कोरोना : जेव्हा आम्ही केईएम हॉस्पिटलच्या आयसीयूला भेट दिली...

मयुरेश कोण्णूर आणि शरद बढे

फोटो स्रोत, Sharad badhe/bbc

फोटो कॅप्शन, पीपीई किटमध्ये बीबीसी प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर आणि शरद बढे
    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीस मराठी प्रतिनिधी

शनिवारच्या सकाळी आम्ही मुंबईच्या परळ भागातल्या के ई एम हॉस्पिटलसमोर उभे आहोत. मुंबईची कोरोना विषाणूशी लढाई सुरु झाल्यापासून केईएम चर्चेत आहे. काही चर्चा टीकेच्या आहेत, कधी डॉक्टरांच्या कौतुकाच्या, कधी तक्रारीच्या. ते विशेष कोव्हिड हॉस्पिटल आहे. 'केईएम'ची गर्दी काय असते हे मुंबईला माहिती आहे.

आताही गर्दी आहे, पण मास्क लावलेली गर्दी. तो मास्क सावधानता बाळगायला लावतो, पण त्यामागे लपलेल्या चेहऱ्यांवर भीतीही आहे. कोरोना काळातल्या अनेक बातम्या येताहेत. काळ कमालीच्या कसोटीचा आहे. पण 'केईएम'च्या ज्या कोव्हिड वॉर्डमध्ये, तिथल्या आयसीयू मध्ये या विषाणूसोबत शेवटची लढाई लढली जाते, त्या वॉर्डमध्ये परिस्थिती कशी आहे याची बाहेर बहुतांशी कल्पना नाही.

बराच काळ वाट पाहिल्यावर आम्हाला परवानगी मिळाली आहे. बाहेर आपण कोरोनापासून अंतर ठेवायचा आटोकाट प्रयत्न करतो आहोत, पण आता कोरोना वॉर्डात, आयसीयू मध्ये चाललो आहोत याचं दडपण आहे. हॉस्पिटलच्या बाहेर अनेक एम्ब्युलन्सेस डोळ्यांना या काळात ठळकपणे जाणवतात. काही रुग्णांना घेऊन आल्यात, काही घेऊन जायला.

केईएमच्या जुन्या इमारतींच्या सगळ्या गल्ल्या तशा मोकळ्या आहेत. पेशंट्सची नेहमीप्रमाणे ये जा चाललेली आहे. काही ठिकाणी बैरिकेड्स आहेत. ज्या ओफिसेसमध्ये वा कॉरिडॉर्समध्ये बाहेरच्या कोणी थेट येऊ नयेत म्हणून.

आमच्यासोबत दोन डॉक्टर्स आहे ज्या कोव्हिड वॉर्डमध्ये गेले काही महिने काम करताहेत. डॉ स्मृती वाजपेयी आणि डॉ कविता जोशी. त्यांच्यामागोमाग कोव्हिड वॉर्डकडे निघतो. कॉरिडॉर्स मोकळे आहेत, पण बेंचेस भरलेले आहेत.

बहुतांश पेशंट्सचे नातेवाईक असावेत. हॉस्पिटलचे कर्मचारी, काही सुरक्षारक्षक, पोलिस हे इथे बऱ्याच काळासाठी तैनात आहेत, त्यातले काही पीपीई सूटमध्ये दिसायला लागतात. तेव्हा नेहमीचं केईएम आणि कोरोनातलं केईएम याच्यातला फरक प्रकर्षानं जाणवतो. वातावरणातला तणाव स्पष्टपणे जाणवतो.

आयसीयू वॉर्ड

फोटो स्रोत, Sharad badhe/bbc

फोटो कॅप्शन, आयसीयू वॉर्ड

पहिल्या मजल्यावरच्या कोव्हिड आयसीयू जवळ आम्ही पोहोचतो. त्याच्या दरवाज्याच्या काही मीटर अगोदरच बहुतांश भाग हा बाक लावून अडवला आहे. कोणीही अधिक जवळ येऊ नये म्हणून. इथून पुढे फक्त ज्यांचा संबंध कोव्हिड वॉर्डशी आहे त्यांनाच जाता येतं. आम्ही आत प्रवेश करतो, पण लगेचच आयसीयू भागात जाता येत नाही.

उजव्या बाजूला एक खोली आहे. तिथं आम्हाला नेलं जातं. या खोलीला म्हणतात 'डॉनिंग रुम', म्हणजे जिथे पीपीई सूट अंगावर चढवायचा असतो ती खोली. प्रत्येक डॉक्टरला आणि या वॉर्डमध्ये काम करणाऱ्या सपोर्ट स्टाफला या खोलीत येऊन पीपीई सूट घातल्याशिवाय काम सुरु करता येत नाही आणि ते शक्यही नाही.

डोळ्याला न दिसणाऱ्या या कोरोना विषाणू नावाच्या शत्रूविरुद्ध वापरलं जाऊ शकणारं ते एकमेव चिलखत आहे. इथं त्याच्यावरच सारी भिस्त आहे. पण हा सूट घालणं आणि त्यात काही तास सलग काम करणं एक मोठं दिव्य आहे. आम्हाला सोबतचे डॉक्टर्स मदत करतात. एव्हाना इथं काम करणारा सपोर्ट स्टाफही जमा झालेला असतो. पीपीई किट घालण्याचे टप्पे आहेत. ते तसेच पाळावे लागतात. मास्क, ग्लोव्हज, मग गॉगल, मग पीपीई किट, मग अजून एक ग्लोव्ह, मग फेस शिल्ड.

शरीराचा एकही भाग मोकळा राहता कामा नये, आच्छादलेलाच पाहिजे. काही ठिकाणी दोन लेयर्स तर चेहऱ्यावर चार लेयर्स असतात. प्रत्येक टप्प्यानंतर हात, ग्लोव्ह्ज चढवले असले तरीही सॅनिटायझरनं पुन्हा पुन्हा स्वच्छ करावे लागतात. आणि आपले हात कुठेही टेकवायचे तर नाहीतच आणि आपल्या चेहऱ्याकडे तर अजिबातच न्यायचे नाहीत, हा गोल्डन रुल. पीपीई किट चढवल्यावर बाहेरच्या जगाशी संपर्क जणू संपून जातो. जवळपास अर्धा तास ही चिलखतं घालायला लागल्यावर आम्ही आयसीयू कडे जातो.

त्या रुममधून आयसीयू च्या दरवाजापर्यंत जातांना १० फुटांच्या त्या अंतरात कित्येक गोष्टी स्लो मोशनप्रमाणे जाणवतात. बाजूच्या खोल्यांमध्येही काही पेशंटस आहेत. नजरेच्या एका कोपऱ्याला ते जाणवतात. पीपीई किट घालून बिनचेहऱ्याची झालेली अनेक माणसं युद्धातल्या सैनिकांसारखी उभी असतात, जात येत असतात.

कोरोना
लाईन

सगळ्यात तीक्ष्णपणे झालेली जाणीव म्हणजे, बाहेरचं अब्जावधींच जीवांचं हे जग एका विषाणूसोबत लढतं आहे. जगाच्या पटांगणावर ती लढाई सुरु आहे. पण त्यातल्या काही जीवांची ती लढाई अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचते. तो टप्पा हा. आयसीयू वॉर्डमध्ये असं वातावरण काही नवं नव्हे. पण कोरोनाकाळ आणि नेहमीचा काळ यात अनामिक प्रचंड फरक आहे. भावनेच्या आहारी जाऊन कितीही तटस्थपणे त्या फरकाकडे पाहायचं ठरवलं तरी तो जाणवायचा राहात नाही.

पण अनेक महिने अथकपणे या कोव्हिड वॉर्डमध्ये काम करणा-या डॉक्टर्स आणि नर्सेसचा आवाज, शब्द, हालचाली आम्हाला तटस्थ व्हायला मदत करतात. आयसीयू च्या दारातून आत प्रवेश केल्यावर आवश्यक अंतर ठेवूनच चालावं लागणार असतं. आणि आमच्यासाठी हे आयसीयूचं एक्स्पोजर जास्त चांगलं नाही आहे. त्यामुळे अगदी काही मिनिटंच आत राहता येणार आहे. मागे सुरु असलेला व्हेंटिलेटरचा तो आवाज सतत परिस्थितीची जाणीव करुन देतो आहे.

डॉ स्मृती वाजपेयी आयसीयूमध्ये कसं काम चालतं आम्हाला सांगतात. पण तांत्रिक गोष्टी सांगता सांगता जे त्या बोलतात तेव्हा जाणवतं की या अद्याप अजेय असलेल्या विषाणूविरुद्धची लढाई वैद्यकीय तंत्रज्ञानानं केवळ लढली जात नाही आहे. कदाचित औषध अद्याप मिळालं नाही आहे म्हणून ती अधिक मानवी भावनांना सोबत घेऊन चालली आहे.

या डॉक्टर्सनी, नर्सेसनी इथं अनेकांची प्राणज्योत मालवताना पाहिलं असेल. पण तरी पुढच्या काही क्षणात नव्या जीवाला वाचवण्याचं काम त्यांच्यावर येतं. माणसासाठी हा वेग प्रचंड आहे. तो वेग या परिस्थितीत त्यांना कसा झेपत असेल असा प्रश्न मला पडतो. डॉ वाजपेयी म्हणतात ते खोलवर जाणवतं. त्या म्हणतात की या रुग्णांमधल्या कित्येकांना हेही माहित नाही की त्यांचे कुटुंबीय कुठे आहेत, त्यांना क्वारंटाईन केलं आहे का? असंही असेल की भीतीनं अनेकांचे कुटुंबीय इथं येतंही नसतील.

त्यामुळे या रुग्णांची बाहेरच्या जगाशी असलेला संबंध हा केवळ या डॉक्टर्सचा आहे. या डॉक्टर्सवर उपचारासोबतच या रुग्णांना भावनिक आधारही देण्याची जबाबदारी आली आहे. डॉ वाजपेयी म्हणतात की नेहमी आपल्या घरी कोणी आजारी पडलं, हॉस्पिटलमध्ये भरती केलं की आपलं सगळं कुटुंब, आप्तेष्ट एकत्र येतात. पण कोरोनानं हे सगळं उलटं करुन टाकलंय. या मृत्यूसोबतच्या लढाईत एकटं करुन टाकलंय. इथं डॉक्टर्सना उभारावं लागतं आहे. माणूस माणसासाठी उभा राहतो.

केईएम रुग्णालय

फोटो स्रोत, Sharad badhe/bbc

या कोव्हिड आयसीयूमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची स्वतंत्र कहाणी आहे. बाहेरुन केवळ आकड्यांकडे लक्ष ठेवणाऱ्यांना कदाचित तो समजत नसावा किंवा आपलं लक्ष जात नसावं. हे सगळे डॉक्टर्स आणि सपोर्ट स्टाफ जीवावर उदार होऊन इथं काम करताहेत. ते करतांना त्यांच्या पदरी जे येतं आहे ते तक्रार न करता स्वीकारताहेत आणि मग पुन्हा काम सुरु करताहेत. आम्हाला हे सगळं काम समजावून सांगणाऱ्या डॉ वाजपेयी नंतर सांगतात की त्या स्वत: सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह होत्या.

सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा रुग्णांची संख्या वाढायला लागली तेव्हा अनेक डॉक्टर्स, सपोर्ट स्टाफ संसर्गाला बळी पडले. पण वाजपेयींची परिस्थिती अधिक नाजूक होती. त्यांच्या घरात ९ जण आहेत आणि त्यात त्यांची दीड वर्षाची जुळी बाळं आहेत. सगळ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सध्या काळात असं जर कोणाबाबतीत घडलं तर काय धक्का बसू शकतो याची जाणीव आपल्याला सहज होईल. सगळे बरे झाले. पण सगळं कुटुंब मोठ्या भावनिक आंदोलनातून गेलं.

त्यानंतर डॉ वाजपेयी पुन्हा आयसीयू मध्ये हजर झाल्या. हे सोपं नाही. डॉ कविता जोशींकडे ३ वॉर्डची जबाबदारी आहे. जेव्हापासून कोरोनाचं आव्हान आलंय तेव्हापासून, म्हणजे जवळपास दोन महिन्यांपासून, त्या घरी गेल्या नाही आहेत. आठवड्यातून काही तासांसाठी फक्त भेटून येतात. शिवदास धडगे १९ वर्षं झाली केईएम मध्ये सपोर्ट स्टाफ आहेत. माझ्या मनात शंका एकच आहे की सतत इथे काम करण्याची भीती वाटत नाही का? ते फार बोलत नाहीत. भीती वगैरे कधीच निघून गेली म्हणतात.

जसं पीपीई किट चढवणं हे एक मोठं जबाबदारीचं काम आहे तसं ते उतरवणं हेही. त्याचेही टप्पे आहेत आणि जो जो बाहेरचा एक्स्पोज झालेला भाग आहे त्याला अजिबात स्पर्श झाला नाही पाहिजे. एकेक भाग काढून ठेवायचा. आतलं अंग घामानं चिंब भिजलेलं असतं. अवघ्या काही मिनिटात प्रचंड दमायला झालेलं असतं. हे असं इथला सगळा स्टाफ कित्येक महिने रोज काही तास पीपीई किट घालून काम करत असतात. ते कसं करु शकतात हा प्रश्न कधीच सुटणार नाही असं वाटतं.

हे सगळं किट काढल्यावर ठरलेल्या ठिकाणीच फेकायचं असतं. मग ते विल्हेवाट लावण्यासाठी पाठवलं जातं. ते सगळं करुन आम्ही बाहेर पडतो. कोरोनाची ही लढाई अंतिम टप्प्यावर कशी लढली जाते आहे हे पाहिलं, पण प्रश्न हाच मनात उरतो की हे सगळं कधी संपणार? याचं उत्तर कोणत्या डॉक्टरकडेही नाही. निघताना एक अनेक वर्षं इथं काम करणारे डॉक्टर म्हणतात, "केईएम म्हणजे इथली ओपीडी. कित्येक दिवस झाले की त्या ओपीडीत बसलो नाहीये. कधीकधी हे सगळं असं बदललेलं आहे हे पटतंही नाही."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)