सुशांत सिंह राजपूत आणि नेपोटिझम : बॉलीवूडमध्ये गॉडफादरविना हे 10 कलाकार झाले यशस्वी

नवाजुद्दीन सिद्दीकी

फोटो स्रोत, NAwazuddin siddiqui instagram

    • Author, मधु पाल
    • Role, बीबीसी मराठीसाठी

बॉलीवूडमध्ये कोणत्याही गॉडफादरविना स्टार झालेले कलाकार तुम्हाला माहिती आहेत का?

बॉलीवूडमध्ये नेपोटिझमची सध्या जोरात चर्चा आहे. नेपोटिझम म्हणजे घराणेशाही. आपल्या आजूबाजूच्या, ओळखीच्या, नातलगांच्या फायद्यासाठी पक्षपाती भूमिका घेणं.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर दररोज नवी माहिती उजेडात येत आणि रोज नवे आरोप-प्रत्यारोप होत असल्याचं तुमच्या लक्षात येईल. या सगळ्या गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे हे सांगता येणार नाही मात्र सुशांतच्या जाण्यामुळे नेपोटिझमसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.

बॉलीवूडमध्ये अनेक स्टारकिड्सनी यश मिळवलं तर अनेक लोकांनी एखाद्या गॉडफादरच्या पुण्याईवर स्टार न होता कोट्यवधी लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे.

1) नवाजुद्दिन सिद्दिकी

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेतलेले नवाजुद्दिन हे सुशांत सिंह राजपूतप्रमाणे नेपोटिझमपासून कित्येक कोस दूर होते.उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात बुढाना हे त्यांचं गाव.

फिल्मी जगतातला त्यांचा प्रवास सतत आव्हानाचा आणि संघर्षमय होता. अभिनय क्षेत्रातील आपल्या आकांक्षांची पूर्ती करण्यासाठी नवाज दिल्लीला गेले आणि तिथं अभिनयाचे धडे घेतले.

त्यानंतर काही काळ नाटकांमध्येही काम केले. तिथं पुरेसे पैसे न मिळाल्याने त्यांना चौकदाराचंही काम करावं लागलं. घरासाठी भाड्याचे पैसे देण्याइतपतही त्यांच्याकडे पैसे नव्हते.

कोरोना
लाईन

पण त्यांच्यापेक्षा एका सीनियर मित्राने जेवण तयार करण्याच्या बोलीवर त्यांना घरी ठेवून घेतलं. नवाज यांना 1999 साली आमिर खान यांच्या सरफरोश सिनेमात पहिली संधी मिळाली. मात्र ती भूमिका अत्यंत लहान होती. त्यानंतर 2003 साली मुनाभाई एमबीबीएस सिनेमात एका चोराची लहानशी भूमिका मिळाली.

अशाच खडतर काळानंतर त्यांना 2207 साली अनुराग कश्यप यांच्या ब्लॅक फ्रायडे सिनेमात महत्त्वाची भूमिका मिळाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. आज नवाज अनेक मोठ्या सिनेमांमध्ये काम करताना दिसतात.

2) राजकुमार राव

बॉलीवूडच्या काही चांगल्या कलाकारांचं नाव घ्यायचं म्हटलं तर त्यात राजकुमार रावचं नाव घ्यावंच लागेल. बरेली की बर्फी, न्यूटन, स्त्री, काय पो छे अशा सिनेमांत त्यानं काम केलं. त्याचा जन्म हरियाणामधील गुरुग्राममध्ये झाला. दिल्लीमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मुंबईला आला. सुरुवातीला जेव्हा तो मुंबईत राहायचा तेव्हा त्याला 7000 रुपये घरभाडंही जास्त वाटायचं असं त्यान एका मुलाखतीत सांगितलं होतं. पैसे नसल्यामुळे त्याला अनेकदा उपाशीपोटी ऑडिशनला जावं लागायचं.

राजकुमार राव

फोटो स्रोत, Rajkummar rao instagram

2010 साली त्यानं लव सेक्स और धोका सिनेमातून करिअर सुरू केलं, आज त्याला एकूण 11 अवॉर्ड्स मिळाले आहेत.

3) पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी यांच्या खऱ्या आयुष्याची कहाणीसुद्धा एखाद्या सिनेमात शोभावी अशीच आहे. 2004 साली आलेल्या रन सिनेमात छोटीशी भूमिका करणारे पंकज आज अनेक मोठ्या सिनेमांत दिसून येतात.

त्यांच्यासाठी विशेष भूमिका तयार केल्या जातात. सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात त्यांना अनेक निर्मात्यांची दारं ठोठावावी लागली. त्यावेळेस त्यांना दारावरच तुम्हाला कोणत्या देवानं (गॉडफादर) पाठवलं आहे असं विचारलं जाई, तेव्हा ते बोट आभाळाकडे करून आकाशातल्या देवानं असं सांगायचे.

हे ऐकून त्यांना काही ठिकाणी आत सोडलं जाई तर काही ठिकाणी हाकलूनही लावलं जाई. बिहारमधलं बेलसांड हे पंकज यांचं गाव. ते सुरुवातीच्या काळात दिवसा नाटकात काम करायचे आणि रात्री हॉटेलात काम करायचे. सुपर 30, काला, स्त्री, अंग्रेजी मीडियम या सिनेमांबरोबरच त्यांनी सेक्रेड गेम, मिर्झापूर या वेबसीरिजमध्येही काम केलं आहे.

पंकज त्रिपाठी

फोटो स्रोत, facebook

4) मनोज वाजपेयी

बॉलीवूडमध्ये अनेक लोकांनी स्वबळावर यश आणि लोकांचं प्रेमही मिळवलं आहे. त्या लोकांमध्ये मनोज वाजपेयी यांचा समावेश होतो.

वाजपेयी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचे असे प्रेक्षक-चाहते तयार केले आहेत. मात्र त्यांचाही प्रवास सोपा नव्हता.

बिहारमधलं नरकटियागंज हे त्यांचं गाव आहे. दूरदर्शनवरच्या स्वाभिमान मालिकेतून त्यंनी करिअरला सुरुवात केली. 1994 साली शेखर कपूर यांनी त्याना बँडिट क्विन सिनेमात अभिनयाची संधी दिली.

मनोज वाजपेयींची खरी ओळख रामगोपाल वर्मा यांच्या सत्या सिनेमातून झाली. त्यानंतर त्यांच्या करिअरचा मार्ग खुला झाला. त्यानंतर त्यांच्या अनेक सिनेमांना यश मिळालं.

मनोज वाजपेयी

फोटो स्रोत, facebook

5) आयुष्मान खुराणा

बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आयुष्मान खुराणाचे एकापाठोपाठ एक हिट सिनेमे येत आहेत. प्रत्येक सिनेमातून तो वेगळं काहीतरी घेऊन येतो. त्यामुळे त्याची एक वेगळी ओळख तयार झाली आहे.

यशस्वी कलाकारांच्या यादीत त्याचं नाव असलं तरी त्याचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. हे स्थान मिळवण्यासाठी त्याला फार मेहनत करावी लागली.

सुरुवातीच्या काळात त्याने रेडिओ आणि टीव्ही रिअलिटी शो केले. त्याचं मूळ गाव चंदिगढ आहे. एमटीव्हीवरच्या रोडीज या शोच्या सीझन 2 मध्ये तो पहिल्यांदा दिसला होता. त्यानंतर त्यानं काही काळ रेडिओ जॉकीचं काम केलं.

आयुष्मान खुराणा

फोटो स्रोत, facebook

बिग एफएमवरचा त्याचा 'बिग चाय- मान ना मान मै तेरा आयुष्मान' हा कार्यक्रम लोकप्रिय होता. त्यानं आपल्या करिअरची सुरुवात 2012 साली विकी डोनर सिनेमातून केली. त्यासाठी त्याला फिल्मफेर पुरस्कारही मिळाला होता.

त्याचे बाला, ड्रीम गर्ल, अंधाधुंन, शुभ मंगल सावधान, आर्टिकल-15, शुभ मंगल ज्यादा सावधान, बधाई हो, बरेली की बर्फी, गुलाबो सिताबो सिनेमे गाजले आहेत.

6) कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यनचा जन्म ग्वाल्हेरमध्ये झाला. त्याचे आई-बाबा डॉक्टर आहेत.

त्यानं नवी मुंबईच्या डी. वाय पाटील कॉलेजमधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आणि तेव्हाच मॉडेलिंग आणि सिनेमामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

मध्यमवर्गीय कुटुंबातल्या कार्तिकचा फिल्मी जगताशी काहीच संबंध नव्हता. मात्र अभिनयाच्या जोरावर त्यानं, कोणाच्याही मदतीविना काम मिळवलं.

लव रंजन दिग्दर्शित प्यार का पंचनामा सिनेमात त्यानं पहिल्यांदा काम केलं. त्याबरोबरच आकाशवाणी, कांची- अनब्रेकेबल सिनेमेही यशस्वी झाले. 2015मध्ये प्यार का पंचनामा-2 आणि 2017च्या सोनू के टीटू की स्वीटीला मिळालेल्या यशानंतर त्यानं मागे वळून पाहिल नाही.

कार्तिक आर्यन

फोटो स्रोत, facebook

7) दीपिका पदुकोण

नाम है तेरा या व्हीडिओतून करिअर सुरू करणाऱ्या दीपिका पदुकोणने कोट्यवधी लोकांची मनं जिंकली आहेत. कोकणी परिवारातील दीपिका बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे.

दीपिका पदुकोणला मॉडेलिंग करायचं होतं म्हणून तिनं बंगळुरू आणि मुंबईत काम सुरू केलं. अनुपम खेर यांच्याकडे तिनं अभिनयाचे धडे घेतले आणि श्यामक दावर यांच्याकडे नृत्याचे.

ऐश्वर्या या कन्नड सिनेमातून तिनं काम सुरू केलं. ओम शांती ओम हा तिचा पहिला हिंदी सिनेमा. बाजीराव मस्तानीच्या यशानंतर ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

दीपिका पादुकोन

फोटो स्रोत, facebook

8) भूमी पेडणेकर

भूमी पेडणेकर मुंबईतच मोठी झाली. तिचे वडील मराठी आणि आई हरयाणाची आहे. चित्रपटात येण्याआधी ती यशराज फिल्म्समध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करायची.

दिग्दर्शक शरत कटारिया यांनी तिच्या अभिनयगुणांची पारख केली. त्यांनी तिला 'दम लगाके हैशा' सिनेमात काम दिलं. त्यासाठी तिनं आपलं वजन 90 किलो पेक्षा जास्त वाढवलं होतं. नंतर ते कमी करण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले. भूमीने त्यानंतर टॉयलेट एक प्रेमकथा, बाला, सांड की आंख, शुभ मंगल सावधान, पती पत्नी और वो, सोनचिडिया असे सिनेमे केले.

भूमी पेडणेकर

फोटो स्रोत, facebook

9) तापसी पन्नू

दक्षिण भारतीय सिनेमातून तापसीनं काम सुरू केलं. डेव्हिड धवन यांच्या चष्मेबद्दूर सिनेमात तिला पहिली संधी मिळाली. चित्रपटात येण्याआधी ती मॉडेलिंग करायची.

जुडवा-2, पिंक, मनमर्जिया, नाम शबाना, मुल्क, बेबी, सुरमा, बदला, सांड की आंख, मिशन मंगल, थप्पडसारख्या सिनेमातून ती दिसली.

"इंडस्ट्रीने एकेकाळी आपल्याला पूर्णपणे नाकारले होते, दीर्घकाळ दुर्लक्षही केलं. आपण टिकणार नाही असं वाटायचं, मला कोणीही भेटू इच्छित नाही, माझा सिनेमा चालल्यावरही तुझे एखाद-दोन सिनेमे गाजतील, त्यानंतर नाही" असंही लोकांनी सांगितल्याचं तापसीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. आता कदाचित मी त्यांचे विचार बदलू शकले असेन असंही ती म्हणते.

तापसी पन्नू

फोटो स्रोत, facebook

10) कंगना राणावत

हिमाचल प्रदेशातलं मंडी हे मूळ गाव असणारी कंगना आधीपासूनच तिच्या बेधडक वागण्याबद्दल प्रसिद्ध आहे.

तिचा फिल्मी प्रवास सोपा नव्हता. अभिनयाचं स्वप्न बाळगून तिनं घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तिनं मॉडेलिंग केलं. त्यानंतर अभिनयाचे धडे घेण्यासाठी अभिनय वर्गात प्रवेश घेतला. नंतर तिचा ऑडिशन्सचा प्रवास सुरू झाला.

कंगना राणावत

फोटो स्रोत, facebook

अनुराग बासू यांच्या गॅगस्टरमध्ये तिला पहिली संधी मिळाली. तिला पहिल्या सिनेमासाठी बेस्ट फिमेल डेब्यू ग्लोबल इंडियन फिल्म अवॉर्ड मिळाला. हा सोहळा सिंगापूरमध्ये होता, पण तिथं जाण्यासाठी आपल्याकडे पैसे नव्हते असं तिनं एका मुलाखतीत सांगितले.

ती पुढे म्हणाली होती, "मला प्रसिद्धी मिळाली होती मात्र जेव्हा टीम सिंगापूरला जायला निघाली तेव्हा त्यांनी माझ्या प्रवासाबद्दल विचारलं. मला सिंगापूरला कसं जायचं, कुठे राहायचं माहिती नव्हतं. इतकंच नाही तिकीटाची किंमत विचारायलाही मला लाज वाटत होती. मला अवॉर्ड मिळाल्यावर बॉबी सिंह यांनी माझ्यातर्फे ते ट्रॉफी स्वीकारत आहेत असं कळवलं. मला फार आनंद झाला होता. माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांपैकी तो एक क्षण होता."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)