राजस्थान : भाजपचं ऑपरेश कमळ? काँग्रेस आमदारांच्या फोडाफोडीचा अशोक गेहलोत यांचा आरोप

ो

फोटो स्रोत, ANI

राजसभा निवडणुकीच्या निमित्ताने गुजरातनंतर आता राजस्थानमध्ये राजकारण तापू लागलं आहे. 19 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत आमदार फोडाफोडीची भीती काँग्रेसला आहे.

त्यामुळे काँग्रेसने त्यांचे आमदार आणि सरकारला समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांना जयपूरजवळच्या शिवविलास रसॉर्टमध्ये ठेवलं आहे.

या सर्व आमदारांची मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत बुधवारी रात्री हॉटेलवर बैठक झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले, "घोडेबाजार करून तुम्ही किती काळ राजकारण करणार? येणाऱ्या काळात काँग्रेसने त्यांना मोठा धक्का दिला तर आश्चर्य वाटणार नाही. लोकांना सगळं कळतं. आजची बैठक सकारात्मक झाली. सगळे एकत्र आहेत. उद्या (गुरुवारी) पुन्हा बैठक होईल."

या निवडणुकीच्या निमित्ताने राजस्थानातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

यासंबंधी राजस्थानातील काँग्रेसचे चीफ व्हीप ( मुख्य प्रतोद) आमदार महेश जोशी यांनी अँटी करप्शन ब्यूरोच्या महासंचालकांना पत्र लिहून तक्रार केली आहे.

कोरोना
लाईन

या पत्रात ते लिहितात, "खात्रीलायक सूत्रांकडून मला ही माहिती मिळाली आहे की कर्नाटक, मध्यप्रदेश आणि गुजरात प्रमाणे राजस्थानमध्येदेखील आमचे आमदार आणि आम्हाला समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांना आमिष देऊन लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेलं राज्य सरकार अस्थिर करण्याचे कुत्सित प्रयत्न होत आहेत."

याबाबत त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. कॉंग्रेसने कुठेही भाजपचं नाव घेतलं नसलं तरी त्यांना रोख भाजपकडेच आहे.

दरम्यान आपल्याला कुठलीही ऑफर आलेली नाही, असं हॉटेलवर असलेले अपक्ष आमदार महादेवसिंह खंडला यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, "मी काँग्रेससोबत आहे. मला कुठलीच ऑफर मिळालेली नाही."

गेल्या आठवड्यातच फोडाफोडीची शक्यता लक्षात घेता गुजरात काँग्रेसने आपल्या 17 आमदारांना राजस्थानमध्ये हलवलं होतं. त्यानंतर आता राजस्थानमध्येही आमदार फोडाफोडीचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं म्हणणं आहे.

आमदारांची फोडाफोडी करण्यासाठीच राज्यसभा निवडणूक लांबवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ते म्हणाले, "राज्यसभा निवडणूक आता होतेय. दोन महिन्यांपूर्वीच ही निवडणूक पार पाडता आली असती. मात्र, तोवर गुजरात आणि राजस्थानमध्ये त्यांची खरेदी-विक्री पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळे त्यांनी निवडणूक घ्यायला उशीर केला. निवडणूक आता होतेय आणि परिस्थिती तशीच आहे."

गेहलोत

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, अशोक गेहलोत यांच्यासोबत राहुल गांधी

राजस्थानात तीन राज्यसभा जागांसाठी 19 जून रोजी निवडणूक होणार आहे. यापैकी दोन काँग्रेस तर एक भाजपला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपने दोन उमेदवार देऊन काँग्रेसपुढे आव्हान उभं केलंय. सरकारला पाठिंबा देणाऱ्या काही अपक्ष आमदारांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्याच्या बातम्यांनंतर राजस्थानातील काँग्रेस सरकार अलर्ट झालंय.

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी बुधवारी संध्याकाळी बैठक झाली. काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक रणदीप सुरजेवालाही या बैठकीला उपस्थित होते. भाजप काही अपक्ष आमदारांना आमिष दाखवत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सुरजेवाला म्हणाले, "राजस्थानच्या वीरभूमीत भाजपची खेळी यशस्वी होणार नाही."

त्यानंतर या आमदारांना जयपूर-दिल्ली महामार्गावरच्या शिवविलास रिसॉर्टमध्ये हलवण्यात आलं. तिथेही सर्व आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. आज पुन्हा बैठक होणार आहे आणि या बैठकीला कॉंग्रेस उमेदवार के. सी. वेणुगोपालही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)