे मागणी केली आहे, आणि ती वेळोवेळी पूर्ण होते आहे. त्यामुळे कमतरता नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)